गोव्यातील खाण व्यवसाय, २ जी स्पॅक्ट्रम्, कोळसा खाण आदींविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय चुकीचे ठरले ! – हरिश साळवे, वरिष्ठ अधिवक्ता
पणजी, १२ एप्रिल (वार्ता.) – गोव्यातील खाण व्यवसाय, २ जी स्पॅक्ट्रम्, कोळसा खाण यांविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय चुकीचे ठरले आहेत. या निर्णयांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे, असे मत माजी सॉलिसीटर जनरल आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अधिवक्ता हरिश साळवे यांनी व्यक्त केले आहे. ‘रिपब्लीक टीव्ही’ या राष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अधिवक्ता हरिश साळवे यांनी हे मत व्यक्त केले. गोव्यातील खाण लिजांचे नूतनीकरण सर्वोच्च न्यायालयाने रहित केल्याने गोव्यातील खाणी गेली काही वर्षे बंद आहेत आणि यामुळे गोव्यातील अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. केंद्रातील यापूर्वीच्या दुसर्या संयुक्त पुरोगामी आघाडी (युपीए-२) सरकारविषयी अधिवक्ता साळवे पुढे म्हणाले, ‘‘ केंद्रातील पूर्वीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी शासनाने त्यांच्या शासन काळात न्यायव्यवस्थेचा आधार घेऊन त्यांचे म्हणणे जनतेवर लादण्याचा प्रयत्न केला.
सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई, तसेच हल्लीच्या काही सरन्यायाधिशांनी न्यायालयाच्या कामकाजात खूप चांगला पालट केला आहे. हा पालट काही लोकांना अस्वस्थ करणारा ठरला आहे. जे लोक मतपत्रिकेच्या माध्यमातून निवडून येत नव्हते, ते सार्वजनिक जनहित याचिका प्रविष्ट करून सरकारकडून स्वत:चे हित साध्य करत होते. अशांना आता चपराक बसली आहे.’’