सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्या अनमोल सत्संगामुळे आरंभी साधनेला स्वत:चा विरोध असूनही पूर्णवेळ साधना करण्याच्या निर्णयाप्रत पोचलेल्या डोंबिवली येथील सौ. नेहाली शिंपी !

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर मुंबईसारख्या मायानगरीत राहून मायेच्या दलदलीत फसलेल्या जिवांचा उद्धार होण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. त्यांनी साधनेचे पैलू पाडलेली अनेक साधक रत्ने परात्पर गुरुदेवांच्या चरणी अर्पण केली. त्यांच्या या गुरुकार्याच्या तळमळीला, परिश्रमाला आणि समष्टी प्रती असलेल्या त्यांच्या अपार प्रीतीला भावपूर्ण वंदन ! भवसागराच्या मायेत फसलेल्या आणि प्रारंभी साधनेला विरोध करणार्‍या डोंबिवली येथील सौ. नेहाली शिंपी यांना सद्गुरु अनुताईंनी त्यांच्या नकळत साधक बनवले आणि वेळोवेळी मार्गदर्शन करून पूर्णवेळ साधना करण्यास प्रवृत्त केले. सौ. नेहाली शिंपी यांच्या साधनेचा हा प्रवास येथे देत आहोत. काल ९ एप्रिलला या साधनाप्रवासातील काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.

भाग १ मार्गिका : https://sanatanprabhat.org/marathi/466706.html

४. पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेणे

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर

४ आ. सद्गुरु अनुताईंमुळेच चाकरी सोडण्यातील अडचणी दूर होऊन पैशांची आसक्तीही न्यून होणे : माझे आस्थापन पुष्कळ चांगले होते; पण माझा चाकरी सोडण्याचा विचार ठरल्यानंतर अकस्मात आमच्या कार्यालयात पुष्कळ अडचणी येऊ लागल्या. माझे दोन वरिष्ठ पालटले. त्यानंतर मला कार्यालयात पुष्कळ त्रास होऊ लागला. केवळ देवाच्या कृपेने आणि सद्गुरु अनुताईंना मी ‘मी चाकरी सोडणार आहे’, असे सांगितल्यामुळे मला या सर्व अडचणींमुळे होणार्‍या त्रासातून अलिप्त रहाता आले. आस्थापनाच्या नियमानुसार मला चाकरी सोडण्याच्या ३ मास आधी चाकरी सोडण्यासंबंधीचे सूचनापत्रही द्यावे लागले नाही. तेव्हा ‘मला येथे पुष्कळ त्रास होणार आहे’, हे कदाचित् सद्गुरु अनुताईंना आधीच कळले असणार’, असे मला जाणवले. मी चाकरी सोडण्याआधीच देवाने चाकरी आणि तिच्यातून मिळणारे पैसे यांची आसक्ती न्यून करून घेतली. त्यामुळे सद्गुरु अनुताईंची वरील भेट माझ्यासाठी फार विलक्षण आणि महत्त्वपूर्ण ठरली.

सौ. नेहाली शिंपी

५. संत असूनही साधकांची क्षमा  मागणार्‍या सद्गुरु अनुराधा वाडेकर !

मी चाकरी सोडून केंद्रातील सेवा चालू केल्यावर सारखे काही ना काही प्रसंग घडत होते. ते माझ्या मनात घोळत रहात होते; म्हणून मी सर्व प्रसंग लिहून सद्गुरु अनुताईंना संपत्राने (संगणकीय पत्राने) पाठवून दिले. त्या वेळी त्या इतर सेवेत व्यस्त असल्याने त्यांनी ते संपत्र उशिरा पाहिले. त्यानंतर सद्गुरु अनुताईंनी जवळ जवळ २ ते ३ घंटे मी आणि संबंधित साधक यांचा एकत्र सत्संग घेऊन आमचे प्रसंग हाताळले. त्या बैठकीच्या वेळी संपत्र पहाण्यास विलंब झाल्याविषयी त्यांनी माझी सगळ्यांसमोर क्षमाही मागितली. तेव्हा ‘त्या संत असूनसुद्धा किती नम्र आहेत !’, हे माझ्या लक्षात आले आणि ‘मी मात्र प्रसंगात अडकत रहाते’, या माझ्या चुकीची मला जाणीव झाली.

