सनातन संस्थेच्या फिरत्या ग्रंथप्रदर्शनाला उत्तराखंड शासनाच्या कुंभमेळा प्रशासनाकडून प्रसिद्धी
हरिद्वार, १३ एप्रिल (वार्ता.) – सनातन संस्थेच्या फिरत्या ग्रंथप्रदर्शनाला उत्तराखंड शासनाच्या कुंभमेळा प्रशासनाकडून लेख स्वरूपात प्रसिद्धी देण्यात आली आहे. कुंभमेळा प्रशासनाद्वारे देश-विदेशातील पत्रकारांना कुंभमेळ्याच्या बातम्या पुरवण्यासाठी एक व्हॉट्सअॅपचा गट बनवण्यात आला आहे या गटात कुंभमेळा प्रशासनाद्वारे हा लेख सनातनचे साधक ग्रंथ वितरण करत असतांनाच्या छायाचित्रांसह प्रसिद्ध केला आहे.
या गटातील लेखामध्ये पुढे म्हटले आहे की, १२ वर्षांतून एकदा येणार्या या कुंभमेळ्यामध्ये हिंदु संस्कृतीचा प्रचार-प्रसार सनातनच्या ग्रंथांद्वारे उत्तम प्रकारे केला जात आहे. गोेवा येथील सनातन संस्थेच्या वतीने कुंभक्षेत्रामध्ये १०० स्वयंसेवक हा प्रचार करत आहेत.
‘देवतांची उपासना कशी करावी’, ‘जीवनात आनंद प्राप्तीसाठी कोणती साधना करावी’ यांसह अन्य ग्रंथांच्या माध्यमातून भाविकांना ग्रंथ वाचनातून धर्माचरण करण्याची मोठी पर्वणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. दूरचित्रवाणी, भ्रमणभाष, इंटरनेट यांच्या अतीवापराचे दुष्परिणाम या विषयीच्या ग्रंथाचा उल्लेख करून सचिन नावाच्या भाविकाने सध्याच्या काळात या ग्रंथांची आवश्यकता असल्याचे मत मांडले आहे. कुंभला येऊन हा ग्रंथ मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. अशा प्रकारे कुंभनगरीमध्ये सनातन संस्थेद्वारे अगदी प्रत्येक भागात धर्म, संस्कृती प्रचाराचे कार्य केले जात असल्याचा उल्लेख या लेखामध्ये करण्यात आला आहे.