शिवरायांचे मुस्लिम मावळे असा उल्लेख करून जातीचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न !
पुण्यातील कोंढवा चौकात झळकले आक्षेपार्ह पोस्टर
पुणे, १२ एप्रिल – रायगडावर मुस्लिम मावळ्यांना नमाज पठण करण्यासाठी ज्या राजाने मशीद बांधली अशा माझ्या राजाला मानाचा मुजरा, संकल्पना – शिवरायांचे मुस्लिम मावळे अशा आशयाचे पोस्टर अधिवक्ता हाजी गफुर पठाण, परवीन हाजी फिरोज, पुणे मनपा नगरसेवक हमिदा अनिस सुंडके यांनी पुण्यातील कोंढवा येथील लुल्लानगर चौकात लावले आहेत. याविरोधात सामाजिक माध्यमातून संतप्त प्रतिक्रिया येत असून असे आक्षेपार्ह पोस्टर त्वरित हटवून ते लावणार्यांवर न्यायालयीन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुरलीधर मोहोळ यांना करण्यात येत आहे.
कोणताही पुरावा नसतांना रायगडावर मशीद बांधली असे खोटे सांगून हे पोस्टर पुणे महानगरपालिका येथे लावण्यात आलेले आहे आणि शिवरायांचे मुस्लिम मावळे असा उल्लेख करून जातीचे उदात्तीकरण केले जात आहे, तरी पोस्टर तात्काळ काढण्यात यावे. असा धादांत खोटा इतिहास सांगून यांना रायगडावर अतिक्रमण करायचे आहे जसे प्रतापगड, विशाळगड यांवर केले तसे. इतिहासाचे विकृतीकरण आणि इस्लामीकरण दाखवणे बंद करा, सदर फलक तातडीने हटवण्यात यावा, अशी शिवप्रेमींची मागणी आहे. असे ट्वीट करून धर्मप्रेमींनी आपला निषेध व्यक्त केला आहे.