महाराष्ट्रातील विविध शहरांत शासकीय नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर पोलिसांची कारवाई !

मुंबई, १५ एप्रिल (वार्ता.) – मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार मुंबईसह राज्यात विविध शहरांत १४ एप्रिलच्या रात्री ८ वाजल्यापासून कलम १४४ लागू करत संचारबंदीची कठोर कार्यवाही व्हावी म्हणून पोलिसांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यातील मुंबई, नागपूर, पुणे यांसह विविध शहरांत विनाकारण आणि विनामास्क फिरणार्‍यांवर पोलिसांनी कारवाई केली, तसेच सहस्रो वाहनांवरही दंडात्मक कारवाई केली आहे. या वेळी काही शहरात नागरिकांना बाहेर पडण्याचे ठोस कारण न देता आल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. या वेळी पोलिसांसमवेत नागरिकांची वादावादाही झाली, तर नागपूर शहरात पोलिसांचा बंदोबस्त अल्प असतांनाही तेथील संचारबंदीला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

मुंबई – भायखळा, दादर, कांदिवली, शीव, चेंबूर, माटुंगा, बोरिवली, गोरेगाव, वांद्रे यांसह ठाणे, कल्याण, पनवेल या ठिकाणी पोलिसांनी दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या पडताळणीसाठी नाकाबंदी केली आहे. या वेळी वाहनचालकांचे ओळखपत्र आणि वाहनचालकासमवेत प्रवास करणार्‍या प्रवाशांचीही पडताळणी केली जात आहे. विनाकारण आणि अत्यावश्यक कामाविना बाहेर पडणार्‍या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. सकाळपासून नियमांचे उल्लंघन करणार्‍या शेकडो वाहनचालकांवर कारवाई केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

पुणे – शहरात विविध ठिकाणी विनाकारण फिरणार्‍या, ‘मास्क’ न घालणार्‍या नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली. शहरातील स्वारगेट येथील बस स्थानकावर बाहेर जाणार्‍या प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. शहरात अनेक ठिकाणी प्रतिदिनप्रमाणे ये-जा करणार्‍या वाहनांची वर्दळ होती. (यावरूनच पुणेकरांना निर्बंधांचे गांभीर्य नाही, असे दिसून येते ! – संपादक)

कोल्हापूर – जिल्ह्यात पोलीस बंदोबस तैनात करण्यात आला आहे; मात्र नागरिक रस्त्यावर फिरत होते. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सामाजिक अंतर पाळण्याचा फज्जा उडाला. तेथे लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीच उपाययोजना केली नव्हती. विनाकारण बाहेर फिरणार्‍यांवर कठोर कारवाई आणि त्यांचे वाहन जप्त करण्याची चेतावणी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांनी दिली आहे; मात्र काही ठिकाणी पोलीस मवाळ भूमिका घेत नागरिकांवर कारवाई करत नव्हते. फेरीवाले आणि भाजीवाले रस्त्यावर विक्रीसाठी बसले होते. त्यामुळे नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडाली. त्यावर महापालिका प्रशासनाने कोणतेच नियंत्रण नव्हते.

वर्षभरात ६० सहस्र १९५ जणांवर गुन्हे नोंद

मार्च २०२० ते एप्रिल २०२१ या काळात मुंबई पोलिसांनी मुंबई शहरात कलम १८८ चे उल्लंघन करणार्‍या ६० सहस्र १९५ आरोपींवर गुन्हे नोंद केले आहेत. यामध्ये ९ सहस्र २०३ पसार आरोपींचा शोध पोलीस शोध घेत आहेत. आतापर्यंत २३ सहस्र ३७० आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले असून २७ सहस्र ६२२ आरोपींना अटक करून न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने या आरोपींची जामिनावर सुटका केली आहे. यामध्ये सर्वाधिक गुन्हे उत्तर मुंबईतील आहेत.