६. वेळोवेळी अडचणी सोडवून साहाय्य करणार्‍या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर !

६ अ. जुन्या घरी त्रास होत असल्याने सद्गुरु अनुताईंनी नवीन घर घेण्यास सांगणे : आमच्या जुन्या घरात मला पुष्कळ त्रास होत होते आणि ‘नवीन घर घ्यावे का ?’ असे विचार येत होते. मी ते सर्व त्रास आणि नवीन घर घेण्याचा विचार जिल्हासेवकांना लिहून दिला होता. त्यांनी ते लिखाण सद्गुरु अनुताईंना पाठवले होते. त्यानंतर काही दिवसांतच मला सद्गुरु अनुताईंचा भ्रमणभाष आला आणि त्यांनी मला नवीन घर घेण्यास सांगितले. तेव्हा ‘नातेवाईकसुद्धा करत नाहीत, इतका आमचा विचार सद्गुरु अनुताई करतात !’, असे वाटून मला देवाप्रती आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता वाटली. त्या वेळी ‘सद्गुरु अनुताई प्रत्येक साधकाची किती काळजी घेतात !’, हे माझ्या लक्षात आलेे.

६ आ. साधिकेला ‘डेंग्यू’ झाल्यावर सद्गुरु अनुताईंनी उपाय सांगणे आणि ते केल्यावर ६ ते ७ दिवसांतच बरे वाटल्याने आधुनिक वैद्यांनाही आश्‍चर्य वाटणे : एकदा मला डेंग्यू झाला होता. मी रुग्णालयात भरती झाले होते. चार दिवस झाले, तरी त्रास न्यून न होता वाढतच होता आणि रक्तातील ‘प्लेटलेेट्स’ फारच न्यून झाल्या. तेव्हा माझ्या बहिणीने सद्गुरु अनुताईंना उपाय विचारले. त्यांनी सांगितलेले उपाय करू लागल्यावर दुसर्‍याच दिवसापासून मला बरे वाटायला लागले आणि पुढील ३ ते ४ दिवसांतच मला रुग्णालयातून घरी सोडले. तेव्हा तेथील आधुनिक वैद्य माझ्या यजमानांना म्हणले, ‘‘या इतक्या लवकर बर्‍या कशा झाल्या ? अशी व्याधी असलेल्या रुग्णांना रुग्णालयात किमान १५ ते २० दिवस तरी रहावे लागते. पूर्ण बरे होणे तर दूरच; पण त्यांचे त्रास न्यूनही होत नाहीत.’’ तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘केवळ देवामुळे आणि सद्गुरु अनुताईंनी सांगितलेले उपाय अन् त्यांची प्रीती यांमुळे मी पटकन बरी झाले.’

६ इ. कौटुंबिक मतभेदाच्या वेळी संबंधितांना दोषांची जाणीव करून देऊन वैयक्तिक पेचप्रसंग सोडवणे : आमच्या कुटुंबियांमध्ये एकदा एक प्रसंग घडला होता. तेव्हा सद्गुरु अनुताई आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांनी मला आणि माझ्या बहिणीला एकत्र घेऊन ‘आम्ही दोघींनी त्या प्रसंगात काय करायला हवेे ?’, याविषयी मार्गदर्शन केले. त्या वेळी त्यांनी ‘आमच्या दोघींच्याही एकमेकींकडून अपेक्षा आहेत’, हे लक्षात आणून दिले. त्यानंतर अशा प्रकारच्या प्रसंगांच्या वेळी आम्हा दोघी बहिणींच्या मनात अपेक्षांचे किंवा इतर काही विचार आले, तर सद्गुरु अनुताईंचे मार्गदर्शन आठवते आणि त्या प्रसंगातील पेच सोडवता येतो.

७. सद्गुरु अनुताईंची अनुभवलेली प्रीती !

७ अ. सद्गुरु अनुताईंनी मुलीसाठी आठवणीने तिच्या आवडीचा खाऊ आणणे : एकदा सद्गुरु अनुताईंचे आमच्या घरी येण्याचे नियोजन केले होते. त्या दिवशी दिवसभर शिबिर होते. शिबिर संपायला उशीर झाल्याने त्या पुष्कळ उशिरा आमच्या घरी आल्या आणि सर्व सेवा संपवून रात्री १ वाजता परत जाण्यास निघाल्या. त्यांनी माझ्या मुलीसाठी (केतकीसाठी) तिला आवडणारे गुलाबजाम आणले होते. त्यांनी घरून निघतांना ते तिला दिले. ती फारच आनंदी झाली होती. त्यांनी आठवणीने मुलीसाठी खाऊ आणला, यासाठी मला फार कृतज्ञता वाटली. त्या वेळी ‘सद्गुरु अनुताई इतरांचा किती विचार करतात !’, असे वाटून माझी भावजागृती झाली.

७ आ. मुलीने काढलेल्या चित्रांचे कौतुक करणे : माझ्या मुलीला सद्गुरु अनुताई आणि पू. (सौ.) जाधवकाकू या दोघींंविषयी पुष्कळ प्रेम आहे. ती सतत त्यांच्यासाठी काही तरी बनवत असते. ती वेगवेगळी चित्रे काढून ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर सद्गुरु अनुताईंना पाठवते. त्याही तिला छान प्रतिसाद देतात. एकदा माझ्या मुलीने त्यांच्यासाठी भेटकार्ड सिद्ध करून ते त्यांना पाठवले. तेव्हा त्यांनी भ्रमणभाष करून तिचे पुष्कळ कौतुक केले आणि नंतर आठवणीने तिला खाऊ पाठवला.

७ इ. मुलीला त्रास होत असतांना तिला नामजप करण्यास प्रेमाने समजावून सांगणे : एकदा आम्ही बाहेर फिरायला गेलो असतांना अचानक माझ्या मुलीच्या छातीत दुखायला लागले होते. त्यासाठी मी ज्या साधकांकडे आध्यात्मिक उपायांची सेवा आहे, त्यांना मुलीसाठी सद्गुरु अनुताईंना उपाय विचारण्यास सांगितले. सद्गुरु अनुताईंनी उपाय सांगितले आणि मला त्यांना भ्रमणभाष करण्याचा निरोपही दिला. मी सद्गुरु अनुताईंना भ्रमणभाष केल्यावर त्या माझ्या मुलीशी पुष्कळ वेळ बोलल्या. त्यांनी तिची पुष्कळ प्रेमाने विचारपूस केली. ‘तिला काय त्रास होत आहे ?’, हे तिच्याकडून जाणून घेतले आणि ‘नामजप कसा करायचा ?’, हेही तिला समजावून सांगितले.

७ ई. पू. (सौ.) जाधवकाकू संत झाल्यावर त्यांच्याविषयी लिहून दिलेल्या लिखाणाचे पुष्कळ प्रेमाने कौतुक करणे : सौ. संगीता जाधवकाकू संत झाल्यावर सद्गुरु अनुताईंना फार आनंद झाला होता. मी पू. (सौ.) जाधवकाकूंविषयी लिखाण पाठवले होते. त्यानंतर माझी सद्गुरु अनुताईंशी भेट झाल्यावर त्यांनी मला घट्ट मिठी मारली. त्या मला म्हणाल्या, ‘‘तू किती छान लिहून दिले आहेस !’’ तेव्हा सौ. जाधवकाकू संत झाल्याचा आनंद त्यांच्या तोंडवळ्यावरून भरभरून ओसंडून वहातांना दिसत होता.

७ उ. मनात पुष्कळ अनावश्यक विचार वाढल्यावर सद्गुरु अनुताईंनी उपाय करण्यास सांगणे आणि ‘देवाचे तुझ्याकडे लक्ष आहे’, असे सांगून आश्‍वस्त करणे : एकदा माझ्या मनामध्ये पुष्कळ अनावश्यक विचार येत होते. ‘ते विचार सद्गुरु अनुताईंना सांगूया’, असे मला वाटत होते; पण ‘कसे सांगू ?’, असे मला वाटले. शेवटी मी लघुसंदेश करून त्यांना माझ्या मनातील विचार सांगितले. तेव्हा त्यांनी लगेच उत्तर दिले आणि उपाय करण्यास सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘देवाचे तुझ्याकडे लक्ष आहे.’’ तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

७ ऊ. भाचीने पूर्णवेळ साधना करण्याचे ठरवल्यावर तिच्या आईवडिलांच्या शंका दूर करतांना पू. (सौ.) संगीता जाधव यांनी त्यांना सद्गुरु अनुताईंचे उदाहरण देणे, सद्गुरु अनुताईंनीही भाचीच्या निर्णयाचे कौतुक करणे आणि साधनेचे महत्त्व तिच्या पालकांच्या मनावर बिंबवणे : माझ्या भाचीने पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला होता. तिच्या आई-वडिलांच्या (माझी मोठी बहीण आणि तिचे यजमान यांच्या) मनात काही शंका होत्या. तेव्हा सद्गुरु अनुताईंनी त्यांना भेटायला बोलावले आणि देवाच्या कृपेने मलाही त्यांच्यासमवेत येण्यास सांगितले. तिथे गेल्यावर पू. (सौ.) जाधवकाकूंनी सद्गुरु अनुताईंचेच उदाहरण दिले. त्या म्हणाल्या, ‘‘त्यांनी कशी साधना केली आहे, ते पहा.’’ सद्गुरु अनुताई तेव्हा बहिणीला म्हणाल्या, ‘‘तुमची मुलगी पूर्णवेळ साधना करू इच्छिते. तुम्ही भाग्यवान आहात. देवाने अशी मुलगी तुम्हाला दिली आहे.’’ सद्गुरु अनुताई आणि पू. (सौ.) जाधवकाकू यांनी आम्हाला विचारले, ‘‘आपल्याला आपले मूल कोण झालेले आवडेल ? आधुनिक वैद्य, अभियंता कि स्वामी विवेकानंद ?’’ त्यानंतर माझी बहीण आणि तिचे यजमान यांचे विचार पालटले. त्यांच्या मनातील पुष्कळ शंका दूर झाल्या. त्या वेळी ‘माझ्या मुलीचे भविष्य काय असावे ?’, याविषयी मलाही एक निश्‍चित दृष्टीकोन मिळाला. ‘तिने केवळ साधनाच करावी आणि स्वामी विवेकानंद व्हावे’, असे मला वाटले.

८. सद्गुरु (कु.) अनुताई घरी आल्यावर जाणवलेली सूत्रे

८ अ. साधनेची तळमळ वाढून परात्पर गुरुदेवांना प्रार्थना केल्यावर पूर्वनियोजन नसतांना सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) जाधवकाकू निवासासाठी घरी येणे : एक दिवस मी पुष्कळ कळकळीने परात्पर गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘मला आता साधनेत पुढे जायचे आहे. मला आता इथे रहायचे नाही.’ त्याच दिवशी कुठेलेही पूर्वनियोजन नसतांना अचानक सद्गुरु अनुताई आणि पू. (सौ.) जाधवकाकू ३ दिवसांसाठी माझ्या घरी रहायला आल्या. तेव्हा ‘देव कसे लगेच ऐकतो ?’, याची मला अनुभूती आली.

८ आ. सद्गुरु अनुताई आणि पू. (सौ.) जाधवकाकू यांच्याशी बोलल्यावर यजमानांची पूर्णवेळ साधना करण्याची मनाची सिद्धता होणे : मला ‘पूर्ण वेळ साधना करावी’, असे वाटत होते; पण ‘माझ्या यजमानांना काय वाटते ?’, हे मला ठाऊक नव्हते. यजमानांनाही ‘काय निर्णय घ्यावा ?’, हेे ठरवता येत नव्हते. तेव्हा ‘सद्गुरु अनुताई आणि पू. (सौ.) जाधवकाकू आपल्या घरी रहायला येतील, तेव्हा या विषयावर आपण त्यांच्याशी बोलूया’, असे आम्ही ठरवलेे. त्यासाठीच जणू देवाने त्यांना पूर्व नियोजन नसतांनाही आमच्या घरी पाठवले होते. सद्गुरु अनुताई आणि पू. (सौ.) जाधवकाकू यांच्याशी बोलल्यावर यजमानांचा पूर्णवेळ साधना करण्याचा लगेचच निश्‍चय झाला आणि ‘आपण पूर्णवेळ साधना करण्याची लगेच सिद्धता करूया’, असे त्यांनी मला सांगितले.

९. साधकांची साधना होण्यासाठी अथक प्रयत्न करणार्‍या सद्गुरु अनुताई !

सद्गुरु अनुताईंंना सर्व साधकांच्या साधनेची पुष्कळ काळजी असते. ‘सर्व साधकांनी वेळोवेळी आढावा द्यावा’, यासाठी त्यांनी एक कार्यपद्धत सिद्ध केली आहे. तिचा साधकांना पुष्कळ लाभ होत आहे. पू. (सौ.) जाधवकाकू साधकांना सतत सांगत असतात, ‘सद्गुरु अनुताई आहेत ना; म्हणून आपली साधना व्यवस्थित चालू आहे. त्यांची आपल्यावर फार कृपा आहे.’

१०. परात्पर गुरुदेवांच्या आठवणीने सतत कृतज्ञताभावात असलेल्या सद्गुरु अनुताई !

साधक नेहमी कुठलीही गोष्ट झाल्यावर सद्गुरु अनुताईंना म्हणतात, ‘हे तुमच्यामुळे झाले.’ तेव्हा त्या लगेच म्हणतात, ‘देवामुळे हे झाले आहे.’ सद्गुरु अनुताई सतत कृतज्ञताभावात असतात. ‘त्यांना परात्पर गुरुदेवांची सतत आठवण येते’, असे जाणवते. सद्गुरु अनुताईंच्या साधना प्रवासाच्या ध्वनीचित्रचकतीतील एक वाक्य माझ्या मनावर कोरले गेले आहे. त्यात सद्गुरु अनुताई म्हणतात, ‘साधनेत मला काय मिळेल, हेे मला ठाऊक नाही; पण जे काही मिळेल, ते फार अनमोल असेल !’

११. समाजातील लोकांनाही जाणवलेले सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) जाधवकाकू यांचे संतत्व आणि महत्त्व !

सद्गुरु अनुताई आणि पू. (सौ.) जाधवकाकू माझ्या घरी साधारण दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास आल्या होत्या. आमच्या इमारतीमध्ये एका माळ्यावर ४ सदनिका आहेत आणि त्या सर्वांमध्ये पुष्कळ अंतर आहे. सद्गुरु अनुताई आणि पू. (सौ.) जाधवकाकू उद्वाहनानेे वर आल्या, तेव्हा आमच्या शेजारच्या सदनिकेत रहाणार्‍या एका काकूंनी त्यांच्या दारातून त्या दोघींना बघितले. त्यानंतर त्या काकूंनी भेटल्यावर मला विचारले, ‘‘त्या दिवशी तुझ्या घरी आलेल्या त्या दोघीजणी कोण होत्या ?’’ मी त्यांना सांगितले, ‘‘त्या संत आहेत. त्या सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना आणि सेवा करतात.’’ तेव्हा त्या काकू लगेच मला म्हणाल्या, ‘‘मलाही त्यांना बघून वाटले, ‘या पुष्कळ नामस्मरण करत असाव्यात. या कुणीतरी मोठ्या व्यक्ती असाव्यात.’’

