कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेमुळे भारतात आणि विशेषकरून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात परत एकदा नागरिकांना विविध स्वरूपाच्या कठीण संकटांना सामोरे जावे लागत आहे आणि त्यामुळे त्यांचे अक्षरशः हाल होत आहेत. याला प्रशासन आणि नागरिक यांच्या चुका, भ्रष्टाचार, भोंगळ कारभार, नियोजनाचा अभाव यांमुळे वेळेत अन् अपुर्‍या प्रमाणात मिळणारे वैद्यकीय उपचार, औषधांचा तुटवडा, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून मिळणारी अयोग्य वागणूक आदी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. त्यामुळे कोरोना महामारीच्या माध्यमातून नागरिकांना आता आपत्काळाची दाहक झळ बसत आहे. या महामारीच्या संकटाशी लढतांना नागरिकांना कोणत्या समस्या आणि अडचणी यांना सामोरे जावे लागत आहे, याची भयावहता लक्षात यावी, यासाठी हे सदर चालू करत आहोत. यातून वाचकांनाही आपत्काळाची भीषणता लक्षात येऊन काय सावधानता बाळगायला हवी, हे लक्षात येईल.

‘अशा आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी भगवंताचे भक्त बना आणि साधना वाढवा !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भारताची रुग्णांच्या संदर्भातील केविलवाणी दशा !

कोरोनाचा संसर्ग वाढत असतांना रुग्णांना प्रशासन आणि रुग्णालय यांच्याविषयी येणारे वाईट अनुभव संबंधितांना लज्जास्पद आहेत. या लेखावरून ‘शत्रूराष्ट्राच्या नियंत्रणाखाली असलेल्या राष्ट्रापेक्षा भारताची रुग्णांच्या संदर्भात किती केविलवाणी दशा आहे’, हेच दिसून येते. हलगर्जीपणा करणार्‍या आणि दायित्वशून्य प्रशासनाकडे सरकारने दुर्लक्ष न करता त्यांच्यावर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे. रुग्णांना दिली जाणारी वागणूक आणि केला जाणारा हलगर्जीपणा हिंदु राष्ट्रात (ईश्‍वरी राज्यात) नसेल, तर प्रत्येक रुग्णाची कुटुंबियांप्रमाणे काळजी घेण्यात येईल. – संपादक

पुण्यात रेमडेसिविर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे हतबल नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात !

पुणे – कोरोनाचा आजार पुढच्या टप्प्यात गेलेल्या रुग्णांना आवश्यक असलेल्या रेमडेसिविरच्या इंजेक्शनचा तुटवडा येथे गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात भासत आहे. गंभीर स्थिती असलेल्या रुग्णांचे नातेवाईक पहाटेपासून रांगेत उभे राहूनही त्यांना संध्याकाळीही इंजेक्शन मिळू शकले नाही. त्यामुळे एक महिला ११ एप्रिलला रस्त्यावर येऊन रडू लागल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला. ‘केवळ ‘व्हीआयपीं’ना (अतीमहनीय व्यक्तींना) उपचार आहेत का ? सामान्यांना नाही का ?’, असा प्रश्‍न तिने उपस्थित केला.

यानंतर ‘पुण्यात दुकानातील या इंजेक्शनच्या विक्रीला बंदी घालून महापालिकेतून ते उपलब्ध करून देऊ’, असे सांगण्यात आल्याने नागरिकांनी १२ एप्रिलला मोठ्या प्रमाणात महापालिकेच्या बाहेर गर्दी केली; परंतु महापालिकेतूनही इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने नागरिकांनी महापालिकेच्या बाहेर आंदोलन चालू केले. रुग्णालयातही हे इंजेक्शन उपलब्ध नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील आरोग्ययंत्रणांची लक्तरे अशा प्रकारे समोर येत आहेत.

ठाणे – येथील ग्लोबल रुग्णालयात भरती झालेल्या एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याला बांधण्यासाठी पीपीई किट हवे होते; पण ते उपलब्ध न झाल्याने रुग्णालय प्रशासनाने तो कचर्‍याच्या पिशवीत बांधून दिला. पीपीई किटसाठी नातेवाइकांनी ३ घंटे प्रतीक्षा केली.

जळगाव – येथे एका गादी व्यावसायिकाने कचराकुंडीतील मास्क घेऊन त्याच्या गाद्या बनवल्या. त्याच्या कारखान्यावर कारवाई करण्यात आली.

चंद्रपूर – शासकीय रुग्णालयाबाहेर एका वृद्धाला खाट मिळत नसल्याने ९ घंटे त्या वृद्धाला रुग्णालयाच्या परिसरात खाली भूमीवर झोपवण्यात आले.

गुजरात – येथे सर्वाधिक कोरोना वाढत असलेल्या सुरत येथील स्मशानभूमीत टोकन घ्यावे लागते. काही लोक लाच देऊन क्रमांक लावत आहेत. रांगेत उभे राहून वाट न पहाण्यासाठी दीड ते दोन सहस्र रुपये घेतले जातात. व्हेंटिलेटर कचर्‍याची गाडीतून नेण्यात येतात.

बिहार – येथील पश्‍चिम चंपारण्य भागात संरपंचांनी नर्ससमोर अधिकार्‍यांकडून लस टोचून घेण्याचा आग्रह धरला आणि त्यांच्याकडून लस टोचून घेतली. त्या अधिकार्‍याने वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्याचे समजते; परंतु त्या अधिकार्‍याने लस टोचण्याचे प्रशिक्षण घेतले कि नाही, याची कल्पना नाही.

कारसखेडा (भंडारा) – ३ गावांसाठी असलेल्या, दिवे नसलेल्या आणि केवळ तारेचे कुंपण असलेल्या येथील स्मशानभूमीत कोरोनाचे मृतदेह सरणाचा अल्प वापर करून जाळण्यात आले. त्याचे विदारक परिणाम म्हणजे भटक्या कुत्र्यांनी रुग्णांचे अर्धवट जळलेले अवयव बाहेर काढले आणि रस्त्यावर आणून टाकले.

सातारा – येथे एका महिलेवर रिक्शातच उपचार केले जात असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.


नालासोपार्‍यात ७ कोरोना रुग्णांचा ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू

नालासोपारा – येथील विनायका हॉस्पिटलमध्ये ७ रुग्णांचा मृत्यू झाला. ऑक्सिजन न मिळाल्याने ही घटना घडल्याचा आरोप मृतांच्या नातेवाइकांनी केला आहे; मात्र रुग्णालय प्रशासनाने आरोप फेटाळून लावले आहेत.

वसई-विरारमध्ये गेल्या दोन दिवसांपासून ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असून १२ एप्रिल या दिवशी ऑक्सिजनअभावी ११ रुग्णांना प्राण गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली. यात नालासोपार्‍यातील विनायका हॉस्पिटलमधील वरील मृतांचा समावेश आहे. त्या दिवशी सायंकाळच्या सुमारास रुग्णालयील ऑक्सिजनचा साठा संपला होता. त्यामुळे आवश्यकता असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन देता आला नाही आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हे सर्व रुग्ण अत्यवस्थ होते. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला, असे प्रशासनाने म्हटले आहे.

कोरोना महामारीची स्थिती गंभीर होत असतांना रुग्णालये, तपासणी केंद्रे, प्रयोगशाळा यांसारख्या ठिकाणी आलेले कटू अनुभव त्वरित कळवा !

साधकांसाठी सूचना, तसेच वाचक आणि हितचिंतक यांना नम्र विनंती !

सध्या कोरोना महामारीच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे शासकीय, तसेच खासगी रुग्णालयांत उपचारांसाठी भरती होणार्‍या रुग्णांची संख्याही अधिक आहे. जे रुग्ण तपासणी अथवा उपचार घेण्यासाठी रुग्णालयांत जात आहेत, त्यांना अनेक कटू अनुभवही येत आहेत, उदा. तपासणीसाठी नमुने घेतांना ते योग्य प्रमाणात न घेतल्याने रुग्णांना पुन्हा नमुने देण्यासाठी धावपळ करावी लागणे, तपासणी अहवाल वेळेत न देणे, तपासणी अहवालाचा सविस्तर तपशील न देणे, रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे सांगून रुग्णाला उपचारांसाठी भरती करून घेण्यास नकार देणे; मात्र प्रतिष्ठित व्यक्तीने दूरभाष केल्यावर रुग्णाला भरती करून घेऊन व्हेंटिलेटरवर ठेवणे, शासकीय रुग्णालयांत विनामूल्य मिळणारे इंजेक्शन उपलब्ध नसणे, त्यामुळे बाहेरून सहस्रो रुपयांचे इंजेक्शन विकत आणायला लावणे, औषधांचा अवैध साठा करून काळा बाजार करणे, अहवाल प्राप्त नसल्याचे कारण सांगून मृतदेह नातेवाइकांच्या कह्यात न देणे, मृतदेह कह्यात देतांना रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मृतदेहांची अदलाबदल होणे, कोरोना रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत जागा उपलब्ध न होणे इत्यादी.

आपणासही अशा प्रकारचे कटू अनुभव आले असल्यास आरोग्य साहाय्य समितीस पुढील पत्त्यावर त्वरित कळवा. समाजाच्या प्रबोधनासाठी असे अनुभव त्वरित लिखित स्वरूपात कळवणे, ही काळानुसार समष्टी साधना आहे, हे लक्षात घेऊन साधक, वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी आणि विज्ञापनदाते यांनी त्यांना किंवा परिचितांना येणारे कटू किंवा चांगले अनुभव त्वरित पाठवावेत.

आरोग्य साहाय्य समिती

पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१. संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०

ई-मेल पत्ता : arogya.sahayya@hindujagruti.org