पाकला विनामूल्य लस पुरवण्याऐवजी आधी भारतियांना कोविडची लस द्या !
काँग्रेसचे पुणे येथील ‘सिरम’समोर आंदोलन
हडपसर (पुणे), ९ एप्रिल – पाकिस्तानला विनामूल्य कोरोना लस देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतल्याविषयी मांजरी येथील ‘सिरम’ इन्स्टिट्यूट आस्थापनाच्या प्रवेशद्वारावर निषेधाचे फलक दाखवत पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने ८ एप्रिल या दिवशी आंदोलन करण्यात आले. ‘हडपसर मतदारसंघात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून जम्बो कोविड रुग्णालय हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर सारख्या मैदानावर तातडीने चालू करण्यात यावे, भारतीय सैनिकांचे बळी घेणार्या पाकिस्तानला विनामूल्य लस पुरवण्याऐवजी सरसकट सर्व वयोगटांतील देशातील जनतेला विनामूल्य कोविडची लस उपलब्ध करून द्यावी’, अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. या वेळी हडपसर मतदारसंघाचे अध्यक्ष अमित घुले, युवक काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष राहुल शिरसाठ, तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.