उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेसाठी अनुमती घेणार्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंद !
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – कोरोनाचा संसर्ग वाढत असूनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे या कार्यक्रमासाठी अनुमती घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीकांत नारायण शिंदे यांच्या विरुद्ध तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत गर्दी केल्याप्रकरणी ८ दिवसांत हा तिसरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (केवळ गुन्हा नोंद करून वरवर कारवाई केल्याने राजकीय नेत्यांना पुनःपुन्हा गुन्हा करण्यास मोकळीकच मिळत आहे. त्यामुळे प्रशासन संबंधितांवर कठोर कारवाई कधी करणार ?, असा प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनात आल्यास चूक ते काय ? – संपादक)
या सभेमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर ठेवण्याविषयी निर्गमित केलेल्या आदेशाचे सभेच्या आयोजकांनी उल्लंघन केल्याने विस्तार अधिकारी बिभीषण रणदिवे यांनी श्रीकांत शिंदे यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाणे येथे तक्रार दिली आहे.