प्रशासनाचे लक्ष केवळ लस-ऑक्सिजनवर, संसर्ग रोखण्यावर नाही ! – डॉ. सविश ढगे, माजी उपसंचालक, लष्करी आरोग्य सेवा

डॉ. सविश ढगे

संभाजीनगर – शहरात कोरोनाचे प्रमाण वाढण्याचे कारण ‘विदर्भ स्ट्रेन’ आहे. यामुळे संभाजीनगरसह इतर जिल्ह्यांतही कोरोनाचे नवीन रुग्ण येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यासमवेतच मृत्यूच्या संख्येतही वाढ होत आहे. प्रशासनाचे लक्ष केवळ लस आणि ऑक्सिजन यांवर असून कोरोनाचा संसर्ग रोखण्यावर नाही. गेल्या दीड वर्षात कोरोना विषाणूत ४ सहस्र वेळा पालट पहायला मिळाले आहेत. हा विषाणू ‘डबल म्यूटेटेड स्ट्रेन’च्या नावाने ओळखला जात असून यामध्ये २ वेळा जेनेटिक पालट झाले आहेत, अशी माहिती येथील उल्कानगरीमधील लष्करी आरोग्य सेवेचे माजी उपसंचालक डॉ. सविश ढगे यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, जिल्हाधिकार्‍यांकडे संकट व्यवस्थापन, कौशल्य, प्रभुत्व असायला हवे. ते नसेल, तर त्यांनी तज्ञांचा उपदेश घेतला पाहिजे. प्रशासन मृत्यू दरावर असा युक्तीवाद करते की, लोक रुग्णालयात येण्यास विलंब करत असल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे; परंतु लोक विलंबाने येत असतील तर यामध्ये चूक प्रशासनाची आहे. प्रशासनाचे काम लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आहे; परंतु स्थानिक प्रशासन चांगल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत.