वर्ष २०२५ पर्यंत भारत आणि पाक यांच्यात मोठे युद्ध ! : अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा दावा
वॉशिंग्टन (अमेरिका) – वर्ष २०२५ पर्यंत भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये मोठे युद्ध होण्याची शक्यता असल्याचे अमेरिकेच्या ‘नॅशनल इंटेलिजन्स कौन्सिल’ने वर्तवली आहे. या संस्थेने ‘ग्लोबल ट्रेन्ड्स रिपोर्ट’ अमेरिकी सरकारकडे सुपुर्द केला असून यात हे नमूद करण्यात आले आहे. हे युद्ध अनेक दिवस चालणार असून दोन्ही देशांच्या अनेक सैनिकांना यात बलीदान द्यावे लागण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. या अहवालाला जगातील सगळे देश आणि गुप्तचर संघटना गंभीरपणे घेतात.
या अहवालात युद्धाचे कारणही सांगण्यात आले आहे. या ५ वर्षांत भारतात मोठे आतंकवादी आक्रमण होईल. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारत सरकार पाकिस्तानमधील आतंकवादी तळांवर आक्रमण करील आणि युद्धास प्रारंभ होईल.
अणूयुद्धाची शक्यता नाही
या अहवालात ‘या दोन्ही देशांत युद्ध झाले, तरी ते अणूयुद्धामध्ये रूपांतरित होण्याची शक्यता नाही’, असे सांगण्यात आले आहे. ‘दोन्ही देशांचे सरकार अणूबॉम्बच्या आक्रमणाचे पाऊल उचलण्याची चूक करणार नाही. या युद्धामुळे पुढची अनेक वर्षे या दोन देशांना आणि दक्षिण आशियाला गंभीर आर्थिक परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे’, असे म्हटले आहे.
भारत-चीन यांच्यात पुन्हा संघर्ष; मात्र युद्ध नाही !
या अहवालात भारत आणि चीन यांच्यात गलवान खोर्याप्रमाणे आणखी एखादी घटना ५ वर्षांत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे वगळता भारत आणि चीन यांच्यात युद्ध होणार नाही, असे म्हटले आहे.
पाण्यावरूनही भारत- पाक युद्धाची शक्यता
युनायटेड नेशन्स डेव्हलपमेन्ट प्रोग्रॅमने त्याच्या एका अहवालात सांगितले आहे की, वर्ष २०२५ पर्यंत पाकमध्ये पाण्याचा प्रचंड तुटवडा जाणवणार आहे. तेथे पाण्याचे संवर्धन करण्याविषयी कोणतीही पावले उचलली जात नाहीत. पावसाच्या पाण्याचेही नियोजन करण्यात येत नाही. त्यामुळे येत्या ५ वर्षांत मोठ्या लोकसंख्येला पाण्याच्या तुटवड्याला सामोरे जावे लागेल. अशा वेळी त्या देशातील नागरिकांमध्ये सरकारच्या विरोधात असंतोष वाढणार असून त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तान भारतासमवेत युद्ध करण्याचा प्रयत्न करील, असेही या अहवालात सांगण्यात आले आहे.