६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. प्रदीप चिटणीस यांनी गायलेल्या विविध रागांचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण आणि त्यांना आलेल्या अनुभूती !
नृत्य आणि संगीत यांविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
१ ते ४ जुलै २०१८ या कालावधीत ठाणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे गायक श्री. प्रदीप चिटणीस यांनी सनातनच्या रामनाथी आश्रमात संगीत चिकित्सेद्वारे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक रुग्ण-साधकांसाठी उपाय केले. श्री. प्रदीप चिटणीस यांनी गायलेल्या विविध रागांचा कु. मधुरा भोसले यांच्यावर झालेला परिणाम, त्यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण आणि त्यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
१. संगीत चिकित्सेसंदर्भात जाणवलेली सूत्रे
१ अ. संगीताचे उपायसत्र चालू करण्यापूर्वी जाणवलेली सूत्रे
१. व्यासपिठाकडे पाहिल्यावर पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आणि पिवळा प्रकाश दिसला.
२. व्यासपिठाच्या ठिकाणी तारक-मारक शक्तीच्या नादलहरी गोलाकारात कार्यरत झाल्या होत्या. ‘ही रागांची नादशक्ती आहे’, असे मला जाणवले.
१ आ. तंबोर्याचे पार्श्वसंगीत ऐकतांना जाणवलेली सूत्रे
१. तंबोर्याच्या नादातून निर्गुण-सगुण स्वरूपाची तारक शक्ती कार्यरत झाली.
२. तंबोर्याच्या नादशक्तीचा परिणाम माझ्या देहातील मूलाधार, स्वाधिष्ठान आणि मणिपूर या कनिष्ठ चक्रांवर अल्प झाला आणि अनाहत, विशुद्ध, आज्ञा अन् सहस्रार या वरिष्ठ चक्रांवर अधिक परिणाम झाला.
३. माझ्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी चांगल्या संवेदना जाणवून माझे ध्यान लागत होते.
४. माझ्या आज्ञाचक्राकडे चांगल्या शक्तीच्या लहरी आकृष्ट झाल्या आणि त्या माझे कपाळ, डोळे अन् सहस्रारचक्र यांकडे प्रक्षेपित झाल्या. त्यामुळे माझे डोके हलके झाले आणि मला सात्विक सुखाची अनुभूती आली.
५. तंबोर्याच्या नादातून उच्च स्तरावरील तारक शक्ती आणि निर्गुण चैतन्य यांचे प्रक्षेपण झाल्यामुळे मनाची एकाग्रता अन् अंतर्मुखता वाढून शांतीची अनुभूती आली.
१ इ. संगीत चिकित्सा आणि उपाय चालू झाल्यावर जाणवलेली सूत्रे
१. ध्वनीचित्रीकरण कक्ष हे नादशक्तीचे केंद्रस्थान झाले.
२. व्यासपिठाच्या ठिकाणी निर्गुण-सगुण स्तराच्या तारक-मारक शक्तीच्या नादलहरी वलयांकित स्वरूपात फिरून कार्यरत झाल्या आणि त्यांची ऊर्जा दशदिशांना प्रक्षेपित झाली.
३. विविध रागांचे गायन चालू झाल्यावर स्त्री आणि पुरुष यांच्या दैवी आकृती व्यासपिठाच्या ठिकाणी भारतीय शास्त्रीय नृत्य करतांना दिसल्या. त्यांच्या सूक्ष्म रूपातून सर्वत्र दैवी प्रकाश पसरत होता आणि त्यांच्या सूक्ष्म देहातून सर्वत्र दैवी सुगंध दरवळत होता.
१ ई. श्री. प्रदीप चिटणीस यांच्या आध्यात्मिक गुरूंच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे
१. श्री. प्रदीप चिटणीस यांच्या पाठीशी प्रचंड गुरुबळ कार्यरत आहे. ‘गुरुबळाच्या साहाय्यानेच त्यांनी संगीतकला आणि रागांचे शास्त्र आत्मसात केले आहे’, असे जाणवले. श्रीगुरूंच्या कृपेमुळे ते संगीताच्या ज्ञानाचा उपयोग जनकल्याणासाठी करत आहेत.
२. त्यांच्या गुरूंची संकल्पशक्ती संगीताच्या कार्यक्रमाच्या वेळी कार्यरत होते. त्यामुळे श्रोत्यांवर संगीतातील सूक्ष्म नादाचा अधिक प्रभाव पडतो आणि अधिक प्रमाणात उपाय होऊन व्याधी दूर होतात.
३. मला त्यांच्या आध्यात्मिक गुरूंचे निर्गुण स्वरूप जाणवले आणि गुरुतत्वाचे अस्तित्व तेजस्वी पिवळ्या रंगाच्या प्रकाशाच्या गोळ्याच्या रूपाने त्यांच्या भोवती असल्याचे जाणवले.
२. संगीताच्या उपायाचे टप्पे आणि त्यांचे वैशिष्ट्य
अ. संगीताचे उपाय हे आकाशतत्वाच्या स्तरावरील उपाय आहेत.
आ. नादलहरींच्या माध्यमातून सात्विकता, चांगली शक्ती, भाव आणि सगुण किंवा निर्गुण स्तरावरील चैतन्य कार्यरत होते.
इ. प्रत्येक राग किंवा रागिणी यांचा संबंध विशिष्ट देवतेशी आहे, उदा. राग भैरवचा संबंध शिवाशी आहे आणि राग दुर्गाचा संबंध श्रीदुर्गादेवीशी आहे. रागानुसार विशिष्ट देवतेची तारक किंवा मारक शक्ती, सगुण किंवा निर्गुण स्तरावरील चैतन्य आणि आनंद, तसेच शांती यांच्या लहरी विविध प्रमाणात कार्यरत होतात.
ई. संगीतातून कार्यरत झालेल्या नादलहरींचा स्पर्श व्यक्तीच्या स्थूलदेहासह त्याच्या सूक्ष्म देहांना होऊन त्यांवर साठलेले त्रासदायक शक्तीचे किंवा रज-तम यांचे आवरण न्यून होते. तेव्हा नादलहरी पृथ्वी आणि तेज या तत्वांच्या स्तरावर कार्यरत असतात.
उ. त्यानंतर नादलहरींद्वारे स्थूल आणि सूक्ष्म देहांमध्ये साठलेल्या त्रासदायक शक्तीच्या स्थानांमध्ये साठलेल्या त्रासदायक शक्तीशी युद्ध होते. तेव्हा नादशक्ती तेजतत्वाच्या स्तरावर कार्यरत असल्यामुळे उष्णता जाणवते.
ऊ. त्रासदायक शक्तीचे विघटन झाल्यावर देहातील विविध ठिकाणी चैतन्य कार्यरत होऊन नादशक्तीद्वारे चैतन्य लहरींचे प्रक्षेपण होते. तेव्हा नादशक्ती आप आणि वायू या तत्वांच्या स्तरांवर कार्यरत असतात.
ए. सर्वांत शेवटी श्रोत्यांच्या स्थूल आणि सूक्ष्म देहांचे शुद्धीकरण झाल्यावर त्यांच्या भोवती संरक्षककवच निर्माण करण्यासाठी नादशक्तीच्या लहरी आकाशतत्वाच्या स्तरावर कार्यरत होऊन विविध देहांभोवती निर्गुण चैतन्याचे संरक्षककवच निर्माण करतात.
३. संगीत उपाय पद्धतीतील विविध कृतींचा झालेला सूक्ष्म परिणाम
श्री. प्रदीप चिटणीस यांनी पुढील पद्धतीने संगीत उपाय केले. (यांतील सर्व क्रिया डोळे मिटून करायच्या असतात.)
३ अ. श्रोत्यांनी आरंभी ॐ कार म्हणणे : श्रोत्यांनी केलेल्या ॐकाराच्या उच्चारणामुळे ब्रह्मांडात कार्यरत असणारी ईश्वराची निर्गुण शक्ती श्रोत्यांच्या पिंडाकडे आकृष्ट होऊन पिंडाची शुद्धी झाली.
३ आ. श्रोत्यांनी रागाचे बोल म्हणणे : श्रोत्यांनी श्री. प्रदीप चिटणीस यांच्या मागून विविध रागांचे बोल (रागाचे आलाप, आरोह आणि अवरोह अन् रागाचा विस्तार) म्हटल्यावर श्रोत्यांची वाणी सात्विक होऊ लागली. वाणीद्वारे विशिष्ट पद्धतीने उच्चारलेल्या सरगममुळे विशिष्ट रागाची संबंधित स्पंदने, शक्ती आणि चैतन्य प्रथम स्वर म्हणणार्या व्यक्तीमध्ये अन् नंतर वातावरणात कार्यरत झाले. त्यामुळे श्रोत्यांच्या देहाच्या आत आणि बाहेर दोन्हीकडे उपाय होऊन त्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक त्रासांची तीव्रता उणावू लागली. त्याचबरोबर व्याधीशी संबंधित असणार्या रज-तमात्मक शक्तीचे रागांतील सात्विक शक्तीशी सूक्ष्मातून युद्ध होऊन रज-तमात्मक शक्तीचे विघटन होऊ लागले. त्यामुळे शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक व्याधींची तीव्रता उणावू लागली.
