सद्गुरु सत्यवान कदम यांच्या वास्तव्याने आणि त्यांच्या प्रयत्नांनी अंतर्बाह्य सुंदर अन् चैतन्यमय झालेले कुडाळ सेवाकेेंद्र !
सद्गुरु सत्यवानदादा कुडाळ सेवाकेेंद्रात वास्तव्यास आले आणि त्यांनी सेवाकेेंद्राचे रूपच पालटून टाकले. कुडाळ सेवाकेेंद्रातील श्रीमती वैशाली पारकर यांनी उलगडलेली सद्गुरु दादांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. सेवाकेंद्राची आतून आणि बाहेरून स्वच्छता झाल्याने त्याचे रूप पालटून सर्व परिसर प्रसन्न वाटू लागणे
१ अ. आश्रमातील अनावश्यक साहित्य काढून परिसर स्वच्छ करून घेणे : ‘कुडाळ सेवाकेंद्रात रहायला आल्यावर सद्गुरु सत्यवानदादांनी सेवाकेंद्राच्या बाहेरच्या परिसरातील अनावश्यक झाडे काढून टाकणे, आवश्यक झाडे लावून घेणे, तसेच बागेत असलेले अनावश्यक सामान आणि फरशांचे तुकडे काढून टाकणे, यांकडे कटाक्षाने लक्ष दिले अन् सर्व परिसर स्वच्छ करून घेतला. हे सर्व ते सातत्याने करत आहेत. त्यांनी विहिरीभोवती असलेली मोठी झाडे काढून काही झाडे दुसरीकडे लावली आणि विहिरीभोवती छोटी फुलझाडे लावून घेतली. त्यामुळे आता विहिरीकडे पाहिल्यावर प्रसन्न वाटत आहे.
१ आ. प्रत्येक खोलीचे स्वतः निरीक्षण करून साहित्य योग्य प्रकारे लावून घेणे : सेवाकेंद्रातील अनावश्यक सामान काढून घेणे, ‘कोणते सामान कुठे ठेवायचे ?’, हे ठरवून ते योग्य ठिकाणी लावून घेणे, या सर्व गोष्टीही त्यांनी केल्या. प्रत्येक खोलीचे स्वतः निरीक्षण करून सामान योग्य प्रकारेे लावून घेतले आणि सेवाकेंद्रातील सर्व भाग स्वच्छ करून घेतला.
२. स्वतःच्या कृतीतून साधकांना सर्व कृती ‘नीटनेटकेपणा’ने करण्यास शिकवणारे सद्गुरु सत्यवानदादा !
‘नीटनेटकेपणा’ हा सद्गुरु दादांचा गुणच आहे. ते स्वतःची कामे स्वतः करतात. आपल्या कपड्यांची इस्त्री स्वतःच करतात. ‘ते प्रत्येक कृती नीटनेटकेपणाने करतात’, हे त्यांच्या कपड्यांकडे पाहूनच लक्षात येते.
अ. साधकांच्या खोलीत अव्यवस्थितपणा आढळल्यास सद्गुरु दादा साधकांना त्यांची चूक लक्षात आणून देऊन साहित्य नीट लावून घेतात.
आ. स्वयंपाकघरात भांडी अव्यवस्थित ठेवलेली दिसली, तर ते स्वतःच ती लावतात. त्यांनी तेथील मोठी भांडी, उदा. स्टीलचे पिंप बाहेर व्यवस्थित रचून ठेवले. देवीच्या ओट्याखालचा भाग स्वच्छ करून घेतला. स्वयंपाकघरातील कापड वाळत घालण्यासाठी बाहेर स्टँड ठेवून घेतला. त्यामुळे आता स्वयंपाकघरात प्रसन्न वाटते.
३. साधकांवरील प्रीती
३ अ. आजारी साधकांची प्रेमाने काळजी घेणे : एखाद्या साधकाला बरे वाटत नसेल, तर ते त्याची चौकशी करतात. त्याच्यावर वेळीच औषधोपचार होण्यासाठी प्रयत्न करतात. ‘आजारी साधकाला विश्रांती कशी मिळेल ?’, याकडे ते लक्ष देतात.
३ आ. सद्गुरु असूनही स्वयंपाकघरात जाऊन साहाय्य करणे : स्वयंपाकघरात एकच साधिका स्वयंपाक करत असेल, तर सद्गुरु दादा भाजी किंवा कांदा चिरून देतात, भाजी निवडून देतात. ‘आमटी-भाजी कशी करायची ?’, हेही त्यांनी शिकून घेतले आहे.
४. साधकांच्या साधनेची घडी बसवण्यासाठी केलेले प्रयत्न : ‘चुकांच्या मुळाशी कसे जायचे ?’, चूक स्वीकारल्यामुळे कोणते लाभ होतात ?’ इत्यादी अनेक सूत्रे त्यांनी आम्हाला समजावून सांगितली आहेत.
५. ‘परात्पर गुरु डॉक्टरांना आवडणारे रामफळ त्यांच्यापर्यंत पोचायला हवे’, याची सद्गुरु दादांची तळमळ !
परात्पर गुरु डॉक्टरांना आवडणारी कोणतीही वस्तू दिसली की, ‘ती गुरुदेवांना पाठवायला हवी’, असे ते म्हणतात, उदा. ‘गुरुदेवांना रामफळ आवडते’, हे त्यांना ठाऊक आहे. झाडावर रामफळ पिकू लागले. तेव्हा ‘‘रामफळे गुरुदेवांना पाठवायला हवीत. त्यांना ती पुष्कळ आवडतात’’, असे ते म्हणाले. ‘रामफळे गुरुदेवापर्यंत कशी पोचतील ?’, याकडे त्यांनी कटाक्षाने लक्ष दिले. नंतर सद्गुरु दादा आजारी पडले होते. त्यामुळे ते त्या झाडापर्यंत जाऊ शकत नव्हते. तेव्हा ‘‘रामफळ पहा. ती आता पिकली असतील, तर गुरुदेवांना पाठवायला हवीत’’, असे सांगत होते.
‘हे भगवंता, तुझ्याच कृपेमुळे सद्गुरु सत्यवान दादांविषयी हे चार शब्द लिहिता आले. त्याविषयी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्रीमती वैशाली पारकर, कुडाळ सेवाकेंद्र, सिंधुदुर्ग.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |