चैत्र शुद्ध प्रतिपदेला शास्त्रानुसार गुढी उभारूनच हिंदु नववर्ष साजरे करा ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती
कोल्हापूर – गुढीपाडवा केवळ हिंदूंचाच नाही, तर संपूर्ण विश्वाचा वर्षारंभ आहे. या दिवशी ब्रह्मदेवाने पृथ्वीची निर्मिती केली. शालीवाहन शकाचा आरंभदिवसही गुढीपाडवाच होय. चैत्र शुद्ध प्रतिपदा हाच खरा नववर्षारंभ आहे याला वेदांचे प्रमाण आहेत. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदासस्वामी यांसारख्या संतांनी त्यांच्या अभंगांमध्ये हर्षाची गुढी, वैराग्याची गुढी अशा विविध नावांनी गुढीचा उल्लेख केला आहे. त्यामुळे चैत्र शुद्ध प्रतिपदेला शास्त्रानुसार गुढी उभारूनच हिंदु नववर्ष साजरे करावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. सुमित सागवेकर यांनी केले. ९ एप्रिल या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील धर्मप्रेमींसाठी गुढीपाडव्याच्या निमित्ताने ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी हे आवाहन केले.
विशेष
१. व्याख्यानाच्या शेवटी सर्वांनी हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेतली.
२. धर्मप्रेमींनी समाजातील अपप्रचारांना बळी न पडता गुढी उभारून नववर्ष साजरा करण्याचे ठरवले.
काही मनोगत
श्री. प्रेम बडवे – गुढीपाडव्याविषयी समाजामध्ये पुष्कळ नकारात्मकता पसरवली जात आहे. या व्याख्यानातून खरे शास्त्र आम्हाला समजले.
पुष्पा कासट – आजच्या व्याख्यानातून हिंदु धर्माची महानता लक्षात आली. ही सर्व माहिती आम्हाला नव्हती.
पूजा दुडंगे – गुढीपाडव्याविषयी मनामधे जो काही संभ्रम होता तो दूर झाला.
सौ. विमल काबरा – हिंदु धर्मातील महत्वपूर्ण माहिती मिळाली.