हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था हिंदु संस्कृती सर्वांपर्यंत पोचवण्याचे कार्य अत्यंत तळमळीने करत आहेत ! – पू. डॉ. संतश्री युधिष्ठिरलाल महाराज
हरिद्वार, १० एप्रिल (वार्ता.) – हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था हिंदु संस्कृती प्रत्येकापर्यंत पोचवण्याचे कार्य अत्यंत तळमळीने करत आहेत. आपले महान संस्कार सर्वांपर्यंत पोचवण्याचे हे कार्य उल्लेखनीय आहे, असे गौरवोद्गार छत्तीसगड (रायपूर) येथील शदाणी दरबार तीर्थचे नववे पिठाधीश पू. डॉ. संतश्री युधिष्ठिरलाल महाराज यांनी येथे काढले. हरिद्वार येथील शदाणी दरबार आश्रमामध्ये कुंभमेळ्याच्या निमित्त सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते. या वेळी स्वामी परमात्मानंद गिरि महाराज, विश्व हिंदु परिषदेचे उत्तराखंडचे उपाध्यक्ष श्री. प्रदीप मिश्रा आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे उपस्थित होते.
पू. डॉ. संतश्री युधिष्ठिरलाल महाराज पुढे म्हणाले, ‘‘ही प्रभु रामकृष्ण यांची जन्मभूमी असल्याने संपूर्ण विश्वाला संस्कार आणि आदर्श मूल्ये देणारे हे राष्ट्र आहे. महाकुंभला दैवी कृपेचे वरदान आहे. गंगेच्या माध्यमातून दैवी कृपा होत आहे. धर्म हाच (धर्माचरण) या भूमीला (निसर्गाला) सुस्थितीत ठेवत असतो. जेथे धर्माचरण होते, तेथे निसर्गाचा प्रकोप होत नाही.
हिंदूंनो जागे व्हा, नाही तर संपून जाल ! – स्वामी परमात्मानंद गिरि महाराज
काही संत आणि आम्हीही बोलत असतो की, हिंदूंनो जागे व्हा, नाही तर संपून जाल; परंतु असे असले, तरी सृष्टी संपली, तरी सनातन (हिंदु) धर्म संपणार नाही. सनातन (हिंदु) धर्माला संपवण्याचे कुणाचेही धाडस नाही. हिंदू राजकीयदृष्ट्या जागृत होत चालले आहेत. त्यामुळे हिंदूंचा संघटितपणा वाढून परिवर्तन दिसू लागले आहे.
समाजात धर्माचा (साधनेचा) प्रसार केल्यास हिंदूंमध्ये जागृती शक्य ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे
आपण स्वत:च्या मुक्तीसाठी कुंभमेळ्यात येतो. हिंदू आध्यात्मिकदृष्ट्या निद्रिस्त आहेत. त्यांना साधना सांगून जागृत करण्याची आवश्यकता आहे. आज हिंदु समाजाची अगदी छोट्या छोट्या गोष्टीत पराधीन मानसिकता दिसून येते. किती वेळ दूरचित्रवाणी किंवा भ्रमणभाष पहावा, याविषयी बुद्धीचा निश्चयही समाज करू शकत नाही, इतके पराधीन जन्महिंदू झाले आहेत. यावर उपाय म्हणून समाजात धर्माचा (साधनेचा) प्रसार केल्याने त्यांच्यामध्ये जागृती होणार आहे. ते धर्म आचरण करून अनुभवतील, तेव्हा ते धर्माचा प्रतिनिधी म्हणून समाजात जातील.
श्री. प्रदीप मिश्रा – सर्व सात्त्विक शक्ती एका व्यासपिठावर येण्याच्या कार्याला प्रारंभ झाला आहे.
विशेष : छत्तीसगड (रायपूर) येथील शदाणी दरबार तीर्थचे नववे पिठाधिश पू. डॉ. संतश्री युधिष्ठिरलाल महाराज हे विश्व हिंदु परिषदेच्या मार्गदर्शक मंडळाचे सदस्य आणि विश्व हिंदु परिषदेच्या उच्च अधिकार समितीचे सदस्य आहेत. |