सिंधुदुर्गात कोरोनाचे ९२ नवीन रुग्ण
१. मृत्यू झालेले एकूण रुग्ण १९३
२. उपचार चालू असलेले रुग्ण ९१४
३. बरे झालेले एकूण रुग्ण ६ सहस्र ७३३
४. आतापर्यंतचे एकूण रुग्ण ७ सहस्र ८४६
५. चिंताजनक प्रकृती असलेले रुग्ण ११
जनतेला ई-संजीवनी ओपीडीचा लाभ घेण्याचे आवाहन
जिल्ह्यातील जनतेला घरीच सुरक्षित राहून वैद्यकीय अधिकार्यांशी उपचार करण्याविषयी सल्लामसलत करता यावी, यासाठी ई-संजीवनी कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या योजनेचा सद्यःस्थितीत ९२ लोकांनी लाभ घेतला आहे. नागरिकांनी ई-संजीवनी ओपीडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक यांनी केले आहे.
निर्बंधांना न जुमानता दुकाने चालू ठेवणार्या व्यापार्यांवर कारवाई
कुडाळ – शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे प्रशासन अधिक सतर्क झाले असून राज्यशासनाने दिलेल्या निर्बंधांची कार्यवाही नगरपंचायत प्रशासनाकडून केली जात आहे. नगरपंचायतीने ८ एप्रिल या दिवशी शहरातील अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकानदारांना दुकाने बंद करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या; मात्र या सूचनांकडे दुकानदारांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नितीन गाढवे यांनी कर्मचार्यांच्या साहाय्याने रस्त्यावर उतरून दुकाने बंद केली. ‘सूचना न पाळणार्यांवर गुन्हे नोंद केले जातील’, असेही मुख्याधिकारी नितीन गाढवे यांनी सांगितले. त्यामुळे बरीच दुकाने तात्काळ बंद करण्यात आली.
नियमांचे पालन करून दुकाने चालू ठेवण्याची अनुमती मिळावी, यासाठी जिल्हाधिकार्यांकडे मागणीचे निवेदन सादर
कुडाळ – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू केल्या जाणार्या दळणवळण बंदीमुळे सतत व्यापारी वर्गावर अन्याय होत आहे. ३० एप्रिलपर्यंत दळणवळण बंदी कालावधीत कुडाळ नगरपंचायत हद्दीतील दुकाने ‘अत्यावश्यक सेवा वगळता बंद’ ठेवण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. याचा छोट्या-मोठ्या दुकानदारांवर मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून येत आहे. दुकानांमध्ये काम करणार्या कर्मचार्यांचे वेतन, विजेचे देयक, दुकानाचे भाडे इत्यादी सर्व व्यापारी वर्गाला काही उत्पन्न नसतांना सोसावे लागत आहे. व्यापारी वर्ग आवश्यक त्या नियमांचे पालन करून त्यांची दुकाने चालू ठेवतील, याची काळजी आम्ही घेऊ. त्यांना आवश्यक त्या नियमाचे पालन करून दुकाने चालू ठेवण्याची अनुमती मिळावी, अशा मागणीचे निवेदन कुडाळचे माजी नगराध्यक्ष तथा भाजप तालुका अध्यक्ष विनायक राणे यांनी माननीय जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना दिले आहे.