साधकांनो, ‘जे घडते, ते भल्यासाठीच’, हे लक्षात ठेवून भगवंतावरील श्रद्धेने ‘कोरोना’सारख्या भयावह संकटाचा सामना करा !
कोरोनारूपी आपत्काळासाठी मार्गदर्शक सदर !
‘सध्या ‘कोरोना’सारख्या भयावह संकटाने सार्या विश्वात थैमान घातले आहे. लक्षावधी लोकांना या विषाणूचा संसर्ग झाला असून सहस्रावधी लोक मृत्यूमुखी पडले आहेत. अनेक राष्ट्रांतील जीवनावश्यक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. या विषाणूमुळे मानवाची सर्व स्तरांवर अपरिमित हानी झाली आहे. सर्वसामान्य नागरिक कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत.
१. विज्ञानाने सर्व क्षेत्रांत डोळे दीपवून टाकणारी प्रगती केली असली, तरी ‘कोरोना’सारखे महाभयंकर संकट नियंत्रणात आणण्यासाठी विज्ञानाला मर्यादा येेत असणे
कोरोनाचे हे संकट पाहून जगभरातील विज्ञानवादी, बुद्धीवंत आदी सर्वजण विचारात पडले आहेत. ‘हे भयावह संकट कसे आले ? हे दूर करण्याचा उपाय कोणता ?’, यावर वैज्ञानिक रात्रंदिवस संशोधन करत आहेत, तर बुद्धीप्रामाण्यवादी अनेक तर्क-वितर्क करत आहेत. या सर्व गोष्टींचा विचार केल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते, ती म्हणजे ‘आज विज्ञानाने सर्व क्षेत्रांत डोळे दीपवून टाकणारी प्रगती केली असली, तरी असे महाभयंकर रोग नियंत्रणात आणणे विज्ञानालाही अजून शक्य झालेले नाही.’ यातूनच विज्ञानाला असलेल्या मर्यादा अधिक स्पष्ट होतात.
२. साधकांनी ‘घडणार्या सर्व गोष्टींचा कर्ता जगन्नियंता भगवंत असून आपल्या कल्याणासाठीच तो प्रत्येक गोष्ट घडवत आहेे’, या श्रद्धेने वर्तमान स्थितीला स्थिरतेने सामोरे जावे !
व्यावहारिक दृष्टीने विचार केल्यास प्रत्येक प्रसंगाकडे चांगले-वाईट या दृष्टीने पाहिले जाते; मात्र चिरंतन सत्य हे आहे की, भगवंताने निर्माण केलेली सृष्टी परमेश्वरी नीती-नियमांनुसारच चालते. घडणार्या सर्व गोष्टींचा कर्ता जगन्नियंता भगवंतच असून आपल्या कल्याणासाठीच तो प्रत्येक गोष्ट घडवत असतो.
एखाद्या घटनेत ‘काळाच्या पलीकडे नेमके काय घडत आहे ?’, तसेच त्यामागील कार्यकारणभाव आपल्याला समजत नाही. त्यामुळे ‘वरवरच्या घटना पाहून त्याविषयी बुद्धीने तर्क-वितर्क करणे टाळावे. भगवंताच्या इच्छेविना जर झाडाचे पानही हलत नाही, तर अशा घटना घडण्यामागे काही दैवी नियोजन असणार नाही का ? त्यामुळे साधकांनी ‘या सगळ्यातून भगवंताला नेमके काय शिकवायचे आहे ?’, हे समजून घ्यावे. साधना केल्यास कठीण प्रसंगात ईश्वरी कृपेने स्थिर आणि आनंदी रहाता येते आणि कालांतराने या सगळ्यामागील कार्यकारणभावही भगवंत लक्षात आणून देतो.
साधकांनो, सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत बुद्धीने तर्क-वितर्क करण्यापेक्षा ‘जे घडते, ते भल्यासाठीच’, या दृढ श्रद्धेने साधना वाढवून आनंदी रहा !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.४.२०२०)
(कोरोनाविषयीच्या सर्व मार्गदर्शक सूचना साधकांनी संग्रही ठेवाव्यात.)