‘मिलिटरी डिरेक्ट’ संकेतस्थळाचे चिनी सैन्याविषयीचे चुकीचे निष्कर्ष आणि युद्धात पराक्रमी ठरणारे भारतीय सैन्य !
१. ‘मिलिटरी डिरेक्ट’ या संकेतस्थळाने काढलेले सर्वच निष्कर्ष चुकीचे !
‘चीनचे सैन्य हे जगात सर्वाधिक सामर्थ्यवान आहे’, असा निष्कर्ष ‘मिलिटरी डिरेक्ट’ या संकेतस्थळाने नुकताच काढला आहे. त्यांच्या मते दुसर्या क्रमांकावर अमेरिका, तिसर्या क्रमांकावर रशिया आणि चौथ्या क्रमांकावर भारत आहे. हे विश्लेषण करतांना त्यांनी त्या त्या देशाची आर्थिक स्थिती, सैन्यबळ आणि त्यांच्याकडे असलेली शस्त्रे हे घटक विचारात घेतले. त्यांनी काढलेले जवळजवळ सर्वच निष्कर्ष चुकीचे आहेत. सर्वांत महत्त्वाची गोेष्ट, म्हणजे केवळ सैन्य आणि शस्त्रास्त्रे यांची संख्या अधिक असल्याने कुणालाही युद्ध जिंकता येत नाही. गलवान खोर्यात चीनने ६० ते ७० सहस्र सैन्य, तोफखाना, रणगाडे, क्षेपणास्त्रे आणली होती. त्या ठिकाणी त्यांची अत्याधुनिक लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स आणि ड्रोन हेही आलेले होते. एवढे होऊनही त्यांना काहीच करता आले नाही आणि मुकाट्याने परत जावे लागले.
२. भारतीय सैनिक शूर आणि देशभक्त असल्याने ते महापराक्रमी आहेत !
युद्धात शस्त्रास्त्रांपेक्षा ते चालवणारे सैनिक अधिक महत्त्वाचे असतात. इतिहासातही हे सिद्ध झालेे आहे. भारतीय सैन्याला युद्ध करण्याचा भरपूर अनुभव आहे. ते तंदुरुस्त, शूर आणि देशभक्त आहेत. हे गुण चिनी सैन्याकडे नाहीत. भारतीय सैन्यातील कनिष्ठ स्तरावरील नेतृत्व पुढे राहून नेतृत्व करते. त्यामुळे भारतीय सैन्य महापराक्रम गाजवते. चिनी सैनिक लढू शकत नाहीत; कारण ते शहरांमध्ये रहाणारे आहेत. चीनच्या ‘वन चाईल्ड’ धोरणामध्ये ते जन्माला आले आहेत. प्रत्येकाला सैन्यात भरती होणे बंधनकारक असल्याने ही मुले केवळ २ ते ३ वर्षांसाठी सैन्यात भरती होतात. त्यामुळे त्यांच्यात लढण्याची इच्छाशक्ती नाही. त्यांचे लक्ष हे सैन्य सोडून अन्य गोेष्टींकडे अधिक असते.
३. युद्ध जिंकण्यासाठी आधुनिक शस्त्रास्त्रांसह सैनिकांचे शौर्य उपयोगी ठरते !
अमेरिकेेचे वायूदल अतिशय अत्याधुनिक आहे. त्याचा त्यांना अनेक वर्षांचा अनुभव आहे. अमेरिका अनेक वर्षांपासून अफगाणिस्तानमध्ये वायूदलाचा वापर करत आहे; तरीही ती युद्ध जिंकू शकली नाही. अमेरिका आणि रशिया दोन्ही महाशक्ती आहेत. त्यांनी अफगाणिस्तानमध्ये लढण्याचा प्रयत्न केला; पण ते तेथून पराभूत होऊन परत गेले; कारण अफगाण्यांनी अधिक शौर्य गाजवले. हाच प्रकार व्हिएतनाममध्ये घडला. तेथे अमेरिका आणि फ्रान्स यांनी त्यांचे सामर्थ्य वापरून जिंकण्याचा प्रयत्न केला; पण ते जिंकू शकले नाहीत. त्यामागेही व्हिएतनामी सैन्याचे शौर्य आणि नेतृत्व हेच कारण आहे. अलीकडेच अझरबैजान आणि आर्मेनिया यांच्यात युद्ध झाले. आर्मेनियाकडे रशियन बनावटीची अत्याधुनिक शस्त्रास्त्रे होती; मात्र तुर्कस्तानने केवळ ड्रोनच्या साहाय्याने त्यांचा पराभव केला. तात्पर्य, युद्ध जिंकण्यासाठी केवळ आधुनिक शस्त्रे वापरणे पुरेसेे ठरत नाही.
४. नौदल युद्धाविषयी ‘मिलिटरी डिरेक्ट’चा निष्कर्ष चुकीचा, तर चीनचा पराभव करणे भारताला सहज शक्य असणे
‘मिलिटरी डिरेेक्ट’ या संकेतस्थळाने असाही निष्कर्ष काढला की, ‘चीनचे नौदल अतिशय सामर्थ्यवान असल्याने तो युद्ध जिंकू शकतो.’ चीनला तिन्ही बाजूंनी भूमी आहे, तर एका बाजूने समुद्र आहे. त्यांचा ८० ते ९० टक्के व्यापार हा मलाक्का सामुद्री धुनी येथून चालतो. तेथे त्यांचा व्यापार थांबवणे भारताला सहज शक्य आहे; कारण भारताचे अंदमान आणि निकोबार हे द्वीपसमूह त्या सामुद्री धुनीपासून केवळ १५० ते २०० सागरी मैल अंतरावर आहेत. त्यामुळे नौदल लढाईच्या वेळेस त्यांना भारत कधीही थोपवू शकतो. चीनकडे अत्याधुनिक नौदल असले, तरी त्यांच्याकडे समुद्रात लढण्याचा अनुभव नाही. त्यांच्याकडे २ ‘एअरक्राफ्ट कॅरियर’ असले, तरी ते किनारपट्टी सोडून अन्य ठिकाणी गेले नाहीत. चीन शेवटची लढाई ही वर्ष १९७८ मध्ये व्हिएतनामच्या विरोधात लढला होता. त्यात तो पराभूत झाला होता. त्यामुळे सैनिकांची संख्या, तसेच आधुनिक शस्त्रास्त्रे अधिक असणे आणि लष्करी बजेट अधिक असणे, हे युद्ध जिंकण्यासाठी अजिबात पुरेसे नाही. युद्ध जिंकण्यासाठी शस्त्रास्त्रांसह शूर आणि देशभक्त सैनिक हवेत. त्याच्या जोडीला कनिष्ठ आणि वरिष्ठ स्तरावर चांगले नेतृत्व हवे. ज्या वेळी या सगळ्यांचा योग्य मिलाप होतो, तेव्हाच युद्ध जिंकता येते. त्यामुळे या संकेतस्थळाने काढलेला निष्कर्ष पूर्णत: चुकीचा आहे. भारतीय सैन्य चीनच्या विरोधात देशाचे रक्षण कधीही करू शकते, हे नुकतेच सिद्ध झालेले आहे.
५. सैनिकांना चांगले नेतृत्व असेल, तर युद्ध जिंकता येते !
वर्ष १९६७ मध्ये भारताच्या नाथुला भागात चीनने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी भारताचे सेनानी जनरल सगत सिंह यांनी आक्रमक कारवाई करून चीनला दणका दिला होता. तेव्हा ३५० ते ४०० चिनी सैनिक मारले गेले होते. एवढेच नव्हे, तर अरुणाचल प्रदेशच्या सुमदोरांग चूमध्ये चीनने आगळीक करायचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्यांची जनरल सुंदरजी यांच्याशी गाठ पडली होती. सुंदरजी यांनी आक्रमक कारवाई करून त्यांना परत जायला भाग पाडले होते. डोकलाममध्येही हेच झाले आणि लडाखमध्येही हेच होत आहे; म्हणून युद्ध जिंकण्यासाठी केवळ संख्या नाही, तर सैनिक आणि नेतृत्व हे अतिशय महत्त्वाचे आहे.
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे