कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन ‘जम्बो कोविड सेंटर’ उभारा !
आमदार प्रशांत ठाकूर यांची महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी
पनवेल – येथील महानगरपालिका क्षेत्रात कोविड रुग्णांची प्रतिदिन वाढती संख्या लक्षात घेऊन त्यांच्यावर त्वरित उपचार होण्याच्या दृष्टीने महापालिका क्षेत्रात सुसज्ज ‘जम्बो कोविड सेंटर’ उभारण्यात यावे, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांनी ८ एप्रिल या दिवशी महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की,…
१. महानगरपालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून वैद्यकीय उपचार देण्यास शासकीय यंत्रणा अल्प पडत आहे. अनेक खासगी रुग्णालये आणि ‘कोविड सेंटर’मध्ये ऑक्सिजन अन् खाट उपलब्ध नसल्याने रुग्णांना उपचाराअभावी जीव गमवावा लागत आहे. ही वस्तुस्थिती आहे.
२. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात अनेकांच्या नोकर्या गेल्या असून काहींना अतिशय तुटपुंज्या वेतनावर, तसेच उद्योगधंदा सुरळीत नसल्यामुळे उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे.
३. खासगी रुग्णालयांत उपचारासाठी आकारण्यात येणारा व्ययही न परवडणारा असल्यामुळे रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत आहे.
तरी या वस्तुस्थितीचा गांभीर्याने विचार करून महानगरपालिका क्षेत्रात ‘जम्बो कोविड सेंटर’ निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे तात्काळ सादर करावा.