सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने करण्यात आले अनी आखाड्यांच्या पेशवाईंचे स्वागत !
हरिद्वार, ८ एप्रिल (वार्ता.) – सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने अनी आखाड्यांच्या सर्व पेशवाईंचे स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे या आखाड्यांच्या साधूसंतांचा पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला. या पेशवाईमध्ये महामंडलेश्वर, महंत आणि शेकडो भक्तगण सहभागी होते. अखिल भारतीय श्री पंच निर्वाणी, निर्मोही आणि दिगंबर आखाड्यांच्या पेशवाईंचा प्रारंभ भूपतवाला दुर्गादास आश्रम येथून होऊन बैरागी आखाड्याच्या ठिकाणी शेवट झाला.
या पेशवाईचे स्वागत करण्यासाठी सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी ‘स्वागत फलक’ हातात धरले होते. अखिल भारतीय श्री पंच निर्मोही अनी आखाड्याचे अध्यक्ष श्री महंत रामजीदासजी महाराज आणि श्री महंत राजेंद्रदासजी महाराज, अखिल भारतीय श्री पंच निर्वाणी अनी आखाड्याचे अध्यक्ष श्री महंत धर्मदासजी महाराज अन् अन्य संत यांचा हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी पुष्पहार घालून सन्मान केला, तसेच पेशवाईतील अन्य महामंडलेश्वरांना पुष्पहार घालून त्यांचे आशीर्वाद घेतले. सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी आदरपूर्वक नमस्कार करून या पेशवाईचे स्वागत केले.
क्षणचित्रे
१. स्वागताच्या वेळी अनेक संत सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या स्वागत फलकाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या साधकांकडे पाहून हात वर करून आशीर्वाद देत होते.
२. पेशवाईच्या प्रारंभी आखाड्याचे महत्त्वाचे श्री महंत, महामंडलेश्वर आणि संत यांचे स्वागत श्री. सुनील घनवट यांनी केले. त्या वेळी श्री महंत राजेंद्रदास यांनी श्री. घनवट यांचा सत्कार केला.
३. विविध चौकांमध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे स्वागतफलक साधकांनी हातात धरल्यामुळे चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले होते. लोकांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.