नागपूर येथे कोविड रुग्णालयातील भीषण आगीत ४ रुग्णांचा मृत्यू

ऑक्सिजन लावलेल्या २ रुग्णांचा धावपळीत मृत्यू

यापूर्वी कोविड रुग्णालयांना लागलेल्या आगीतून प्रशासनाने ना कोणता धडा घेतला, ना उपाययोजना काढल्या. त्यामुळेच परत परत अशी आग लागत आहे. अशा घटनांना उत्तरदायी असणार्‍यांवर सरकारने कठोर कारवाई करणे आवश्यक !

‘वेल ट्रीट’ कोविड रुग्णालय

नागपूर – अमरावती मार्गावरील वाडी येथील ‘वेल ट्रीट’ कोविड रुग्णालयात ९ एप्रिलच्या रात्री ८ वाजता लागलेल्या आगीत ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २७ रुग्णांना अन्य रुग्णालयात हालवण्यात आले आहे. दुसर्‍या माळ्यावरील अतीदक्षता विभागातील वातानुकूलित यंत्रात ‘शॉर्टसर्किट’ झाल्याने आग लागली. ऑक्सिजन लावलेल्या २ रुग्णांचा धावपळीत मृत्यू झाला, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. पालकमंत्री नितीन राऊत यांनी घटनास्थळी भेट देऊन जिल्हाधिकार्‍यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्हा शल्य चिकित्सकांकडून या घटनेची चौकशी करण्याचा आदेश राऊत यांनी दिला आहे. यात विद्युत् पुरवठा योग्य दर्जाचा होता कि नाही ? याची पडताळणी केली जाणार असून ‘फायर ऑडिट’चीही चौकशी होणार आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा केली असून साहाय्य केले जात असल्याचे सांगितले आहे. ‘या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांसमवेत माझ्या संवेदना आहेत. आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. घायाळ झालेल्यांना लवकर बरे वाटावे, यासाठी मी प्रार्थना करतो’, असे फडणवीस यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.