माझ्यासाठी ही फार मोठी अनुभूती होती. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘समाजातील लोकांना आपल्या संतांचे संतत्व लगेच लक्षात येते; परंतु आपण मात्र त्यांचा लाभ करून घेण्यास न्यून पडतो.’

‘परमदयाळू गुरुमाऊली, तुम्ही मला सद्गुरु अनुताईंच्या सहवासात ठेवले आहे. ‘यापेक्षा अजून काही मागावे’, असे मला वाटत नाही. आता त्यांना अपेक्षित अशी साधना तुम्हीच माझ्याकडून करवून घ्या’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’

(समाप्त)

– सौ. नेहाली राकेश शिंपी, डोंबिवली (२९.३.२०१९)

पू. अनुताई, तुम्ही जणू परात्पर गुरुदेवांचे रूप सुंदर ।

पू. अनुताईरूपी रत्नाने प्रकाशिले आमच्या जीवना ॥
प्रीतीच्या वर्षावाने न्हाऊ घातले आम्हा सर्वांना ॥ १ ॥

साधनेच्या या मार्गावर आहे तुमचाच आधार ॥
तुम्ही जणू परात्पर गुरुदेवांचे रूप सुंदर ॥ २ ॥

(सद्गुरु अनुताई या ‘सद्गुरु’ होण्याआधीची ही कविता आहे; म्हणून यात ‘पू. अनुताई’ असे लिहिले आहे.)

– सौ. नेहाली राकेश शिंपी, डोंबिवली (२९.३.२०१९)

प्रत्येक साधकाची विहंगम गतीने प्रगती होण्यासाठी झटतात सद्गुरु अनुताई ।

मुंबई, ठाणे, रायगड, गुजरातच्या तुम्ही आध्यात्मिक आई ।
पू. (सौ.) संगीता जाधव काकू आणि सद्गुरु अनुताई ॥ १ ॥

स्मरण केले त्यांचे, तरी मनाला मिळते शांती ।
केवळ त्यांच्या अस्तित्वाने दूर होते भीती ॥ २ ॥

आजकाल सख्ख्या आईचीसुद्धा आठवण येत नाही ।
मायेतील कुठल्याही नात्याची आवश्यकता वाटत नाही ॥ ३ ॥

कधी आले जरी निराशेचे विचार त्यांना सर्व आधीच कळते ।
प्रश्‍न विचारण्याआधीच उत्तर त्यांनी दिलेले असते ॥ ४ ॥

व्यष्टीची घडी बसवून समष्टी करवून घेतात ।
रात्रं-दिवस साधकांच्या प्रगतीचा विचार करतात ॥ ५ ॥

पू. जाधवकाकू साधकांना जवळ आणतात ।
सद्गुरु अनुताई त्यांची सुंदर माळ ओवतात ॥ ६ ॥

ही माळ कृतज्ञतापूर्वक गुरुचरणी अर्पण करतात ।
प्रत्येक साधकाची विहंगम गतीने प्रगती होण्यासाठी झटतात ॥ ७ ॥

कृपाळू गुरुदेवांच्या चरणी अर्पण करते प्रत्येक शब्द ।
सद्गुरु अनुताई आणि पू. जाधवकाकू यांचा लाभला दिव्य सत्संग ॥ ८ ॥

परात्पर गुरुदेवांच्या चरणी केवळ कृतज्ञ, कृतज्ञ आणि कृतज्ञ ।

– सौ. नेहाली राकेश शिंपी, डोंबिवली (२९.३.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक