कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी ‘ब्रेक दि चेन’ मोहिमेला पर्याय नाही !
‘ऑनलाईन’ संवादाच्या वेळी शरद पवार यांचे वक्तव्य
मुंबई – कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यशासनाने काही कठोर निर्बंध लागू केले आहेत. ‘ब्रेक दि चेन’ या मोहिमेला सध्या राज्यभरातील विविध स्तरांतून विरोध होत आहे; पण कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी या मोहिमेला पर्याय नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ८ एप्रिल या दिवशी शरद पवार यांनी जनतेशी साधलेल्या ‘ऑनलाईन’ संवादाच्या वेळी त्यांनी वरील वक्तव्य केले. या वेळी शरद पवार म्हणाले, ‘‘देशाच्या आरोग्यमंत्र्यांशी मी संपर्क साधला असून राज्यात ज्या काही त्रुटी आहेत, त्यावरही काम करण्याविषयी चर्चा केली. त्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केंद्रशासन महाराष्ट्रासमवेत असल्याचे आश्वासन दिले.
कामगार, नोकरवर्ग, हमाल, व्यापारी, शेतकरी, व्यावसायिक, कष्टकरी अशा समाजातील प्रत्येक घटकाला या संकटाची झळ बसली. उद्योगधंदे बंद झाल्यामुळे व्यापारी वर्गाची हानी झाली. भाजीपाल्यासारखा नाशिवंत शेतमाल घेणार्या शेतकर्याला या मालाचे काय करावे ? हा प्रश्न उभा आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाचीही मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. या सर्वांतून पुढे जातांना यशसिद्धीचा मार्ग काढायचा असेल, तर या सर्व परिस्थितीला धैर्याने सामोरे गेलेच पाहिजे.’’