‘कोरोना’चा वाढता संसर्ग लक्षात घेता ग्रीष्म ऋतूच्या पार्श्वभूमीवर आयुर्वेदाच्या दृष्टीने करण्याचे प्रतिबंधात्मक उपाय आणि पूर्वसिद्धता
१. कोरोनासंबंधी घालून दिलेल्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन करावे.
२. रोज रात्री झोपतांना सर्वांनी १ चमचा मेथीचे दाणे पाण्यासोबत गोळी गिळतो त्याप्रमाणे गिळावेत.
३. आंबट, खारट, तिखट आणि तेलकट पदार्थ टाळावेत.
४. सध्या उन्हाळा पुष्कळ तीव्र असल्याने उकळून गार केलेले भरपूर पाणी प्यावे; परंतु शीतकपाटातील (फ्रीजमधील) पाणी पिऊ नये.
५. ताप आला असल्यास हलका आहार म्हणून लाह्यांचे पीठ आणि साखर (पाण्यातून), कडधान्याचे सूप आणि वरण घ्यावे.
६. तहान शमवण्यासाठी कोकम सरबत, पन्हे, धने पाणी, सुगंधी फुले घातलेले पाणी प्यावे.
७. अडुळसा, पारिजातक, गुलाब, मोगरा, बहावा यांच्या फुलांचा गुलकंद करून दिवसाला सकाळी आणि सायंकाळी १ – १ चमचा खावा. (४ वाट्या फुले आणि १ वाटी साखर यांचे मिश्रण मिक्सरमध्ये लावावे. त्यानंतर ते बरणीत भरून १ आठवडा उन्हात ठेवावे. याने गुलकंद बनतो.) बाजारातील विकतचा गुलाबाचा गुलकंद घेतला तरी चालेल.
८. अधिक व्यायाम करणे, दूध घातलेला चहा पिणे हे टाळावे. (कोरा चहा घेतला, तर चालतो.)
९. चिवडा, तळलेले पदार्थ, तिखट, खारट, आंबट पदार्थ खाऊ नयेत.
१०. ज्यांना कोरोनाबाधित झाल्याचे निदान झाले आहे आणि जे न्यूमोनिया किंवा थकवा आदी लक्षणांमुळे रुग्णालयात भरती आहेत, अशांनी सुवर्ण मालिनी वसंतच्या २० गोळ्या विकत घ्याव्यात. पहिले ५ दिवस किंवा ताप आणि थकवा जाईपर्यंत प्रतिदिन १ – १ गोळी सकाळ-सायंकाळ घ्यावी. त्यानंतर पुढचे १० दिवस प्रतिदिन १ गोळी सकाळी घ्यावी. या गोळीमुळे कोरोनामध्ये लाभ होतो. याने थकवा किंव्हा न्यूमोनिया झाला असल्यास त्याची लक्षणे लवकर न्यून होण्यास साहाय्य होईल; परंतु मूत्रपिंडाशी संबंधित आजार असल्यास वरील गोळी घेण्यापूर्वी वैद्यांचा सल्ला घ्यावा.
११. ज्यांना ताप आहे किंवा थकवा आहे; परंतु ‘कोरोनाची लागण झालेली नाही’, असा ज्यांचा चाचणी अहवाल आहे, अशांनी सुवर्ण मालिनी वसंत १ गोळी ५ ते १० दिवस सकाळी एक याप्रमाणे घ्यावी. याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
१२. सुवर्ण मालिनी वसंत या गोळ्या पुष्कळ महाग असतात. त्यामुळे त्या आवश्यक असल्यासच (कोरोना संबंधी लक्षणे असल्यासच) घ्याव्यात. तब्येत चांगली असेल, तर या गोळ्या घेण्याची आवश्यकता नाही.
१३. या गोळ्या ज्या कंपनीच्या सर्वांत जास्त स्वस्त मिळतील, त्या घ्याव्यात. सर्वांची गुणवत्ता एकसारखीच असते. कंपनीच्या नावानुसार पैसे कमी जास्त असतात.
१४. सुवर्ण मालिनी वसंत यालाच सुवर्ण वसंत (बसंत) मालती किंवा स्वर्ण वसंत मालती असेही म्हणतात.
१५. शक्य असल्यास ‘पल्स ऑक्सिमीटर’ (pulse oxymeter) विकत घ्यावा आणि कोरोनासंबंधी लक्षणे असल्यास नियमित प्राणवायूची पातळी (oxygen level) तपासावी. प्राणवायूची पातळी (oxygen level) ९४ पेक्षा अल्प असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
१६. सर्वांनीच प्रतिदिन दिवसातून ५ – ५ मिनिटे असे तीन वेळा दीर्घ श्वास घ्यावा. हा श्वास घेतांना अधिकाधिक हवा फुप्फुसांत ओढून घ्यावी. ही हवा शक्य तेवढा वेळ आत धरून ठेवावी. (म्हणजे कुंभक करावा.) आणि नंतर ती सावकाश सोडावी. असे केल्याने फुप्फुसांची क्षमता वाढते. कोरोनामध्ये फुप्फुसे घट्ट होण्याची शक्यता असते. असे केल्याने ती शक्यता अल्प होते.
१७. भुकेच्या प्रमाणातच खावे. अती खाऊ नये.
– वैद्य मेघराज पराडकर (६.४.२०२१)
सूचनानागरिकांनी आपली वात-पित्त-कफ प्रकृती, आपल्या प्रदेशाचे भौगोलिक हवामान आणि आजाराची तीव्रता लक्षात घेऊन वैद्यांच्या मार्गदर्शनानुसार ही औषधे घ्यावीत. |