३ इ. श्रोत्यांनी स्वतःचे शरीर शिथिल केल्यामुळे शरिराला बळ आणि मनाला उत्साह जाणवू लागणे : श्रोत्यांच्या पायाच्या अंगठ्यापासून मस्तकापर्यंत शरिराचा प्रत्येक भाग शिथिल केल्यामुळे त्यावरील ताण न्यून झाला. शरिरातील विविध अवयवांना देहाच्या आत आणि बाहेर असणार्या पोकळींमध्ये कार्यरत झालेली रागांची निर्गुण-सगुण स्तरावरील चैतन्यशक्ती ग्रहण करता आली. ही चैतन्यशक्ती श्रोत्यांच्या शरिराच्या प्रत्येक पेशीपेशीने शोषून घेतल्यामुळे त्यांचा देह चैतन्यमय आणि हलका झाला. श्वसनसंस्था, पचनसंस्था, रक्ताभिसरणसंस्था, मूत्रसंस्था, प्रजननसंस्था, अस्थिस्नायू संस्था, अंतर्स्त्रावग्रंथी आणि मज्जासंस्था या संस्थांवर संगीतातील विविध रागांचा चांगला परिणाम होऊन त्यांची कार्यक्षमता वाढली. त्यामुळे शरिराला बळ आणि मनाला उत्साह जाणवू लागला.
३ ई. श्रोत्यांनी श्वास सावकाश घेणे आणि सावकाश सोडणे : श्रोत्यांनी अनुलोम आणि विलोम केल्यामुळे त्यांचा श्वसनमार्ग मोकळा झाला. वायूतत्वाच्या स्तरावर कार्यरत झालेल्या नादलहरींनी श्रोत्यांच्या देहातील पंचप्राण आणि पंचउपप्राण यांमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांची शुद्धी झाली.
३ उ. श्रोत्यांनी निसर्गाच्या सौंदर्याचा मानस आस्वाद घेणे : श्रोते मानसरित्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेतांना निसर्गामध्ये पंचमहाभूतांच्या स्वरूपात कार्यरत असणार्या ईश्वरी चैतन्याचा लाभ श्रोत्यांना होऊन त्यांच्या स्थूल देहासह सूक्ष्म देहांचीही शुद्धी झाली.
३ ऊ. श्रोत्यांनी एखाद्या देवळात मानसरित्या जाऊन देवाचे मानस दर्शन घेणे : श्रोत्यांनी मानसरित्या देवतेचे दर्शन घेतल्यामुळे त्यांच्या मनामध्ये सात्विक भाव जागृत झाला आणि त्यांच्या मनाची सात्विकता अन् चैतन्य ग्रहण करण्याची संवेदनक्षमता वाढली.
३ ए. श्रोत्यांनी देवाचे दर्शन घेतांना रागाशी संबंधित भजन ऐकणे : देवाचे दर्शन घेतांना रागाशी संबंधित भजन ऐकतांना संगीतातील विशिष्ट रागातून विशिष्ट प्रकारची नादशक्ती आणि देवतेच्या वर्णनातून देवतेच्या तत्त्वलहरी या दोन्हींचा श्रोत्यांना लाभ झाला. त्यांच्यावर अनुक्रमे शास्त्रीय संगीत आणि भक्तीयोगांतील भावभक्तीयुक्त शक्ती या दोन्हींचा सकारात्मक परिणाम होऊन त्यांच्यावर पुष्कळ प्रमाणात उपाय झाले.
३ ऐ. श्रोत्यांनी ‘ॐ पूर्णमदः … ’ हा शांतीमंत्र म्हणणे.
‘ॐ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात्पुर्णमुदच्यते ।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥’
(संदर्भ : ईशावास्योपनिषद्, शान्तिमंत्र)
अर्थ : तो सच्चिदानंदघन परब्रह्म पुरुषोत्तम परमात्मा सर्व प्रकारे सदा सर्वदा परिपूर्ण आहे. हे जगही त्या परब्रह्मामुळे पूर्णच आहे; कारण हे पूर्ण पुरुषोत्तमामुळेच निर्माण झाले आहे. परब्रह्माच्या पूर्णतेमुळे जग पूर्ण होऊनही तो परब्रह्म परिपूर्ण आहे. त्या पूर्णामधून पूर्णाला काढून टाकले, तरीही पूर्णच शिल्लक रहाते.
हा शांतीमंत्र म्हटल्यामुळे त्यांची पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, पंचप्राण, मन, बुद्धी, चित्त आणि अहं यांच्याकडून ईश्वराला संगीतमय भावपूर्ण प्रार्थना झाली आणि त्यांना ईश्वराच्या निर्गुण चैतन्याचा लाभ होऊन त्यांना शांतीची अनुभूती आली. श्रोत्यांच्या विविध इंद्रियांना मिळालेल्या चैतन्याप्रती श्रोत्यांच्या मनाला संतोष जाणवून एक निराळ्याच प्रकारची तृप्तता त्यांना अनुभवता आली.
