शिकण्याची वृत्ती अन् सेवेची तीव्र तळमळ असल्याने मनापासून सेवा करणारी रामनाथी आश्रमातील कु. साधना पाटील !
मूळची बेळगाव येथील आणि सध्या रामनाथी आश्रमात राहून ‘नसचिकित्सा’ (‘न्युरोथेरपी’) ही सेवा करणारी साधिका कु. साधना पाटील हिचा चैत्र शुक्ल पक्ष चतुर्थी (१६.४.२०२१) या दिवशी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने आश्रमातील सहसाधकांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
कु. साधना पाटील हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. सौ. अक्षता रेडकर, सनातन आश्रम, गोवा.
१ अ. चांगली आकलनक्षमता
‘कु. साधना वयाने लहान असूनही तिने ‘थेरपी’ची सेवा लवकर आत्मसात केली. तिच्यात शिकण्याची वृत्ती असल्यामुळे तिला वैद्यकीय क्षेत्रामधील अवघड गोष्टीही लवकर समजतात.
१ आ. सेवेची तळमळ
ती ‘थेरपी’ची सेवा मनापासून करते. तिचा हातगुण चांगला आहे. तिने मर्दन केल्यावर रुग्णांना बरे वाटते. त्यामुळे संत आणि साधकही तिचे कौतुक करतात.’
२. श्री. निमिष म्हात्रे, रामनाथी आश्रम, गोवा.
२ अ. शिकण्याची वृत्ती
‘साधनाला संगणक वापरता येत नव्हता; मात्र ती अल्प कालावधीत संगणकीय सेवा करायला शिकली.
२ आ. पुढाकार घेऊन सेवा करणे
एकदा ‘थेरपी’ची सेवा करणार्या सर्व साधिका बाहेरगावी गेल्या होत्या. तेव्हा तिने एकटीने दायित्व घेऊन सर्व सेवा आणि उपचार केले.
तिच्या मनात देवाविषयी भोळाभाव आहे.’
३. सौ. गौरी चौधरी, सनातन आश्रम, गोवा.
३ अ. आज्ञापालन करणे
‘एकदा सेवा करत असतांना साधनाच्या मनात विचार चालू होते. तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ तिला म्हणाल्या, ‘‘तुझ्या मनात नामजप नाही, तर विचार चालू आहेत. तू मनमोकळेपणाने बोलत जा.’’ त्या दिवसापासून साधना मनमोकळेपणाने बोलू लागली.
लहान वयातच तिच्यात ‘समजूतदारपणा, शिकण्याची वृत्ती आणि इतरांना साहाय्य करणे’, हे गुण आहेत.’
४. कु. वैदेही शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
४ अ. व्यवस्थितपणा
‘साधना तिच्या सर्व वस्तू व्यवस्थित ठेवते.
४ आ. संतांप्रती भाव
ती संतांवरील उपचार पुष्कळ मन लावून करते.’
५. श्री. किसन राऊत
५ अ. साहाय्य करणे
‘साधना सतत आनंदी आणि उत्साही असते. मला सेवा करतांना काही अडचण आली, तर ती मला योग्य ते सांगते. यामुळे मला तिचा आधार वाटतो.
५ आ. व्यायाम आणि योगासने शिकवल्यावर ती चांगल्या प्रकारे आत्मसात करणे
दोन वर्षांपूर्वी आधुनिक वैद्या मिनू रतन यांचे ‘थेरपी’ची सेवा करणार्या साधकांसाठी ‘आरोग्य थेरपी’ शिबिर होते. त्यात त्यांनी व्यायाम आणि योगासने यांचे काही प्रकार शिकवले. ते साधनाने चांगल्या प्रकारे केले. दुसर्या दिवसापासून त्यांनी साधनालाच आम्हा सर्वांना ते प्रकार शिकवायला सांगितले.
६. श्री. समृद्ध चेऊलकर आणि कु. रॉशेल नाथन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
६ अ. प्रेमळ
‘सेवेतील सहसाधक रुग्णाईत असेल, तर ती त्याची विचारपूस करते. ती लहान असूनही तिची इतरांना साहाय्य करण्याची तळमळ दिसून येते.
६ आ. सेवेची तळमळ
सेवेतील प्रत्येक सूत्र पूर्ण करण्यासाठी तिची नेहमी तळमळ असते आणि ती तसे कृतीच्या स्तरावर प्रयत्नही करते.’
७. सौ. काव्या कुणाल चेऊलकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
७ अ. सेवा मनापासून करणे
‘तिला नवनवीन उपचारपद्धती शिकायला आवडतात आणि ती त्या पद्धतीने रुग्णांवर उपचार करून त्यांना बरे करते. ती आयुर्वेदामधील पंचकर्म उपचार पुष्कळ चांगल्या प्रकारे करते. तिने मला ते उपचार बारकाव्यांनिशी करायला शिकवले. उत्तरदायी साधकांनी एखादी सेवा दिली, तर ती सेवा परिपूर्ण करण्याकडे तिचा कल असतो. ती त्याचे चिंतन आणि अभ्यास करते. सेवा वेळेत पूर्ण करण्यासाठी ती त्याचे अभ्यासपूर्ण नियोजन करते.’
‘हे गुरुमाऊली, तुमच्यामुळे आम्हाला कु. साधनाची गुणवैशिष्ट्ये शिकता आली. त्यासाठी आम्ही सर्व जण आपल्या चरणी कृतज्ञ आहोत.’
– सेवेत असणारे सर्व सहसाधक (७.४.२०२१)
‘साधनाच्या हातात संतांचे चैतन्य आले आहे’, असे प.पू. दास महाराज यांनी कौतुक करणे‘एकदा प.पू. दास महाराज यांनी साधनाला ‘तू श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची सेवा करतेस का ?’, असे विचारले. तेव्हा ‘त्यांनी साधनाला असे का विचारले असेल ?’, असा मला प्रश्न पडला. मी त्यांना विचारले, ‘‘बाबा (प.पू. दास महाराज), तुम्हाला कसे समजले ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘तिच्या हातात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे चैतन्य जाणवत आहे.’’ यावरून ‘ती संतसेवा मन लावून करते; म्हणून संतांचे चैतन्य तिच्या हातात आले आहे’, असे मला वाटले.’ – श्री. सूरज पाटील |
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |