पोलीसदलाची प्रतिमा डागाळणार्या भ्रष्ट वृत्तीच्या अधिकार्यांचा बंदोबस्त करण्याला प्राधान्य देणार ! – संजय पांडे, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य
राजकारण्यांचा हस्तक्षेप आणि पोलिसांची उघड झालेली भ्रष्टाचाराची प्रकरणे यांमुळे महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा डागाळली आहे. अशा परिस्थितीत महासंचालकांनी कर्तव्यदक्षपणे काम करून पोलीसदलाची प्रतिमा पुन्हा उंचवावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !
मुंबई – नागरिकांचा विश्वास संपादन करून पोलीसदलाचे कामकाज सुरळीत चालू ठेवणे, पोलीसदलाची प्रतिमा डागाळू पहाणार्या बेशिस्त आणि भ्रष्ट वृत्तीच्या अधिकार्यांचा बंदोबस्त करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणेे यांस प्राधान्य असेल, असे आश्वासन नवनियुक्त पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी दिले. संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
१० एप्रिल या दिवशी पदभार स्वीकारल्यावर त्यांनी वरील वक्तव्य केले.
सचिन वाझे यांच्या प्रकरणानंतर गृहविभागाने परमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करून त्यांच्या जागी पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे हेमंत नगराळे यांची नियुक्ती केली. हेमंत नगराळे यांच्या जागी रजनीश सेठ यांच्याकडे महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. त्या वेळी सेवाज्येष्ठतेनुसार महासंचालकपदासाठी मला डावलण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून संजय पांडे यांनी असंतोष व्यक्त केला होता. संजय पांडे हे वर्ष १९८६ च्या तुकडीतील भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आहेत.
त्यांनी ‘आय्.आय्.टी.’ कानपूर येथून ‘कॉम्प्युुटर सायन्स’ आणि हार्वर्ड विद्यापिठातून ‘नागरी प्रशासन’ या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. मुंबई पोलीसदलातील आर्थिक गुन्हे शाखा आणि अमली पदार्थविरोधी पथक या ठिकाणी उपायुक्तपदाचा कार्यभार त्यांनी सांभाळला आहे.
पंतप्रधान सुरक्षा, अन्न आणि औषध प्रशासनालय यांचे सहआयुक्त, राज्य राखीव पोलीस बलाचे उपमहानिरीक्षक, मानवी हक्क आयोगावर महानिरीक्षक, गृहरक्षकदलाचे अतिरिक्त महासंचालक, राज्य सुरक्षा महामंडळाचे महासंचालक आदी पदांचे दायित्व त्यांनी यापूर्वी सांभाळले आहे.