फायनान्स आस्थापनांचा मनमानी कारभार तात्काळ थांबवावा !
शिवसेनेच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
कोल्हापूर, १३ एप्रिल – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक व्यवसाय, व्यवहार ठप्प आहेत. यामुळे मजूर, नोकरदार, व्यावसायिक, व्यापारी अशा सर्वच वर्गांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. यातून सर्वच नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी केंद्र आणि राज्य शासन यांच्या निर्देशानुसार विविध बँकांनी कर्जदारांना हप्ते भरण्यासाठी सवलत देऊ केली आहे. असे असतांना शासन निर्देश डावलून कोल्हापूर जिल्ह्यातील फायनान्स आस्थापनांकडून कर्जाच्या हप्त्यांच्या वसुलीकरिता तगादा चालू आहे. या आस्थापनांच्या वाढत्या मनमानी कारभारावर प्रशासनाने आळा घालावा, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे केली आहे.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, तुटपुंजे उत्पन्न असणारे अनेकजण विविध कारणांसाठी कर्ज घेतात. ज्यांना राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज उपलब्ध होत नाही, असे लोक नाईलाजाने खासगी फायनान्स आस्थापनांचा आधार घेतात. खासगी फायनान्स आस्थापने कोणताही मुलाहिजा न ठेवता पठाणी व्याजदराने हप्ते वसुली करत आहेत. हप्ता न भरल्यास २४ ते ४८ टक्के व्याज आकारण्याची धमकी देऊन बळजोरीने हप्ते वसूल करत आहेत. तरी या प्रकरणी शासनाने गांभीर्याने लक्ष घालून फायनान्स आस्थापनांकडून होणार्या जाचक, नियमबाह्य हप्ते वसुलीवर कडक कारवाई करावी. या वेळी शिवसेनेचे उपशहरप्रमुख जयवंत हारुगले, सुनील जाधव, किशोर घाटगे, युवासेना जिल्हा सरचिटणीस अविनाश कामते उपस्थित होते.