सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्या अनमोल सत्संगामुळे पूर्णवेळ साधना करण्याच्या निर्णयाप्रत पोचलेल्या सौ. नेहाली शिंपी !
सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्या अनमोल सत्संगामुळे आरंभी साधनेला विरोध असूनही पूर्णवेळ साधना करण्याच्या निर्णयाप्रत पोचलेल्या डोंबिवली येथील सौ. नेहाली शिंपी !
सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर मुंबईसारख्या मायानगरीत राहून मायेच्या दलदलीत फसलेल्या जिवांचा उद्धार होण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. त्यांनी साधनेचे पैलू पाडलेली अनेक साधक रत्ने परात्पर गुरुदेवांच्या चरणी अर्पण केली. त्यांच्या या गुरुकार्याच्या तळमळीला, परिश्रमाला आणि समष्टी प्रती असलेल्या त्यांच्या अपार प्रीतीला भावपूर्ण वंदन ! भवसागराच्या मायेत फसलेल्या आणि प्रारंभी साधनेला विरोध करणार्या डोंबिवली येथील सौ. नेहाली शिंपी यांना सद्गुरु अनुताईंनी त्यांच्या नकळत साधक बनवले आणि वेळोवेळी मार्गदर्शन करून पूर्णवेळ साधना करण्यास प्रवृत्त केले. सौ. नेहाली शिंपी यांच्या साधनेचा हा प्रवास येथे देत आहोत.
१. विवाहाआधी आणि नंतरही काही काळ केवळ मायेचे आकर्षण असणे, पतीला साधना करण्यास विरोध करणे आणि मुलगी झाल्यावर ‘तिच्यावर संस्कार कसे करायचे ?’, या विचाराने साधना करावीशी वाटणे
‘लहानपणापासून केवळ शिक्षण घेणे आणि चांगल्या वेतनाची चाकरी करून भरपूर पैसे मिळवणे’, असेच संस्कार माझ्या मनावर झाले होते. माझे लग्न झाले, तेव्हा माझे यजमान साधनेत होते; पण मला साधना आवडत नव्हती. मी त्यांना विरोधही करायचे. माझ्या या विरोधामुळे त्यांना सेवा करणेही थांबवावे लागले होंते. ‘मला मुलगी झाल्यावर तिच्यावर काय संस्कार करायचे ?’, या विचाराने ‘साधना करावी’, असे मला आतूनच वाटू लागले. सर्व साधक निरपेक्ष भावाने सेवा करतात, हेे बघून मलाही सेवा करावीशी वाटू लागली; पण चाकरी करत असल्यामुळे सेवेसाठी वेळ देणे शक्य नव्हते.
२. सेवेच्या संदर्भात सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी केलेले अनमोल साहाय्य
२ अ. दैनिकातील सूचना वाचून सेवा करण्याची इच्छा असल्याचे संबंधितांना कळवणे, दोन मासांनंतरही सेवा न मिळणे, सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांना हे कळल्यावर त्यांनी साधकांचा सत्संग घेणे, त्यानंतर सेवेविषयी निरोप मिळणे आणि तेव्हापासून सेवेला आरंभ होऊन सद्गुरु अनुताई यांच्यामुळे आयुष्याला वेगळे वळण लागणेे : आमच्या घरी प्रतिदिन दैनिक येत असे. एकदा दैनिकातून ‘संगणकीय सेवांसाठी साधकांची आवश्यकता आहे’, अशी सूचना आली होती. मी त्या सेवा करू शकत होते; म्हणून मी दायित्व असलेल्या साधकांना सांगितले, ‘मला या सेवा करायच्या आहेत.’ मी सेवा मागून साधारण २ मास होऊन गेले होते. त्याविषयी अनेकदा विचारूनही मला काही उत्तर मिळाले नाही; म्हणून मी माझ्या संपर्कातील एका साधकाला विचारले, ‘मला अजून सेवा का मिळाली नाही ?’
हे त्या साधकाने पुढे कळवले. त्यानंतर २ ते ३ दिवसांनी रात्री जिल्हासेवकांनी दूरभाष करून ‘तुम्हाला रामनाथी आश्रमातील कलेसंबंधी सेवा मिळेल. ते तुम्हाला संपर्क करतील’, असे मला सांगितले. दुसर्याच दिवशी मला दूरभाष आला. तेव्हापासून माझी सेवा चालू झाली. नंतर माझ्या संपर्कातील त्या साधकाने मला सांगितले, ‘तुम्हाला अजून सेवा मिळाली नाही; म्हणून सद्गुरु अनुताई (सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर) यांनी येथे येऊन साधकांचा सत्संग घेतला आणि त्यानंतर तुमच्या सेवेचे नियोजन झाले.’ तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘सद्गुरु अनुताईंनी माझ्यासाठी स्वतःचा इतका अमूल्य वेळ का दिला ? मी तर अजून साधनाही करत नाही.’
त्या वेळी ‘संतांचे प्रेम कसे असते ?’, हे मला शिकायला मिळाले. त्यानंतर सद्गुरु अनुताई मला सर्वांत प्रिय झाल्या. केवळ परात्पर गुरुदेवांची अपार कृपा आणि प्रीती यांमुळे मला या जन्मात सद्गुरु अनुताईंचा सत्संग लाभला आणि माझ्या आयुष्याला वेगळेच वळण लागले.
२ आ. सेवेतील पहिल्या ध्वनीचित्र-चकतीचे संकलन केल्यावर सद्गुरु अनुताईंनी स्वतः भ्रमणभाष करून कौतुक करणे : सद्गरु अनुताई मला प्रत्येक सेवा शिकवत होत्या आणि घडवत होत्या. एकदा कल्याण येथे हिंदु धर्मजागृती सभा होती. तेव्हा मला पहिल्यांदाच ध्वनीचित्र-चकती (व्हिडिओ) बनवण्याची सेवा मिळाली होती. पहिल्याच ध्वनीचित्र-चकतीचे संकलन (एडिटिंग’) केल्यावर सद्गुरु अनुताईंनी स्वतः मला भ्रमणभाष करून माझे कौतुक केले. त्यामुळे माझा आत्मविश्वास पुष्कळ वाढला आणि ‘ही सेवा आपण परिपूर्ण करू शकतो’, असे मला वाटू लागले.
२ इ. अकस्मात् सेवेत अडचण निर्माण होणे, सेवा पूर्ण होण्यास पहाटेचे ४ वाजणे आणि सद्गुरु अनुताईंनी तोपर्यंत जागे राहून सेवेच्या संदर्भात सतत विचारपूस करणे : ही सेवा जवळ जवळ पूर्ण होत आली होती. एक दिवस सेवा करतांना रात्रीचे १२.३० वाजले होते. मला फार झोप येत होती. मी प्रयत्नपूर्वक डोळे उघडे ठेवत होते. त्या वेळी अकस्मात् ध्वनीचित्र-चकतीमध्ये आवाज आणि चित्र काही केल्या जुळेना. पुष्कळ प्रयत्न करूनसुद्धा मला ते जमत नव्हते. तेव्हा ‘मी ही सेवा उद्या पूर्ण करते’, असा लघुसंदेश सद्गुरु अनुताईंना करून मी झोपायला गेले. पंधराच मिनिटांनी सद्गुरु अनुताईंचा भ्रमणभाष आला. तेव्हा ‘‘तुला थोडा वेळ विश्राम करायचा असेल, तर कर. त्यानंतर आजच ही सेवा करूया’’, असे त्यांनी मला सांगितले. त्यानंतर मी झोपायला गेल्यावर मला झोपही येत नव्हती. थोड्याच वेळात मला एकदम उत्साही वाटू लागले. त्यानंतर ती सेवा पहाटे ४ पर्यंत चालली आणि तोपर्यंत सद्गुरु अनुताईही जाग्याच होत्या. त्या लघुसंदेश करून मधून मधून माझी आणि सेवेविषयी विचारपूस करत होत्या. तेव्हा मला खरोखर कृतज्ञता वाटली.
३. सदगुरु अनुताईंच्या साधकांच्या वैयक्तिक भेटीच्या वेळी त्यांना अगदी क्षुल्लक अडचणी सांगूनही त्यांनी पुष्कळ प्रेमाने मार्गदर्शन करणे
एकदा सद्गुरु अनुताई केंद्रातील साधकांच्या वैयक्तिक भेटी घेण्यासाठी केंद्रात आल्या होत्या. तेव्हा त्यांनी मलाही बोलावले होते. संध्याकाळी ७ ची वेळ होती; पण मला कार्यालयातून निघायला उशीर झाला आणि मी रात्री ९ वाजता पोचले. तेव्हा सद्गुरु अनुताई माझ्यासाठी थांबल्या होत्या आणि त्यानंतरही त्यांनी मला पुष्कळ वेळ दिला. त्या वेळेस ‘त्यांच्याशी काय बोलावे ?’ किंवा ‘त्यांना काय विचारावे ?’ हेसुद्धा मला कळत नव्हते. ‘त्यांनी साधकांसमवेत मलाही भेटीसाठी बोलावले’, याचाच मला फार आनंद होत होता. त्या वेळी मला संतांचे महत्त्व कळत नव्हते. ‘काय बोलावे ?’ हे लक्षात न आल्याने मी त्यांना शेजार्यांमुळेे येणार्या अगदी क्षुल्लक अडचणी सांगितल्या. त्यासुद्धा त्यांनी पुष्कळ प्रेमाने ऐकून घेऊन मला योग्य मार्गदर्शन केले.
४. पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेणे
४ अ. सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी पूर्णवेळ साधना करण्याविषयी विचारणे, त्या वेळी आस्थापनामध्ये नुकतीच बढती मिळालेली असूनही दोन मासांत चाकरी सोडणार असल्याचे त्यांना सांगणे : याच भेटीत सद्गुरु अनुताईंनी मला पूर्णवेळ साधना करण्याविषयी विचारले. त्यांचे बोलणे ऐकून मी लगेच ठरवले, ‘आता आपण चाकरी सोडायची.’ तेव्हा इतर कोणताही विचार मनात आलाच नाही. खरेतर त्याच वर्षी मला नोकरीत बढतीही मिळाली होती. माझे आस्थापन मला अमेरिकेत पाठवण्यासाठी माझा ‘व्हिसा’ काढण्याच्या सिद्धतेत होते. माझी त्यासाठी पुढील परीक्षेची सिद्धताही चालू होती. नंतर ती परीक्षा न देण्याचा विचार माझ्या मनात आला आणि ‘दोनच मासांत (महिन्यांत) मी चाकरी सोडेन’, असे मी स्वतःहून सद्गुरु अनुताईंना सांगितले.
(क्रमश: उद्याच्या अंकी)
सौ. नेहाली राकेश शिंपी, डोंबिवली (२९.३.२०१९)
भाग २ मार्गिका : https://sanatanprabhat.org/marathi/467184.html