केंद्र सरकारकडून सी.बी.एस्.ई.च्या दहावीच्या परीक्षा रहित, तर बारावीच्या स्थगित
नवी देहली – केंद्र सरकारने कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर सी.बी.एस्.ई.च्या दहावीच्या परीक्षा रहित केल्या आहेत, तर बारावीच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. परिस्थितीचा आढावा घेऊन बारावीच्या परीक्षांविषयीचा निर्णय घेण्यात येईल, असे घोषित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला शिक्षणमंत्री आणि मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ४ मे ते १४ जून या कालावधीत १० वीच्या परीक्षा घेतल्या जाणार होत्या.
१. ऑब्जेक्टिव्ह निकषांच्या आधारे १० वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे निकाल घोषित करून त्यांना गुणपत्रिका दिल्या जातील. विद्यार्थ्यांना त्यांच्या कामगिरीनुसार गुण दिले जातील. एखादा विद्यार्थी याविषयी समाधानी नसल्यास त्याला परीक्षा देण्याची संधी मिळेल.
२. १ जूनला बैठक होईल. त्यात तेव्हाच्या स्थितीचा आढावा घेऊन १२ वीच्या परीक्षांविषयीचा निर्णय घोषित केला जाईल. परीक्षा होणार असल्यास त्याविषयीची सूचना विद्यार्थ्यांना १५ दिवस आधी दिली जाईल.