गुढीपाडव्याला सात्विक वातावरणात गुढीपूजन करून नववर्षाचे स्वागत करणे आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक !
भारतीय संस्कृतीनुसार गुढीपाडव्याला सात्विक वातावरणात गुढीपूजन करून नववर्षाचे स्वागत करणे आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक !
‘भारतीय परंपरेनुसार चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा, म्हणजे गुढीपाडवा हा नववर्षाचा आरंभ होय ! या दिवशी पहाटे अभ्यंग स्नान करून, गुढीचे पूजन करून नववर्षाचे स्वागत केले जाते. गेल्या काही दशकांपासून पाश्चिमात्य संस्कृतीनुसार ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री पाश्चिमात्य पद्धतीने मेजवानी, मद्य, नृत्य अशा वातावरणात नववर्षाचा आरंभ करणे रूढ झाले आहे. या दोन्ही प्रकारच्या पद्धतींनी केलेल्या नववर्ष स्वागताचा सहभागी व्यक्तींवर आध्यात्मिक स्तरावर नेमका काय परिणाम होतो, याचा महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ (यू.ए.एस्.) हे आधुनिक वैज्ञानिक यंत्र, तसेच सूक्ष्म परीक्षण यांद्वारे अभ्यास करण्यात आला. या अभ्यासातील निष्कर्ष सारांश रूपाने येथे दिले आहेत.
१. ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या यंत्राद्वारे केलेला अभ्यास
भूतपूर्व अणु वैज्ञानिक डॉ. मन्नम् मूर्ती यांनी हे उपकरण विकसित केले आहे. या उपकरणाच्या माध्यमातून एखादी वस्तू, वास्तू, वनस्पती, प्राणी किंवा मनुष्य यांतील सूक्ष्म सकारात्मक ऊर्जेची आणि नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ, तसेच त्याची एकूण प्रभावळ मोजता येते. नकारात्मक ऊर्जा दोन प्रकारची असते. त्यांपैकी ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा त्या घटकाच्या भोवतीची नकारात्मक ऊर्जा असते, तर ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा त्या घटकामधील नकारात्मक स्पंदने दर्शवते. सर्वसाधारण व्यक्ती किंवा वस्तू यांत नकारात्मक ऊर्जा असू शकते; परंतु सकारात्मक ऊर्जा असेलच असे नाही. गेल्या ५ वर्षांत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाच्या माध्यमातून व्यापक संशोधन करण्यात आले आहे. वर्ष २०१४ ते २०१९ या कालावधीमध्ये १० सहस्रांपेक्षा अधिक सजीव आणि निर्जीव घटकांच्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’
जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत. |
१ अ. पाश्चिमात्य पद्धतीने ३१ डिसेंबरला मध्यरात्री केलेल्या नववर्षारंभाच्या होणार्या परिणामाची चाचणी : ३१ डिसेंबर २०१८ च्या रात्री महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे देश-विदेशातील १२ साधक पाश्चात्त्य संस्कृतीनुसार केशभूषा (हेअर स्टाईल), रंगभूषा (मेकअप) आणि वेशभूषा करून गोवा येथील एका नामांकित हॉटेलमध्ये आयोजित ‘न्यू ईयर पार्टी’मध्ये सहभागी झाले. हे सर्व साधक तेथे ५ घंटे होते. ३१.१२.२०१८ या रात्री पार्टीला जाण्यापूर्वी, तसेच १.१.२०१९ या दिवशी पहाटे पार्टीतून परतल्यानंतर त्या सर्वांच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या.
१ आ. भारतीय पद्धतीने गुढीपाडव्याला गुढीपूजनाने केलेल्या नववर्षारंभाच्या होणार्या परिणामाची चाचणी : ६.४.२०१९ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात विधीवत गुढीपूजन करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. या पूजनाला सूत्र क्र. ‘१ अ.’ मधील १२ पैकी १० साधक उपस्थित होते. त्या वेळी आधीच्या चाचणीतील २ साधक विदेशात असल्याने या चाचणीसाठी उपस्थित राहू शकले नाहीत. गुढीपूजनापूर्वी आणि पूजनानंतर त्या सर्वांच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या.
१ इ. पाश्चिमात्य आणि भारतीय पद्धतीने केलेल्या नववर्षारंभाच्या परिणामांची तुलना : दोन्ही चाचण्यांमधे केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विश्लेषण केल्यावर पुढील सूत्रे ठळकपणे लक्षात आली.
१ इ १. पाश्चिमात्य पद्धतीने साजर्या केलेल्या नववर्षारंभाचा परिणाम
अ. साधकांमधील ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जांमध्ये कार्यक्रमाच्या आधीच्या तुलनेत कार्यक्रमानंतर सरासरी तिपटीहून अधिक वाढ झाली.
आ. साधकांमधील सकारात्मक ऊर्जेमध्ये मात्र कार्यक्रमाच्या आधीच्या तुलनेत कार्यक्रमानंतर सरासरी निम्म्याहून अधिक घट झाली.
१ इ २. भारतीय पद्धतीने साजर्या केलेल्या नववर्षारंभाचा परिणाम
अ. साधकांमधील दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जांमध्ये कार्यक्रमाच्या आधीच्या तुलनेत कार्यक्रमानंतर सरासरी निम्म्याहून अधिक घट झाली
आ. साधकांमधील सकारात्मक ऊर्जेमध्ये कार्यक्रमाच्या आधीच्या तुलनेत कार्यक्रमानंतर सरासरी दीड पटीने वाढ झाली.
२. पाश्चिमात्य आणि भारतीय पद्धतीने केलेल्या नववर्षारंभाच्या स्वागताच्या वेळी सहभागी साधकांना जाणवलेली तुलनात्मक सूत्रे
अ. ३१ डिसेंबर २०१८ च्या आदल्या रात्री मी पुष्कळ अस्थिर झाले होते. माझ्या मनात निरंतर दुसर्या दिवशीच्या पार्टीच्या जल्लोशाचे विचार घोंघावत होते. याउलट गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री मन शांत आणि आनंदी होते. ३१ डिसेंबरच्या पार्टीच्या दुसर्या दिवशी मला पुष्कळ त्रास जाणवला. माझे मन कशातच रमत नव्हते. मला ऊर्जाहीन वाटत होते. गुढीपाडव्याच्या दुसर्या दिवशी मला ताजेतवाने आणि उत्साही वाटत होते. मी शांत आणि स्थिर होते. मी अनेक सेवा उत्साहाने पूर्ण करू शकले.
आ. नववर्षाच्या पार्टीमध्ये वरकरणी मी पुष्कळ मजा करीत असल्याचे दिसत असले, तरी माझ्यावर सूक्ष्मातील त्रासदायक शक्तींचे आवरण येत असल्याचे स्पष्टतेने जाणवत होते. माझ्यातील सकारात्मक ऊर्जा न्यून होत असल्याचे जाणवले. तेथील सर्व वातावरण बहिर्मुखता आणि अहं वाढवणारे होते. तेथील व्यक्तींमधून पुष्कळ प्रमाणात लैंगिक स्पंदने प्रक्षेपित होत असल्याचे जाणवले. याउलट गुढीपाडव्याच्या कार्यक्रमात वातावरणातील सकारात्मकता उत्तरोत्तर वाढत जात असल्याचे जाणवले. माझे मन अंतर्मुख झाले. सर्वांवर आध्यात्मिक उपाय होत असल्याचे जाणवले.
इ. पाश्चिमात्य आणि भारतीय प्रकारच्या नववर्षारंभांमध्ये तुलनाच होऊ शकत नाही, असे वाटते. उभय कार्यक्रमांत अनुक्रमे तम विरुद्ध सत्त्व, गोंगाट विरुद्ध शांतता, भासमान विरुद्ध खरे, अल्पकाळ विरुद्ध दीर्घकाळ टिकणारे, बहिर्मुख विरुद्ध अंतर्मुख, असे स्पष्ट भेद जाणवले. त्या पार्टीच्या विचारानेही मनाला त्रास जाणवतो. याउलट गुढीपूजनाच्या वेळी माझे विचार पुष्कळ शुद्ध, साधे आणि सकारात्मक होते.
३. सूक्ष्म परीक्षणाच्या माध्यमातून केलेला अभ्यास
‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’च्या साधिका सौ. योया वाले यांनी पाश्चिमात्य पद्धतीने ३१ डिसेंबरला मध्यरात्री केलेला नववर्षारंभ, तसेच महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कु. प्रियांका लोटलीकर यांनी भारतीय पद्धतीने गुढीपाडव्याला पहाटे गुढीपूजनाने केलेला नववर्षारंभ यांच्या होणार्या परिणामांचे केलेले सूक्ष्म परीक्षण त्यांनी काढलेल्या सूक्ष्म-चित्रांच्या माध्यमातून समजून घेऊया.
वरील सूक्ष्म चित्रातून लक्षात येते की, पाश्चिमात्य नववर्षारंभाच्या कार्यक्रमातून पुष्कळ त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित होतात. त्यामुळे सहभागी व्यक्तींवर त्यांचे आवरण येते. अशा ठिकाणी सूक्ष्म वाईट शक्तींचे अस्तित्व असते आणि त्या व्यक्ती अन् वातावरण या दोन्हींवर मोठ्या प्रमाणात नकारात्मक परिणाम करतात. त्यामुळे ‘पाश्चिमात्य पद्धतीने नववर्षारंभ करणे किती हानीकारक आहे’, हे स्पष्ट होते.
गुढीपूजनानंतर गुढीतून शक्ती, चैतन्य आणि आनंद प्रक्षेपित होतो, तर सूक्ष्मातील त्रासदायक शक्ती दूर होतात, हे वरील चित्रातून स्पष्ट होते.
थोडक्यात सांगायचे तर ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ आणि सूक्ष्म-चित्रे यांच्या माध्यमातून केलेला अभ्यास, तसेच सहभागी साधकांचा वैयक्तिक अनुभव यांतून भारतीय पद्धतीने गुढीपूजन करून नववर्षारंभ करणे आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे, तर पाश्चिमात्त्य पद्धतीने नववर्षारंभ करणे हानीकारक आहे, हे स्पष्ट होते.’
– आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१९.३.२०२०)
• सूक्ष्म :व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला सूक्ष्म-परीक्षण म्हणतात. • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र : काही साधकांना एखाद्या विषयासंबंधी जे जाणवते आणि अंतर्दृष्टीने जे दिसते, त्यासंबंधी त्यांनी कागदावर रेखाटलेल्या चित्राला सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र असे म्हणतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |