पू. डॉ. जयंत करंदीकर यांच्या आवाजातील दहा प्रकारचे ‘ॐ’कार नाद ऐकतांना वाईट शक्तींनी वापरलेली लढण्याची पद्धत आणि या कालावधीत साधकांना जाणवलेले त्रास

नृत्य आणि संगीत यांविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

संगीत आणि नृत्य यांवरील प्रयोगांच्या सूक्ष्माच्या संदर्भातील वार्ता (सूक्ष्म-वार्ता) !

या जगामध्ये काही गोष्टी डोळ्यांनी दिसतात, तर काही दिसत नाहीत. ‘ज्या गोष्टी डोळ्यांनी दिसत नाहीत, त्या अस्तित्वात नसतात’, असा अर्थ होत नाही, उदा. वारा डोळ्यांना दिसत नाही, म्हणजे ‘तो नाही’, असे नाही. साधनेमुळे जिवाची सात्विकता वाढू लागते. साधना जसजशी वृद्धींगत होत जाते, तसतशी स्थूल पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील ‘सूक्ष्मातील’ कळू लागते आणि एखाद्या गोष्टीतील चांगली अन् त्रासदायक स्पंदने जाणवू लागतात. सध्या समाज सात्विकतेपासून दूर चालला आहे आणि रज-तमात्मक चालीरिती समाजात दृढ होत आहेत. संगीत आणि नृत्य हे क्षेत्रही याला अपवाद नाही. हे समाजाला दाखवून देण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आम्ही संगीत आणि नृत्य यांवर संशोधनात्मक प्रयोग केले. जे आम्हाला सूक्ष्मातून जाणवले, ते समाजाला सांगण्यासाठी आणि ‘योग्य काय असायला हवे ?’ ते त्याला समजण्यासाठी, ते वैज्ञानिक उपकरणांद्वारेही सिद्ध करून दाखवले आहे. येथे केवळ ‘अयोग्य गोष्टींचा कसा परिणाम होतो ?’, हे दाखवून देणार्‍या, म्हणजेच सूक्ष्माच्या संदर्भातील काही वार्ता (सूक्ष्म-वार्ता) देत आहोत.

पू. डॉ. जयंत करंदीकर

पू. (डॉ.) जयंत करंदीकर यांचा परिचय

 पू. (डॉ.) जयंत करंदीकर हे नगर जिल्ह्यातील सुविख्यात आधुनिक वैद्य आणि हृदयरोग विशेषज्ञ होते. त्यांनी ३.१२.२०१७ या दिवशी देहत्याग केला. त्यांनी १५-१६ वर्षे पुष्कळ संशोधन करून ‘ॐ शक्ती व्हॉईस एनर्जी थेरपी’ (‘ॐ’ नादशक्तीद्वारे उपचार करणे) ही विश्‍वातील ‘होलिस्टिक अल्टरनेटिव्ह उपचार पद्धत’ विकसित केली. त्यामध्ये त्यांनी ‘ॐ’कार उच्चारण्याच्या ६४ पद्धती शोधून काढल्या. सखोल संशोधन आणि आध्यात्मिक साधना यांच्या माध्यमातून त्यांनी दुर्धर रोगाने पीडित अनेक रुग्णांना बरे केल्याची उदाहरणे आहेत.

 ‘ॐकार हा वैश्‍विक नाद असून त्यातून विश्‍वाची निर्मिती झाली. ॐकार निर्गुण आणि निराकार बीजमंत्र आहे. त्यात परमेश्‍वराचे निर्गुण तत्व अधिक प्रमाणात कार्यरत असल्याने ॐकारामुळे अधिक प्रमाणात नामजपादी उपाय होऊ शकतात. नगर येथील पू. डॉ. जयंत करंदीकर हे ६४ प्रकारे ॐकार म्हणतात. ‘ॐकारातील सात्विकतेचा वाईट शक्तींवर काय परिणाम होतो’, हे अभ्यासण्यासाठी २७.९.२०१७ या दिवशी सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेल्या साधकांना पू. डॉ. जयंत करंदीकर यांच्या आवाजातील १० ॐकार ऐकवण्यात आले. त्या वेळी लक्षात आलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे देत आहोत.

१. ॐकार ऐकतांना भूमीवर आडवे होऊन पाताळातून त्रासदायक शक्ती मिळवणे

ॐकार लावल्यावर ५ ते १० मिनिटांतच अनिष्ट शक्तींचा तीव्र त्रास असलेले काही साधक भूमीवर आडवे झाले. नंतर बरेच साधक झोपून मंत्र ऐकत होते. ‘ॐकारासह चालू असलेले युद्ध अधिक सूक्ष्म स्तरावरील असल्याने साधकांना त्रास देणार्‍या वाईट शक्ती भूमीवर आडवे होऊन पाताळातून त्रासदायक शक्ती मिळवत होत्या’, असे जाणवले.

२. एका ॐकाराची नक्कल करून प्रतिनाद निर्माण करणे

त्रास असलेल्या २ – ३ साधकांनी एका ॐकाराची नक्कल केली. साधकांना त्रास देणार्‍या वाईट शक्ती अशा प्रकारे प्रतिनाद निर्माण करून ॐकाराशी सूक्ष्मातून लढत होत्या.

३. खुर्चीवर तबल्याप्रमाणे हाताने वाजवून नाद उत्पन्न करून सात्विक नादाशी लढण्याचा प्रयत्न करणे

एक साधक खुर्चीवर बसून, खुर्चीच्या हातांवर तबल्याप्रमाणे वाजवून नाद उत्पन्न करून सात्विक ॐकाराशी सूक्ष्मातून लढत होता. त्याला सांगूनही तो वाजवणे बंद करत नव्हता. प्रयोगानंतर त्या साधकाने सांगितले की, पहिला ॐ कार जसा कानावर पडला, तशी सूक्ष्मातील वाईट शक्ती विव्हळल्याचे जाणवले.

३ अ. वाईट शक्तींनी साधकांना मानसिक त्रास देणे

ॐकार लावल्यावर त्रास असलेल्या साधकांपैकी कुणाचीही अधिक हालचाल दिसली नाही. ॐकार निर्गुणस्वरूप असल्याने वाईट शक्तींनाही निर्गुण स्तरावर लढावे लागले. त्यामुळे वाईट शक्तींनी ॐकाराच्या नादाशी आक्रमक नृत्य न करता साधकांना मानसिक स्तरावर त्रास देऊन, उदा. साधकांचे नकारात्मक विचार, चिडचिड, तसेच अस्वस्थता वाढवून युद्ध केले.

३ आ. वाईट शक्तींचा त्रास असलेल्या साधकांना झालेले त्रास

१. जवळजवळ सर्वच साधकांच्या नकारात्मक विचारांत वाढ झाली, तसेच त्यांची चिडचिड आणि अस्वस्थता वाढली.

२. एका साधकाला बराच वेळ ॐकाराचा नाद ऐकू येत नव्हता.

३. एका साधकाला ॐकार ऐकून भीती वाटली.

४. एका साधकाला काहीही सुचत नव्हते.’

निष्कर्ष

ॐकाराचा परिणाम अभ्यासण्यासाठी आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांच्या ॐकार ऐकण्यापूर्वी आणि ॐकार  ऐकल्यावर ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाच्या साहाय्याने सकारात्मक अन् नकारात्मक प्रभावळींचा अभ्यास करण्यात आला. त्यात ॐकार ऐकल्यावर या साधकांची नकारात्मकता मोठ्या प्रमाणात घटून सकारात्मकता वाढल्याचे प्रकर्षाने जाणवले.

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

– कु. तेजल पात्रीकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (७.११.२०१७)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक