गोवा येथील शंकर पालन रुग्णाईत असतांना त्यांची सेवा करतांना त्यांचा मुलगा आणि सून यांना संतांच्या कृपेची आलेली प्रचीती !
रामनाथी आश्रमात पूर्णवेळ सेवा करणार्या कु. योगिता पालन यांचे वडील शंकर पालन यांचे ३०.३.२०२१ या दिवशी निधन झाले. त्यांना अनेक प्रकारची शारीरिक दुखणी होती आणि त्यांचे देहप्रारब्ध पुष्कळ तीव्र होते. ते स्वतः नामजप करत नसल्यामुळे ‘त्यांना प्रारब्धभोग भोगण्याचे बळ मिळावे’, यासाठी एका संतांनी त्यांच्या साधक मुलाला आणि सुनेला मार्गदर्शन केले. त्याचा लाभ होऊन त्यांना वडिलांची शुश्रूषा सेवाभावाने करता आली. १०.४.२०२१ या दिवशी त्यांचा मृत्यूनंतरचा १२ वा दिवस आहे. त्या निमित्ताने शंकर पालन यांचा मुलगा आणि सून यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. वडील श्री. शंकर पालन यांचे तीव्र देहप्रारब्ध !
‘माझे वडील श्री. शंकर पालन यांचे देहप्रारब्ध तीव्र होते. त्यांना फार पूर्वीच हृदयविकाराचे ३ झटके येऊन गेले होते. गेली ५ वर्षे त्यांना ‘व्हेरिकोज व्हेन्स’मुळे चालायला त्रास व्हायचा. वर्ष २०१४ मध्ये त्यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणार्या मुख्य रक्तवाहिनीला सूज आली. वर्ष २०१७ मध्ये त्यांची ‘अॅन्जिओप्लास्टी’ झाली. वर्ष २०१८ मध्ये त्यांना ‘पार्किन्सन्स डिसीज’ (शरिराचे स्नायू कडक होऊन स्नायूंची लवचिकता नष्ट होणे) झाला होता. त्यांचे देहाच्या क्रियांवर नियंत्रण राहिले नव्हतेे. गेले वर्षभर त्यांना बोलता येत नव्हते. त्यामुळे ‘काय त्रास होत आहे ?’, हेही सांगता येत नव्हते. मागील अडीच मासापासून ते पूर्णपणे अंथरूणाला खिळून होते. त्यांना हात-पायही हलवता यायचे नाहीत. अशा प्रकारे बाबा तीव्र प्रारब्ध भोगत होते.’ – श्री. विनोद पालन (मुलगा), फोंडा, गोवा.
२. सासर्यांच्या आजारपणात अनुभवलेली गुरुकृपा !
२ अ. संतांनी ‘सासर्यांचे प्रारब्ध तीव्र असून दत्ताचा नामजप अखंड केल्यास त्यांना प्रारब्ध भोगण्याची शक्ती मिळेल’, असे सांगणे : ‘श्री. विनोद (यजमान) यांनी सासर्यांना (बाबांना) होणार्या त्रासाविषयी एका संतांना सांगितले. तेव्हा संतांनी ‘‘त्यांचे प्रारब्ध तीव्र आहे. ते स्वतः नामजप करत नसल्यास त्यांच्या खोलीमध्ये आणि घरातही ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप अखंड लावून ठेवा आणि त्यांची सेवा करणार्या कुटुंबियांनी वैखरीतून दत्ताचा नामजप करा. असे केल्याने त्यांचा बाबांशी असलेला देवाण-घेवाण हिशोब लवकर फिटेल आणि त्यांना प्रारब्ध भोगण्याची शक्ती मिळेल’’, असे सांगितले.
२ आ. सासर्यांचा शारीरिक त्रास वाढणे; मात्र गुरुकृपेने संतांनी प्रारब्ध सुसह्य होेण्याचा मार्ग दाखवल्यामुळे भावाने सेवा घडू शकणे : त्यानंतर बाबांचा शारीरिक त्रास वाढला होता; परंतु ‘तो सहन करण्याची त्यांना शक्तीही मिळत होती’, असे मला वाटले. ‘गुरु काय करू शकतात ?’ हे यातून मला शिकायला मिळाले. बाबा स्वतः नामजप करत नसल्याने त्यांना त्यांचे भोग भोगण्यासाठी बळ तरी कुठून मिळणार ?; परंतु गुरुकृपेने त्यांचे भोग लवकर भोगून संपण्यासाठी संतांनी मार्ग दाखवला. त्यामुळेे आपोआपच त्यांची सेवा करणारे कुटुंबीयही ईश्वराच्या अनुसंधानात राहू शकले. त्यातून कुटुंबियांची साधनाही झाली आणि आपोआपच भावनेचे रूपांतर भावामध्ये व्हायला साहाय्य झाले.
२ इ. संतांनी सासर्यांची सेवा ‘संतसेवा’ या भावाने करण्यास सांगणे : श्री. विनोद पूर्णवेळ साधना करू लागल्यावर ठाणे येथे सेवेसाठी गेले होते. त्या वेळी आमच्या कुटुंबाला एका संतांचा भावसत्संग लाभला. ते आम्हाला म्हणाले, ‘‘तुम्ही ते (सासरे) संत आहेत’, असा भाव ठेवून त्यांची सेवा करा.’’
२ ई. ‘संतसेवा’ या भावाने सासर्यांची सेवा केल्यावर शक्ती मिळून सहजतेने सेवा करू शकणे : पूर्वी बाबांची सेवा करतांना काही वेळा ते हट्टीपणा करायचे. आमचे ऐकायचे नाहीत. कधी कधी माझी प्राणशक्ती न्यून असायची. तेव्हा मला त्यांचे आवरायला जमायचे नाही. तेव्हा ‘संतानी त्यांची सेवा ‘संतसेवा’, या भावाने करायला सांगितली आहे. तेच माझ्याकडून ही सेवा करवून घेतील’, असा विचार माझ्या मनात यायचा. नंतर माझ्याकडून त्यांचे सहजतेने आवरले जायचे. त्या वेळी ‘ही माझी शक्ती नाही’, असे माझ्या लक्षात यायचे. बाबा पुष्कळ वेळा अंथरुणात लघवी करायचे. त्यामुळे प्रत्येक दिवशी अनेक वेळा त्यांचे कपडे धुवायला लागायचे. कधी कधी ते पलंगावरून पडायचे. तेव्हा मला आणि सासूबाईंना त्यांना उचलणे कठीण व्हायचे. गुरुदेवांना प्रार्थना करून वैखरीतून नामजप करत त्यांना उचलतांना आम्हाला वेगवेगळ्या युक्त्या सुचायच्या आणि त्यांना उचलणे सोपे व्हायचे.
२ उ. सासरे रात्रभर कण्हत असणे; पण नंतर त्याचा त्रास न वाटणे : बाबांना दुखणे असह्य होत असल्याने रात्रभर ते कण्हायचे. तेव्हा आरंभी सासूबाईंना झोप यायची नाही. नंतर ‘देव आमचे देवाणघेवाण हिशोब फेडून घेत आहे’, असा विचार केल्याने आवाजाचे काही वाटेनासे झाले. गुरुदेवांना ‘तुम्हीच त्यांना त्रास सहन करण्याची शक्ती द्या’, अशी प्रार्थना केली जायची.
संतांशी झालेल्या भेटीत त्यांना सासर्यांंच्या सेवेविषयी सांगितले होते, तेव्हाच त्यांनी ‘ती सेवा करण्यासाठी मला शक्तीही दिली होती’, असे आता माझ्या लक्षात येत आहे. नाहीतर कोरोनाच्या कालावधीत त्यांना सांभाळणे अशक्यच होते. केवळ संतांनी दिलेल्या शक्तीमुळे ते शक्य झाले.’ – सौ. वेदिका विनोद पालन (सून), फोंडा, गोवा.
३. बाबांना काही आकृत्या दिसत असणे आणि सद्गुरु (कु.) अनुराधाताई यांनी सांगितलेला उपाय केल्यावर त्रास न्यून होणे
‘बाबांना सूक्ष्मातील काही आकृत्या दिसायच्या. खिडकीत ३ जण बसलेले दिसायचे. या त्रासांवर मात करण्यासाठी सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी ‘१० दिवस कावळ्याला दहीभात ठेवा’, असे सांगितले. १० दिवस हा उपाय केल्यावर त्यांना होणारा हा त्रास थांबला.
४. वडिलांच्या मृत्यूपूर्वी जाणवलेली सूत्रे
४ अ. बाबांच्या मृत्यूपूर्वी ८ दिवस पू. कुसुम जलतारेआजी शेजारी त्यांच्या मुलीकडे रहायला येणे आणि ‘मृत्यूच्या वेळी बाबांना अधिक क्लेश होऊ नयेत, यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी संतांना पाठवले’, असे वाटणे : बाबांच्या मृत्यूपूर्वी ८ दिवस पू. कुसुम जलतारेआजी आमच्या शेजारी, म्हणजे त्यांच्या मुलीकडे (सौ. माया पिसोळकर यांच्याकडे) रहायला आल्या. बाबांच्या मृत्यूच्या २ – ३ दिवस अगोदर त्या आमच्या घरी यायच्या आणि बाबांच्या खोलीकडे पाहून त्यांची विचारपूस करायच्या. बाबांचा मृत्यू होण्याच्या दिवशी सकाळीच पू. जलतारेआजींनी अकस्मात् त्यांच्या मुलाला (श्री. योगेश जलतारे यांना) ‘मला आश्रमात सोड’, असे सांगितले. बाबांचा मृत्यू झाला, त्याच वेळी त्या घरातून बाहेर पडल्या. जणू काही ‘खडतर प्रारब्ध भोगून जीव जातांना बाबांना आणखी काही त्रास होऊ नये’, यासाठीच देवाने त्यांना इथे पाठवले होते’, असे मला वाटले. ‘गुरुदेवांना प्रत्येक जिवाची किती काळजी आहे ?’, हे लक्षात येऊन मला त्यांच्याप्रती फार कृतज्ञता वाटली.
५. वडिलांच्या मृत्यूच्या वेळी
५ अ. मृत्यूच्या दिवशी बाबा पुष्कळ अस्वस्थ असणे, नंतर त्यांना उलटी होणे आणि रुग्णालयात भरती करायला नेण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवणे : बाबांचा मृत्यू झाला, त्या दिवशी सकाळी त्यांना पुष्कळ अस्वस्थ वाटत होते. त्यांना बोलता येत नसल्यामुळे ‘त्यांना काय होत आहे ?’, ते आम्हाला कळत नव्हते. सकाळी त्यांच्या घशातून वेगळा आवाज येऊ लागला आणि त्यांना उलटी झाली. त्यांना होणार्या उलट्या थांबत नसल्याने त्यांना रुग्णालयात भरती करायचे ठरवले. दुपारी रुग्णालयात जाण्यापूर्वी बाबा वेगळा आवाज करायला लागले. तेव्हा त्यांचा रक्तदाब पहातांना त्यांच्या हृदयाचे ठोके ऐकायला येत नव्हते आणि नाडीही लागत नव्हती. त्यानंतर अकस्मात् ते शांत झाले. तेव्हा आम्ही सर्वांनी त्यांना हाक मारली. त्यांनी एकदाच सर्वांकडे पहिले आणि ‘डोळे उघडे असतांनाच त्यांची प्राणज्योत निघून गेली’, असे आमच्या लक्षात आले.
५ आ. ‘अॅम्ब्युलन्स’ घरी पोचण्यापूर्वीच बाबांचा मृत्यू होणे : बाबांना रुग्णालयात भरती करण्यासाठी घरी ‘अॅम्ब्युलन्स’ बोलावली होती; मात्र त्यांना आमच्या घरचा मार्ग सापडत नव्हता. ‘अॅम्ब्युलन्स’ घरी पोचण्याच्या ४ – ५ मिनिटे आधीच बाबांनी प्राण सोडला. ‘अॅम्ब्युलन्स’ वेळेत पोचली असती, तर बाबांचा मृत्यू एकतर ‘अॅम्ब्युलन्स’मध्ये झाला असता किंवा रुग्णालयात झाला असता !
५ इ. संतांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे बाबांकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटणे आणि ‘त्यांची सेवा करतांना ‘संतसेवा’ करत आहोत’, असा विचार मनत येणे : एका संतांनी ‘बाबांचे प्रारब्ध तीव्र आहे’, असे सांगितल्यानंतर बाबांकडे पहाण्याचा माझा दृष्टीकोन पूर्णपणे पालटला. त्यांची सेवा करतांना आपण ‘संतसेवा’ करत आहोत’, असा विचार मनामध्ये रहायचा. त्यांची स्थिती फार वेदनादायी आहे. ‘त्यांना अधिकाधिक साहाय्य कसे करू शकतो ?’, असा विचार माझ्या मनात यायचा.
‘संतांच्या एका वाक्याचा किती परिणाम होतो’, हे यातून मला शिकायला मिळाले. ‘संतांच्या कृपेनेच बाबांचे देहप्रारब्ध न्यून झाले आणि ते भोगण्याची त्यांना शक्ती मिळाली’, याची मला प्रकर्षाने जाणीव झाली.
६. मृत्यूनंतर जाणवलेले सूत्र
बाबांचा मृत्यू झाल्यानंतर ते एकदम शांत वाटत होते. आधी फार कष्ट झाल्यावर आणि सर्व कष्ट संपल्यावर जसे समाधानी अन् शांत वाटते, तसा त्यांचा तोंडवळा दिसत होता. त्यांच्या तोंडवळ्यावर वेगळे तेजही जाणवत होते.’ – श्री. विनोद पालन (मुलगा), फोंडा, गोवा. (६.४.२०२१)
|