ऑक्सिजनचा १०० टक्के पुरवठा वैद्यकीय क्षेत्राला देण्याचा राज्यशासनाचा आदेश !- राजेंद्र शिंगणे, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री
मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधित रुग्णांना लागणारी ऑक्सिजनची आवश्यकता लक्षात घेऊन राज्यातील ऑक्सिजन निर्माण करणार्या आस्थापनांना १०० टक्के ऑक्सिजन वैद्यकीय क्षेत्रासाठी देण्याचा आदेश राज्यशासनाने दिला आहे, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीमध्ये दिली.
याविषयी अधिक माहिती देतांना राजेंद्र शिंगणे म्हणाले, ‘‘मागील काही दिवसांपासून राज्यातील काही भागांमध्ये ‘रेमडेसिविर’ आणि ऑक्सिजन यांचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी येत आहेत. राज्यात ७-८ आस्थापने मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचे उत्पादन करत आहेत. त्यांना लागेल ते साहाय्य शासन करत आहे. राज्यात मासाला १२ सहस्र ८७ मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होते. त्यांपैकी ९२३ मेट्रिक टन ऑक्सिजन मागील आठवड्यात वापरला गेला. कोरोनाबाधित रुग्णांसमवेत ऑक्सिजनचा वापरही वाढणार आहे. सद्यःस्थितीत उत्पादनात फार वाढ होईल, असे वाटत नाही. त्यामुळे अन्य राज्यांतून ऑक्सिजन मिळावा, यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. मध्यप्रदेशमधून ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. गुजरात आणि छत्तीसगड या राज्यांतूनही ऑक्सिजन मिळवण्याचे प्रयत्न चालू आहेत.’’