पुणे येथे शासनाच्या निर्णयाविरोधात आंदोलन करणार्या व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद राका यांच्यासह ५० ते ६० व्यापार्यांवर गुन्हे नोंद !
पुणे, ९ एप्रिल – ‘मिनी लॉकडाऊन’च्या नावाखाली दिवसभर दुकाने आणि व्यापारी आस्थापने बंद ठेवण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात आंदोलन करणारे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद राका यांच्यासह ५० ते ६० व्यापार्यांवर आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी गुन्हे नोंद केले आहेत. विश्रामबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस हवालदार गणेश तुर्के यांनी या प्रकरणी सरकारच्या वतीने तक्रार दिली आहे. जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवा वगळता पुण्यातील इतर दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सरकारने हा निर्णय मागे घेऊन व्यापार्यांना दुकाने उघडण्यासाठी अनुमती द्यावी, या मागणीसाठी ८ एप्रिल या दिवशी व्यापार्यांनी लक्ष्मी रस्त्यावर आंदोलन केले होते.