रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वापरामुळे रुग्णाचा मृत्यू टाळता येईल, असा कोणताही आधार आढळून आलेला नाही ! – डॉ. राहुल पंडित, सदस्य, राज्य कृती दल
|
मुंबई – रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वापरामुळे रुग्णाचा मृत्यू टाळता येईल, असा कोणताही आधार आजवरच्या अभ्यासात आढळून आलेला नाही. रुग्णाचा रुग्णालयातील वा अतीदक्षता विभागातील कालावधी १ ते ३ दिवस न्यून करण्यास साहाय्य होते, असे प्रतिपादन राज्य कृती दलाचे सदस्य आणि मुलुंड येथील फोर्टिज रुग्णालयातील डॉ. राहुल पंडित यांनी केले.
ते पुढे म्हणाले, ‘‘रेमडेसिवीरचा वापर पहिल्या १० दिवसांत केला पाहिजे, तसेच लक्षण नसलेल्या वा अतीगंभीर रुग्णाला रेमडेसिविर देऊन काही उपयोग नाही. मध्यम ते गंभीरतेकडे जाणार्या रुग्णाला रेमडेसिवीर दिल्यास त्याचा उपयोग होतो. एकूण ५ दिवसांचा हा ‘कोर्स’ असून ६ रेमडेसिविरपेक्षा अधिक रेमडेसिविर देऊ नयेत. याविषयी राज्य कृती दलाची मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध असून त्याचा वापर करणे कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी बंधनकारक आहे.’’
राज्य कृती दलाचे मृत्यू कारणमीमांसा विश्लेषण प्रमुख आणि हिंदुजा रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे म्हणाले, ‘‘रुग्णाला पहिल्या १० दिवसांच्या आत रेमडेसिवीर दिल्यास त्याचा लाभ होतो; मात्र त्यामुळे मृत्यूदर न्यून करता येत नाही. या इंजेक्शनचा वापर करतांना रुग्णाची ऑक्सिजन पातळी, एच्आर सिटी अहवाल आणि अन्य गोष्टी विचारात घेणे अपेक्षित आहे.’’
जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालातही रेमडेसिविर इंजेक्शन दिल्यामुळे मृत्यू न्यून होण्यास अथवा व्हेन्टिलेशनमध्ये घट होत असल्याचे ५ चाचण्यांमधून आढळून आलेले नाही. यात रुग्णाच्या प्रकृतीत काही प्रमाणात सुधारणा होते, असेे आढळून आले आहे; मात्र रुग्णाच्या रुग्णालयीन कालावधीत घट होत नाही.
‘रेमडेसिवीर इंजेक्शन दिल्यामुळे रुग्णाचा मृत्यू टाळता येतो’, हे सत्य नसल्याचे सांगणे, हे उपचार करणार्या डॉक्टरांचे नैतिक दायित्व आहे; पण केवळ आर्थिक लाभासाठी डॉक्टरांकडून हे सत्य सांगितले जात नाही, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे.