‘दळणवळण बंदी’च्या काळात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांकडून करून घेतलेले ‘ऑनलाईन’ प्रसारकार्य आणि त्याला जिज्ञासूंनी दिलेला भरभरून प्रतिसाद !

‘कोरोना महामारी’मुळे झालेल्या ‘दळणवळण बंदी’च्या काळात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांकडून करून घेतलेले ‘ऑनलाईन’ प्रसारकार्य आणि त्याला जिज्ञासूंनी दिलेला भरभरून प्रतिसाद !

सद्गुरु राजेंद्र शिंदे

‘डिसेंबर २०१९ पासून ‘कोरोना विषाणू’चा संसर्ग चालू झाला आणि अल्पावधीतच तो जगभर पसरला. भारतातही या विषाणूचा संसर्ग वाढू लागल्याने मृत्यूमुखी पडणार्‍यांचे प्रमाण वाढले. त्यामुळे मार्च २०२० पासून सगळीकडे ‘दळणवळण बंदी’ लागू करण्यात आली. या कालावधीत सर्वच व्यवहार ठप्प झाल्याने सनातनचे साधक करत असलेला धर्मप्रसारही थांबला. नियतकालिकांची छपाई थांबल्याने साधक ‘सनातन प्रभात’चे घरोघरी करत असलेले वितरण बंद पडले. देवळे बंद असल्याने तेथे होणारे धार्मिक ग्रंथ आणि सात्विक उत्पादने यांचे वितरणही बंद झाले. अशा प्रकारे प्रसाराची विविध माध्यमे बंद झाली. दळणवळण बंदी लवकर उठेल, अशी शक्यता नव्हती. अशा परिस्थितीत साधकांना ‘धर्म आणि अध्यात्म प्रसार कसा करावा ?’, हा प्रश्‍न होता. या काळात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आणि मार्गदर्शनाने ‘ऑनलाईन’ धर्म अन् अध्यात्म प्रसारास आरंभ झाला आणि त्याला समाजातून भरभरून प्रतिसाद लाभला.

१. सामाजिक प्रसारमाध्यमे आणि यंत्रणा यांद्वारे प्रसार करण्याची योजना अन् त्याचे झालेले परिणाम

परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने साधकांनी ‘ऑनलाईन’ सामाजिक प्रसारमाध्यमेे, उदा. ‘फेसबूक’, ‘व्हॉट्स अ‍ॅप’, ‘ट्विटर’, तसेच आधुनिक संपर्क यंत्रणांद्वारे, उदा. ‘एफ्.सी.सी.’, ‘यू ट्यूब’ यांद्वारे प्रसार करण्याची योजना आखली.

१ अ. वाचक, हितचिंतक, हिंदुत्वनिष्ठ, विज्ञापनदाते आणि नातेवाईक यांना ‘व्हॉट्स अ‍ॅप’द्वारे ‘सनातन प्रभात’च्या ‘पीडीएफ्’ पाठवल्याने ‘सनातन प्रभात’चे महत्त्व सांगितले जाऊन सर्वांशी जवळीक वाढणे : ‘व्हॉट्स अ‍ॅप’द्वारे ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या ‘पीडीएफ्’ वाचक, हितचिंतक, हिंदुत्वनिष्ठ, विज्ञापनदाते आणि नातेवाईक यांना पाठवण्यास आरंभ झाला. त्या वेळी साधकांचा पुष्कळ मोठ्या प्रमाणात समाजातील व्यक्तींशी संपर्क झाला. या संपर्कांतून दैनिक ‘सनातन प्रभात’चे महत्त्व सांगण्यासह त्यांच्याशी जवळीक होण्यासही साहाय्य झाले. आजपर्यंत प्रतिदिन ६.५० ते ७ लक्ष व्यक्तींपर्यंत ‘सनातन प्रभात’ नियतकालिक जात आहे. अशा प्रकारे ‘दळणवळण बंदी’ असतांनाही साधकांनी आपली समष्टी साधना चालू केली.

१ आ. प्रतिदिन ‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्ग, नामसत्संग, भावसत्संग आणि धर्मसंवाद चालू होऊन ७५ सहस्र ते१ लाख लोकांपर्यंत विषय पोचणे अन् साधकांसाठी संगणकीय सेवा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणे : काही आठवड्यांतच परात्पर गुरुदेवांच्या कृपेने समाजातील सर्वांसाठी ‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्ग, नामसत्संग, भावसत्संग आणि धर्मसंवाद प्रतिदिन चालू झाले अन् साधकांना सेवेची मोठी संधी उपलब्ध झाली.

‘हे कार्यक्रम कोण पाहू शकतो ?’, याचा अभ्यास करून त्याप्रमाणे सूची बनवणे, त्यांना ‘ऑनलाईन’ सत्संगांची ‘लिंक’ पाठवणे, (प्रतिदिन जवळपास २० लाख लोकांना विविध कार्यक्रमांच्या ‘लिंक’ पाठवल्या जात आहेत.) ‘तो कार्यक्रम त्यांनी पाहिला का ? आणि त्यानुसार काही कृती चालू केल्या का ?’, यासंदर्भात ‘अभ्यास करणे’, यांसाठी मोठ्या प्रमाणात संपर्क करणे चालू झाले. हे सत्संग एकूण ७५ सहस्र ते १ लाख लोक पहात आहेत. हे सत्संग प्रतिदिन असल्यामुळे साधकांना पुष्कळ सेवा उपलब्ध झाली. तरुण आणि संगणकाशी संबंधित साधक यांना तर मोठ्या प्रमाणावर सेवा उपलब्ध झाली. या कार्यक्रमांसाठीची संहिता बनवणे, त्यासाठी उदाहरणे शोधणे, संकलन करणे, ध्वनीचित्रीकरण करणे, ‘एडिटिंग’ करणे, त्याच्या ‘पोस्ट’ बनवणे, ‘व्हिडिओ अपलोड’ करणे आणि अंतिम टप्प्यात ते प्रक्षेपित करणे, आदी विविध सेवांसाठी साधकांचे गट बनवावे लागले.

उत्तरदायी साधक या सगळ्यांचा नियमित आढावा घेत असल्यामुळे साधकांना सेवा आणि उत्तरदायी साधकांचा सत्संग मिळू लागला.

२. समाजातील जिज्ञासूंसाठी चालू करण्यात आलेले विविध ‘ऑनलाईन’ सत्संग आणि त्याद्वारे साधकांना उपलब्ध झालेल्या सेवा

२ अ. ‘समाजातील व्यक्तींना अध्यात्माविषयी रुची निर्माण व्हावी आणि त्यांना साधनेविषयीच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे मिळावीत’, या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यात सत्संग चालू होणे : या काळात सर्व कामकाज ठप्प झाल्यामुळे समाजातील व्यक्तींचे मनःस्वास्थ्य बिघडणे, घरी राहिल्यामुळे कंटाळा येणे, यांसारख्या गोष्टी चालू झाल्या होत्या. सर्वच जण घरी असल्यामुळे ‘त्यांच्याकडून साधना व्हावी, त्यांना अध्यात्माविषयी रुची निर्माण व्हावी आणि साधनेविषयीच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे मिळावीत’, या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यात साधनेविषयी मार्गदर्शन करणारे सत्संग चालू झाले. या सत्संगांचा प्रसार करणे आणि संपर्क करणे, या माध्यमांतून साधकांना मोठ्या प्रमाणावर सेवा उपलब्ध झाली. प्रतिसप्ताह होणार्‍या या सत्संगांना शेकडोंची उपस्थिती लाभू लागली.

२ आ. विविध क्षेत्रांतील लोकांच्या वेगवेगळ्या समस्या आणि मानसिकता यांचा विचार करून सत्संग अन् शिबिरे चालू होणे आणि साधकांची समाजातील सर्व स्तरांतील लोकांशी जवळीक होऊ लागणे : ‘ऑनलाईन’ सत्संगांच्या अंतर्गत विविध क्षेत्रांतील लोकांच्या, उदा. उद्योगपती, आधुनिक वैद्य, अधिवक्ता, हिंदुत्वनिष्ठ, युवक, नातेवाईक आणि सनातनच्या जालस्थलावरून जोडले गेलेले ‘प्रोेफाईल मेंबर्स’ इत्यादींच्या वेगवेगळ्या समस्या आणि मानसिकता यांचा विचार करून त्यांच्यासाठी विविध सत्संग अन् शिबिरे चालू करण्यात आली. प्रतिदिन हे सर्व सत्संग ‘ऑनलाईन’ होत असल्याने समाजातील व्यक्तींना त्याला जोडणे, त्यातील तांत्रिक अडचणी पहाणे, सर्वांशी समन्वय करणे आणि ‘यू ट्यूब’च्या माध्यमातून त्यांचे प्रक्षेपण करणे’, यांसारख्या सेवाही मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या. यांतून धर्म आणि अध्यात्म प्रसारासमवेत सहस्रोेेे लोक साधना करू लागले. साधकांकडून शंकांचे निरसन करून घेणे, आलेले अनुभव सांगणे, ग्र्रंथ आणि सात्विक उत्पादनांची मागणी करणे आदींच्या निमित्ताने समाजातील लोक स्वतःहून संपर्क करू लागले. अशा प्रकारे साधकांची समाजातील सर्व स्तरांतील लोकांशी जवळीक झाली.

२ इ. धार्मिक उत्सवांच्या निमित्ताने समाजातील व्यक्ती आणि मंडळे यांना संपर्क करून प्रबोधन करणे अन् धर्मशास्त्र सांगणारी प्रवचने आयोजित केली जाणे : या कालावधीत साधकांना पुढील सेवाही उपलब्ध झाल्या.

१. धर्मावर होणार्‍या विविध आघातांच्या विरोधात ‘ऑनलाईन’ निषेध नोंदवणे, त्याचा प्रसार करणे आणि हिंदुत्वनिष्ठ अन् धर्माभिमानी यांना संपर्क करणे

२. ‘चर्चा हिन्दू राष्ट्र की ।’ या अंतर्गत घेण्यात येणार्‍या विशेष धर्मसंवादाच्या कार्यक्रमाचा प्रसार करणे

३. सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या विविध विषयांवरील अनमोल ग्रंथसंपदेचा प्रसार करणे

४. गुरुपौर्णिमेच्या कालावधीत ‘ऑनलाईन’ प्रसार करणे, अर्पण घेणे, साधना, तसेच गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगणारी प्रवचने घेणे आणि प्रत्यक्ष गुरुपौर्णिमेच्या दिवशीच्या कार्यक्रमाचा प्रसार करणे

५. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आदी धार्मिक उत्सवांच्या निमित्ताने समाजातील व्यक्तींना अन् मंडळांंना संपर्क करून प्रबोधन करणे अन् धर्मशास्त्र सांगणारी प्रवचने आयोजित करणे

६. याच कालावधीत ‘सनातन पंचांग २०२१’ हे वितरणासाठी उपलब्ध झाले. साधकांनी गणेशोत्सवापासून समाजातून याची ‘ऑनलाईन’ मागणी चालू केली. प्रत्येक जिल्ह्यातील साधकांनी समाजातील वाचक, हितचिंतक, धर्माभिमानी, हिंदुत्वनिष्ठ, विविध सत्संगांना जोडले गेलेले जिज्ञासू आणि नातेवाईक आदी सहस्रोे व्यक्तींना संपर्क करून ही मागणी घेतली. नंतर ऑक्टोबर २०२० मध्ये ‘सनातन पंचांग २०२१’चे वितरण करण्याची सेवाही मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली.

३. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चैतन्यमय वाणीतील नामजप ऐकत दिवसाचा आरंभ झाल्याने साधकांचा उत्साह दिवसभर टिकून रहाणे

याच कालावधीत प्रत्येक जिल्ह्यातील साधकांनी पहाटे ५ ते ६.३० या वेळेत कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सांगण्यात आलेला नामजप प्रतिदिन १ माळ करण्यास आरंभ केला. साधक सकाळी उठल्याउठल्या हा नामजप करू लागले. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चैतन्यमय वाणीतील हा नामजप ऐकून प्रतिदिन सर्व साधक तो नामजप करत आहेत. अशा प्रकारे दिवसाचा आरंभ आनंदी आणि चैतन्यमय वातावरणात झाल्याने साधकांचा उत्साह दिवसभर टिकून रहात आहे.

४. ‘ऑनलाईन’ सेवेतून साधकांची झालेली साधना

४ अ. ‘ऑनलाईन’ प्रसारसेवेतील चुका टाळण्यासाठी साधकांचे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे सत्संग चालू होणे अन् त्यामुळे चुकांचे चिंतन होऊन साधनेला गती मिळणे : अशा प्रकारच्या ‘ऑनलाईन’ प्रसाराची सेवा करण्याची सवय नसल्याने आरंभी साधकांकडून अनेक चुका झाल्या, उदा. कार्यक्रमाची ‘लिंक’ पाठवायला विसरणे, ती उशिरा पाठवणे, चुकीच्या व्यक्तींना ‘लिंक’ पाठवणे, एकाच व्यक्तीला अनेक जणांनी संपर्क करणे आणि उत्तरदायी साधकांना वेळेवर आढावा न देणे. त्यामुळे या चुकांचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना काढण्यासाठी स्वभावदोष अन् अहं यांचे निर्मूलन सत्संग नियमित चालू झाले. त्यामुळे साधकांना आपले ‘काय चुकत आहे’ आणि ‘त्यावर काय उपाययोजना केली पाहिजे ?’, हे सहज कळू लागले.

४ आ. ‘दळणवळण बंदी’च्या काळात उपलब्ध झालेल्या वेळेचा साधकांनी साधना वाढीसाठी लाभ करून घेणे : ‘दळणवळण बंदी’मुळे घरातील सर्वच मंडळी घरी होती. त्यामुळे ‘सकाळी लवकर उठून कामावर जाणे, शाळा-महाविद्यालयांमध्ये जाणार्‍यांसाठी जेवणाचे डबे करणे’, हे सर्व थांबले होते. मंडईत जाणे, भाजीपाला आणणे, नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींच्या घरी जाणे, लग्नसमारंभ इत्यादी सर्वच बंद असल्याने साधकांना साधनेसाठी पुष्कळ वेळ उपलब्ध झाला. साधकांनी साधना वाढवण्यासाठी याचा लाभ करून घेतला.

४ इ. घरी राहून सेवा करणार्‍या साधकांना सत्संगांचा लाभ होऊन त्यांच्या साधनेला गती येणे : ‘दळणवळण बंदी’च्या पूर्वी घरी राहून सेवा करणार्‍या सर्वच साधकांना अशा सत्संगांना प्रत्यक्ष उपस्थित रहाता येत नव्हते. आता घरबसल्याच सर्व उपलब्ध होत असल्याने त्यांना अशा सत्संगांना उपस्थित रहाणे आणि ही प्रक्रिया समजणे सोपे झाले आहे. यामुळे त्यांच्या साधनेला गती आली आहे.

४ ई. वैयक्तिक अडचणींमुळे घराबाहेर पडता न येणार्‍या साधकांना साधना करणे शक्य होऊ लागणे : पूर्वी प्रसारातील साधकांना घरातून बाहेर पडून संपर्कसेवा करण्यासाठी अनेक घंटे द्यावे लागत. संपर्कार्ंंची पूर्वसिद्धता, तसेच प्रवास करणे, यांतही पुष्कळ वेळ जात असे. संबंधित व्यक्ती न भेटल्यास सेवेची फलनिष्पत्तीही न्यून होत असे. आता मात्र श्रम, वेळ आणि पैसा सर्वच वाचू लागले आहे. ज्या साधकांना घरातून बाहेर पडण्यास वैयक्तिक अडचणी अथवा विरोध होता, त्यांनाही आता साधना करणे सहज जमू लागले आहे. महिलांना स्वयंपाक आणि घरातील अन्य कामे करतांना ‘ऑनलाईन’ सत्संगात सहभागी होणे सोपे झाले. देवाने सर्वच साधकांकडून या कालावधीत पुष्कळ सेवा करून घेतली. त्यामुळे साधकांचे सेवेचे घंटे पुष्कळ वाढले.

४ उ. प्रतिदिन साधकांचा साधनेविषयीचा आढावा चालू झाल्याने त्यांचे साधनेतील सातत्य वाढणे : प्रत्येक जिल्ह्यातील साधकांचा प्रतिदिन साधनेचा आढावा चालू झाला आणि त्यांना साधनेविषयी मार्गदर्शन मिळू लागले. ‘साधना आणि सेवा या अंतर्गत काय केले पाहिजे आणि काय नको?’, ते सहज उपलब्ध झाले. त्यामुळे त्यांच्या व्यष्टी साधनेतील सातत्य वाढून सेवेसह त्यांची साधनाही चांगली होऊ लागली.

४ ऊ. केवळ एकदाच संपर्क करूनही चांगले जिज्ञासू सत्संगाला उपस्थित राहू लागणे आणि परात्पर गुरुदेवांच्या संकल्पाने प्रसारकार्य होत असल्याची अनुभूती आल्याने साधकांचा अहंभाव अन् कर्तेपणा न्यून होऊ लागणे : या कालावधीत केवळ एकदाच केलेल्या संपर्काने किंवा ‘व्हॉट्स अ‍ॅप’द्वारे पाठवलेल्या केवळ एका ‘लिंक’द्वारेसुद्धा जिज्ञासू सत्संगाला सहज जोडले जाऊ लागले. पूर्वी घरोघरी जाऊन, पुष्कळ प्रसार करूनही प्रवचनाला उपस्थिती अल्प असायची; परंतु आता केवळ एका लघुसंदेशामुळे शेकडो ते सहस्रो जिज्ञासू प्रवचनाला उपस्थित राहू लागले, तसेच ते नंतरच्या सत्संगांनाही जोडले जाऊ लागले. अधिवक्ते, आधुनिक वैद्य, हिंदुत्वनिष्ठ, उद्योगपती आणि नातेवाईक अशा विविध गटांसाठी घेण्यात येणार्‍या सत्संगांना लक्षणीय उपस्थिती लाभू लागली. यामुळे साधकांचा उत्साह वाढला. केवळ आणि केवळ ‘परात्पर गुरुदेवांच्या संकल्पामुळे हे सर्व होत आहे’, हेे साधकांच्या लक्षात आले. ‘उपस्थिती वाढण्यामागे स्वतःचे काहीच प्रयत्न नाहीत’, हे लक्षात आल्याने साधकांचा अहंभाव आणि कर्तेपणा न्यून होण्यासह परात्पर गुरुदेवांवरील श्रद्धेत वाढ झाली.

४ ए. ‘ऑनलाईन’ प्रसारसेवा करता येण्यासाठी साधकांनी अनेक सेवा शिकून घेतल्याने परिणामकारक प्रसार होणे : सर्वच प्रसार ‘ऑनलाईन’ झाल्यामुळे साधक ‘व्हॉट्स अ‍ॅप’, ‘फेसबूक’,‘ट्विटर’ इत्यादींद्वारे प्रसार करण्यास शिकले. अगदी वयोवृद्ध साधिका आणि अल्प शिक्षण झालेले साधकही हे सर्व शिकून प्रसार करू लागले. साधक आणि समाजातील व्यक्ती यांना भ्रमणभाषवरील प्रणालीद्वारे जोडणे, मोजक्या शब्दांत बोलणे आणि सुसूत्रपणे लघुसंदेश पाठवणे इत्यादी सेवा साधकांनी अल्प कालावधीत शिकून घेतल्या. त्यामुळे त्यांच्याकडून परिणामकारक प्रसार होऊ लागला. ६० वर्षांवरील साधिकाही ‘फेसबूक’ आणि ‘ट्विटर’ या माध्यमांद्वारे प्रसार करू लागल्या.

४ ऐ. ‘ऑनलाईन’ स्वरक्षण प्रशिक्षण आणि प्रथमोपचार वर्गही चालू होणे : काही मासांनंतर ‘दळणवळण बंदी’ उठली; पण त्यानंतर प्रसाराचा वेग न्यून न होता तो अधिक वेगवान झाला आहे. पुष्कळ व्यक्ती संस्थेच्या कार्याला जोडल्या जात आहेत. नवनवीन सत्संग चालू होत आहेत. ‘ऑनलाईन’ स्वरक्षण प्रशिक्षण आणि प्रथमोपचार वर्गही चालू झाले आहेत. त्याला साधकांकडून आणि समाजातूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

५. तीव्र आपत्काळात परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांकडून साधना करून घेतल्याने साधकांना साधनेचे ५० पटींनी अधिक फळ मिळणे

सध्याच्या तीव्र आपत्काळात परात्पर गुरुदेवांनी साधकांना सेवेची संधी देऊन त्यांच्याकडून साधना करून घेतली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि तीव्र आपत्काळात साधना करणार्‍यांना त्याचे ५० पटींनी अधिक फळ मिळत आहे. सेवेचा कालावधी वाढणे, सेवा साधना म्हणून करण्यास शिकणे आणि त्याचे फळ अनेक पटींनी मिळणे, यांमुळे साधकांची साधनेची स्थिती चांगली होत आहे. सेवा मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ‘त्या कशा पूर्ण कराव्यात ?’, याचे नियोजन करतांना साधकांच्या प्रार्थना, शरणागती, देवाला आळवणे इत्यादींमध्ये वाढ झाली. ‘सर्व काही देवाच्या कृपेने होत आहे’, या जाणिवेने कृतज्ञताभावही वाढला.

६. परात्पर गुरु डॉक्टरांच्या आपत्काळातील दिव्य नियोजनासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता !

परात्पर गुरुदेवांच्या कृपेने साधकांच्या सेवेचा कालावधी पुष्कळ वाढून त्यांची चांगली साधना होऊ लागली. भगवंताने, म्हणजेच परात्पर गुरुदेवांनी तीव्र आपत्काळात साधकांवर केलेला हा अखंड कृपेचा वर्षावच आहे. जे कित्येक वर्षांत शक्य झाले नाही, ते परात्पर गुरु डॉक्टरांंनी ‘दळणवळण बंदी’च्या ६ – ७ मासांच्या कालावधीत शक्य करून दाखवले. याविषयी त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे ! परात्पर गुरु डॉक्टरांचे आपत्काळातील हे दिव्य नियोजन आणि त्यांची कृपा यांसाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

इदं न मम् ।
श्रीगुरुचरणार्पणमस्तु ॥

– (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (७.१२.२०२०)

धारिकेचे संकलन करतांना साधिकेला आलेली अनुभूती

‘परात्पर गुरुमाऊलींच्या संकल्पामुळे या धारिकेचे संकलन करत असतांना मी आणि सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ यांची मने जुळून आम्हाला एकाच वेळी सूत्रे सुचली. त्यामुळे ही धारिका लवकर पूर्ण झाली. मला आजपर्यंत अशा पद्धतीने धारिकेचे संकलन करायला समजत नव्हते. आज मला विनासायास आकलन होत गेले, ही माझ्यासाठी फार मोठी अनुभूती आहे. यासाठी गुरुदेव आणि सद्गुरु राजेंद्रदादा यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

‘हे गुरुमाऊली, यापुढेही संकलनाची सेवा अशाच रितीने आपल्या अस्तित्वाची अनुभूती घेत करता येऊ दे, अशी आपल्या चरणी कृतज्ञतापूर्वक आणि शरणागतभावाने प्रार्थना आहे.’

– सौ. मनीषा दीपक परब, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१३.१२.२०२०))

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक