‘जिभे’चे चोचले !
‘पोट भरण्याची चिंता नसलेल्यांचे जिभेचे चोचले पुष्कळ असतात’, असे म्हटले जाते. ‘जेवणात हीच डाळ पाहिजे, त्या डाळी नकोत’, असा हट्ट धरणारे, पालेभाज्या खातांना नाक मुरडणारे आपल्या परिचयात असतील. अशा हट्टीपणामुळे शरिराचे व्यवस्थित पोषण होत नाही. आर्थिक स्थिती बर्यापैकी असूनही ती नसल्याप्रमाणे जीवन जगण्यासारखी दु:स्थिती ओढवून घेतली जाते. अन्न सेवन केल्यावर त्याचा पाचक रस सिद्ध होतो. त्यामध्ये शरिराच्या पोषणास आवश्यक असणारे विविध घटक असतात. केवळ ठराविक डाळ आणि भाजी खाण्यास पसंती असेल, तर शरिराला आवश्यक ते घटक कसे मिळणार ? याचा विचार होत नाही.
कांदा अथवा बटाटा यांची भजी सहजपणे तृप्त होईपर्यंत सेवन केली जाते; पण ‘कारल्याची भाजी’ खायची म्हणजे कपाळावर आठ्या पडतात. पथ्य असल्यास काही पदार्थांचे सेवन वर्ज्य करणे, हे शरिराच्या सुरळीत संचलनासाठी आवश्यक असल्याने हा भाग समजण्याजोगा आहे; मात्र मनाच्या आहारी जाऊन ‘हेच पाहिजे, ते नको’, अशी वृत्ती जोपासणे म्हणजे ‘हातपाय धडधाकट असूनही पथ्य असल्याप्रमाणे स्वतःच स्वतःला बंधनात अडकवून ठेवायचे आणि शरिराचे पोषण होण्यात स्वतःच मोठा अडथळा व्हायचे, असेच म्हणावे लागेल !
मनाच्या आहारी जाऊन शरीर स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करणे, हा एक प्रकारे स्वैराचारच झाला. सोयीपेक्षा आवश्यकतेला प्राधान्य देणे, हे सूज्ञपणाचे लक्षण आहे. शरीर म्हणजे भगवंताने दिलेली देणगी असून त्याच्या पालनाचे दायित्व स्वतःचे आहे, हे कळले पाहिजे. ‘जिभे’पेक्षा शरिराला काय हवे ? याकडे कटाक्ष असला पाहिजे. सेवन करत असलेल्या आहारातून काय मिळते ? हे स्वतःला कळत नसेल, तर जाणून सर्वांगीण आहार घेणे चालू केले पाहिजे. आज कोरोनामुळे उद्भवलेल्या आपत्काळामुळे आवडीचे खाण्याला मर्यादा आल्या आहेत. पुढच्या काळात तर ही मर्यादा आणखीनच वाढेल. तेव्हा आताच शहाणे होण्याला पर्याय नाही, हे जाणा !
– श्री. जयेश राणे, भांडुप, मुंबई.