३ ओ. श्रोत्यांनी ‘श्रीकृष्णाऽर्पणमस्तु’ म्हणून सर्वकाही श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण करणे : श्रोत्यांनी वरील श्लोक म्हणून कर्म आणि त्याचे फळ हे दोन्ही भगवंताच्या चरणी अर्पण केल्यामुळे त्यांच्या अंतःकरणात एक प्रकारची रिक्तता निर्माण झाली. त्या रिक्ततेमध्ये त्यांना पूर्णत्वाची अनुभूती आली.
३ औ. श्रोत्यांनी हाता-पायांची हालचाल करून डोळे उघडणे : अंतर्मुख झालेल्या वृत्ती बाह्य कार्य करण्यासाठी बहिर्मुख करण्याकरता सक्रीय करण्यात आल्या.
४. रागांच्या संदर्भात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
४ अ. राग दरबारी कानडा ऐकतांना श्रीकृष्णाचे दर्शन होऊन राधा श्रीकृष्णाभोवती प्रदक्षिणा घालत नृत्य करतांना दिसणे : राग दरबारी कानडाच्या चालीवर ‘लगन लागी मोहन संग’, हे भजन ऐकतांना माझ्या मनाची एकाग्रता वाढून माझी अंतर्मुखता वाढत गेली. त्यानंतर माझ्या हृदयमंदिरात मला बासरीवादन करणार्या श्रीकृष्णाच्या मनमोहक रूपाचे दर्शन झाले आणि ‘मी राधा बनून निळे वस्त्र परिधान करून श्रीकृष्णाभोवती प्रदक्षिणा घालत भारतीय शास्त्रीय नृत्य करत आहे’, असे दृश्य संपूर्ण भजन ऐकतांना दिसले. मी वेगळ्याच भावविश्वात होते आणि मला आजूबाजूच्या जगताचा पूर्ण विसर पडला होता.‘ केवळ मी आणि श्रीकृष्ण असे दोघेच आहोत अन् मी भजनातील बोल बोलून श्रीकृष्णाला भावपूर्ण आळवत आहे’, अशी मला अनुभूती येऊन अवीट आनंद अनुभवण्यास मिळाला.
४ आ. राग अहिरभैरवच्या वेळी अकस्मात वीज जाणे : संगीताचे प्रयोग चालू असतांना ‘देवासुरांमध्ये सूक्ष्म युद्ध चालू आहे’, असे जाणवले. या सूक्ष्म युद्धाचाच परिणाम म्हणून संगीताच्या प्रयोगात विघ्न आणण्यासाठी अनिष्ट शक्तींनी विजेचा प्रवाह काही काळासाठी खंडित केला.
४ इ. पायांच्या जखमांवर संगीताच्या विविध रागांचे उपाय होणे आणि पायाला वेदना न जाणवणे : माझ्या दोन्ही पायांच्या अंगठ्याची नखे बाजूच्या मासात घुसल्यामुळे तेथे जखमा झाल्या आहेत. संगीताचे राग यमन, राग दरबारी कानडा, राग अहिरभैरव आणि राग जोग ऐकतांना माझ्या देहामध्ये शीतल लहरी पसरून माझ्या देहाला चांगल्या संवेदना जाणवल्या. विशेष म्हणजे ‘माझ्या पायांच्या जखमांवर संगीताच्या विविध रागांचे उपाय होऊन जखम भरून येत आहे’, असे जाणवले आणि माझ्या पायाला वेदना जाणवल्या नाहीत.
४ ई. संगीताच्या प्रयोगाच्या संदर्भात आलेल्या अनुभूतींचे टंकलेखन करतांना सूरपेटीच्या कळांना स्पर्श केल्याचे जाणवणे आणि काही वेळा मी नादमय शब्दांचे लिखाण, तर काही वेळा गायन करत आहे’, असे जाणवणे : धारिकेचे टंकलेखन करत असतांना ‘मी संगणकाच्या कीबोर्डवरील कळ (बटण) न दाबता सूरपेटीवरील कळ दाबत आहे’, असे मला जाणवत होते. माझ्या हाताच्या बोटांना सूरपेटीच्या कळांचा स्पर्श जाणवत होता. काही वेळा ‘मी नादमय शब्दांचे लिखाण करत आहे आणि काही वेळा गायन करत आहे’, असे जाणवून मी संगणकावर टंकलिखित केलेल्या शब्दांतून मला नाद ऐकू येत आहे, असे मला जाणवले.’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.७.२०१८)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |