हरिद्वार येथील कुंभमेळ्यात साधूसंतांच्या उपस्थितीत सहस्रो भाविकांनी तृतीय पवित्र स्नानाचा घेतला लाभ
हरिद्वार – येथे चालू असलेल्या कुंभमेळ्यात १४ एप्रिल या दिवशी मेष संक्रांतीच्या निमित्ताने तृतीय पवित्र स्नानाचा सोहळा उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला. हरकी पौडी येथील ब्रह्मकुंडामध्ये अनेक साधूसंतांनी परंपरेनुसार विधीवत् पवित्र स्नान केले. साधूसंतांच्या पवित्र स्नानानंतर सहस्रो भाविकांनी या स्नानाचा लाभ घेतला.
१. सकाळी ८ वाजून ५६ मिनिटांनी पवित्र स्नानाला प्रारंभ झाला. प्रथम निरंजनी आणि आनंद आखाडा यांचे, नंतर जुना आखाडा, अग्नि आखाडा, आव्हान आखाडा, महानिर्वाणी आखाडा, अटल आखाडा यांचे पवित्र स्नान झाले. निरंजन पिठाधीश्वर आचार्य महामण्डलेश्वर स्वामी श्री कैलाशानंद गिरिजी महाराज, मनसादेवी ट्रस्टचे सचिव श्री महंत रवींद्र पुरीजी महाराज, आनंद आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी श्री बालकानंद गिरिजी महाराज यांनी पवित्र स्नानाचा शुभारंभ केला.
२. मेळाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक दीपक रावत यांनी पवित्र स्नानापूर्वी महाकुंभ निर्विघ्न पार पडावे, यासाठी गंगामातासहित देवदेवतांची पूजा केली. या वेळी श्रीगंगा महासभेचे अध्यक्ष प्रदीप झा, अप्पर मेळाधिकारी डॉ. ललित नारायण यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
३. यानंतर दीपक रावत यांनी पवित्र स्नानासाठी येणार्या साधूसंतांचे पुष्पहार घालून स्वागत केले. दुपारी १२ वाजेपर्यंत ९ लाख ९४ सहस्र ५१७ जणांनी पवित्र स्नानाचा लाभ घेतला.