हिंदु नववर्षाच्या स्वागताप्रीत्यर्थ राज्यात काही ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन, तर काही ठिकाणी कार्यक्रम रहित
मये येथे आज प्रभातफेरीचे आयोजन
मये, १२ एप्रिल (वार्ता.) – गुढीपाडव्याच्या निमित्ताने ‘आत्मशक्ती विकास संस्था, मये’, ‘सम्राट क्लब, मये’, ‘गोमंतक युवा दल, मये’ आणि ‘मराठी संस्कार केंद्र, मये’ यांनी संयुक्त विद्यमाने १३ एप्रिल या दिवशी मये येथे प्रभातफेरीचे आयोजन केले आहे. या प्रभातफेरीला सकाळी ६ वाजता श्री महामाया मंदिर, मये येथून प्रारंभ होणार आहे. ही फेरी नंतर श्री लईराई मंदिर, शिरगाव-श्री सातेरी मंदिर, कुंभारवाडा- श्री खेतोबा मंदिर, वायंगिणी-श्री सप्तकोटेश्वर देवस्थान, नार्वे-श्री शांतादुर्गा मंदिर, पिळगाव-श्री शांतादुर्गा मंदिर-डिचोली-श्री केळबाई मंदिर, केळबाईवाडा या मार्गाने जाऊन फेरीची मये येथील श्री महामाया मंदिराकडे सांगता होणार आहे. प्रभातफेरीत दुचाकीसह सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हिंदु नववर्ष स्वागत समितीच्या वतीने आज फोंडा येथे प्रभातफेरी आणि सामूहिक गुढीपूजन
फोंडा – येथील हिंदु नववर्ष स्वागत समितीच्या वतीने फोंडा येथे प्रभातफेरी आणि सामूहिक गुढीपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभातफेरीसाठी पहाटे ५.४५ वाजता क्रांती मैदान, फोंडा येथे सर्वांनी एकत्र यायचे आहे. सकाळी ६ वाजता प्रभातफेरीला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर सकाळी ७ वाजता गुढीरोहण आणि मान्यवरांचे उद्बोधन होणार आहे. या कार्यक्रमाला वाळपई येथील अधिवक्ता शिवाजी देसाई हे प्रमुख वक्ते या नात्याने उपस्थित रहाणार आहेत. कोरोना महामारीचे नियम पाळून हा कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे.
शिरसई गुढीपाडवा उत्सव समितीचा यंदाचा नववर्ष स्वागत कार्यक्रम रहित
शिरसई – कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शिरसई गुढीपाडवा उत्सव समितीने यंदाचा हिंदु नववर्ष स्वागत समितीचा कार्यक्रम रहित करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षी हा कार्यक्रम अधिक जोमाने साजरा करणार असल्याचे समितीने म्हटले आहे.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या गोमंतकियांना शुभेच्छा !
पणजी – गोव्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गुढीपाढवा, विशू आणि बैसाकी या सणांच्या निमित्ताने गोमंतकियांना शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. शुभसंदेशात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणतात, ‘‘या उत्सवांमुळे विविधतेतून एकात्मता साध्य होण्यास साहाय्य होणार आहे. यंदा सुरक्षेच्या दृष्टीने सर्व नियम पाळून हे उत्सव साजरे करूया. हे उत्सव साजरे केल्याने सर्वांना शांती आणि आनंद मिळेल, तसेच सर्वांची भरभराट होईल.’’
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने गोमंतकियांना शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत शुभसंदेशात म्हणतात, ‘‘गुढीपाडवा हा दिवस नवीन आशा, नवी स्वप्ने आणि आनंद घेऊन येत असतो. नवीन वर्षात सर्वांच्या जीवनात यश येऊ दे, सर्वांना आनंद मिळू दे आणि चांगले आरोग्य लाभू दे.’’