हिंदु जनजागृती समिती करत असलेले हिंदु राष्ट्र जागृतीचे कार्य आवश्यक ! – आखाड्याच्या प्रमुखांचे प्रतिपादन
हरिद्वार येथे चालू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’
कुंभमेळ्यामध्ये निर्वाणी, निर्मोही आणि दिगंबर आखाड्याच्या प्रमुखांची भेट
हरिद्वार, ८ एप्रिल (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हरिद्वार येथे चालू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ राबवले जात आहे. या संपर्क अभियानाच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी अखिल भारतीय श्री पंच निर्वाणी अनी आखाडा, अखिल भारतीय श्री पंच निर्मोही अनी आखाडा आणि अखिल भारतीय श्री पंच दिगंबर अनी आखाडा यांच्या प्रमुखांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. या वेळी वरील तीनही आखाड्यांच्या प्रमुखांनी समितीच्या कार्याचे कौतुक करत ‘समिती करत असलेले हिंदु राष्ट्र जागृतीचे कार्य आवश्यक आहे’, असे प्रतिपादन केले. या वेळी श्री. सुनील घनवट यांनी सर्व आखाड्यांच्या प्रमुखांना समितीच्या कार्याविषयी माहिती दिली, तसेच कुंभमेळ्यामध्ये धर्म आणि राष्ट्र यांच्या संदर्भातील लावण्यात आलेले चित्रमय प्रदर्शन ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्र’ याला भेट देण्यासाठी निमंत्रणही दिले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश अन राजस्थानचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया, सर्वश्री राजेश उमराणी आणि हरिकृष्ण शर्मा हेही उपस्थित होते.
- श्री महंत धर्मदासजी महाराज, अध्यक्ष, अखिल भारतीय श्री पंच निर्वाणी अनी आखाडा – हिंदु जनजागृती समितीचे कार्य स्तुत्य आहे. तुम्ही सगळे समर्पित भावाने कार्य करत आहात. हे कार्य सर्व संत महात्म्यांनाही प्रेरणादायी आहे.
- श्री महंत रामजीदास महाराज, अध्यक्ष, अखिल भारतीय श्री पंच निर्मोही अनी आखाडा – साधूसंतावर होणार्या आक्रमणाविरुद्ध संत समाजाने संघटित होणे आवश्यक आहे.
- श्री महंत कृष्णदास महाराज, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय श्री पंच दिगंबर अनी आखाडा – तुमचे हिंदु राष्ट्राविषयीचे निरंतर कार्य कौतुकास्पद आहे. हे आम्हा साधूंसंतांना भावते.
अन्य विशेष
अखिल भारतीय श्री पंच निर्मोही अनी आखाड्याचे छत्तीसगडचे महंत नरेंद्रदासजी महाराज आणि रूपाणाधाम बालाजी मंदिराचे महंत श्री पवनजी महाराज यांचीही भेट घेतली.
क्षणचित्र :
या भेटीच्या वेळी सर्व आखाड्यांच्या संतांना श्री. सुनील घनवट यांनी ‘सनातन पंचांग’ या अॅपची माहिती दिल्यावर त्यांनी ते लगेचच डाऊनलोड करून घेतले.