प्रदूषित हवेमुळे महाराष्ट्रात प्रतिवर्षी १ लाख ८० सहस्र नागरिकांचा मृत्यू !
वायूप्रदूषणावरील चर्चासत्रात तज्ञांनी उपस्थित केलेले ‘लॅन्सेट हेल्थ जर्नल’च्या अहवालामधील सूत्र
मुंबई – जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार हवेच्या प्रदूषणामुळे जगभरात प्रतिवर्षी ७० लाख लोक मरण पावतात, तर ‘लॅन्सेट हेल्थ जर्नल’च्या अहवालानुसार महाराष्ट्रात हवेच्या प्रदूषणामुळे प्रतिवर्षी १ लाख ८० सहस्र नागरिकांचा मृत्यू होतो. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने ७ एप्रिल या दिवशी वातावरण फाऊंडेशनच्या वतीने ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हवा प्रदूषणाचे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम’ या विषयावर ‘ऑनलाईन’ चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात सहभागी तज्ञांनी वरील आकडेवारी मांडली.
वायूप्रदूषणामध्ये उत्तरप्रदेशच्या खालोखाल महाराष्ट्र हे दुसर्या क्रमांकाचे राज्य आहे. राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती कार्यक्रमाच्या अंतर्गत निश्चित करण्यात आलेली मानके पूर्ण न करू शकलेली १९ शहरे महाराष्ट्रात आहेत. वर्ष २०२४ पर्यंत या शहरांतील २० ते ३० टक्के प्रदूषण न्यून करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, याविषयावरही या चर्चासत्रात चर्चा झाली.
या वेळी डॉ. समीर अर्बट म्हणाले, ‘‘वायूप्रदूषण हे फुप्फुसांच्या रोगप्रतिकारक क्षमतेवर आघात करते. त्यामुळे श्वसनाच्या गंभीर विकारांना सामोरे जावे लागते. वायूप्रदूषण आणि कोरोना यांचा थेट संबंध स्पष्ट झाला नसला, तरी येणार्या काळात कोरोनानंतर सर्वांत मोठी महामारी हवा प्रदूषणाच्या रूपाने येईल.’’
डॉ. संदीप साळवी म्हणाले, ‘‘केवळ औद्योगिक क्षेत्र, वाहने यांतून वायूप्रदूषण होत आहे, असे समजणे चूक ठरेल. घरात डासांची एक ‘कॉईल’ जाळल्याने निघणारा धूर १०० सिगारेटच्या धुराइतका असतो. चुलीवरील स्वयंपाकामधून धूर निघतो. श्वास घ्यायला त्रास होणारा ‘सी.ओ.पी.डी.’ हा रोग सर्वाधिक मृत्यू होण्यामध्ये क्रमांक २ चे कारण आहे.’’
मुंबई येथील नानावटी रुग्णालयातील बालरोगतज्ञ डॉ. अदिती शहा म्हणाल्या, ‘‘नवजात बालकांमध्ये ६ मासांपर्यंत फुप्फुसांचा पूर्णत: विकास झालेला नसतो. लहान मुलांचा संपर्क प्रदूषित हवेशी आला, तर त्यांना कायमस्वरूपी फुप्फुसासंबंधी विकारांना सामोरे जावे लागू शकते.’’