मालवणचे उपनगराध्यक्ष आणि भाजपचे गटनेते यांचे उपोषण तिसर्या दिवशीही चालू
|
मालवण – मालवण नगरपालिकेत मनमानी कारभार चालू असल्याचा आरोप करत उपनगराध्यक्ष राजन वराडकर आणि भाजपचे गटनेते गणेश कुशे यांनी विविध मागण्यांसाठी नगरपालिका कार्यालयासमोर ५ एप्रिल या दिवशी आमरण उपोषण चालू केले. ७ एप्रिलला मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपोषण स्थगित करण्याची विनंती केली; परंतु दोघांनीही मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण चालूच ठेवणार अशी भूमिका घेतल्याने तिसर्या दिवशीही उपोषण चालू होते. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने उपोषणस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
याविषयी कुशे आणि वराडकर म्हणाले, ‘‘आम्ही जिल्हाधिकार्यांना २५ मार्चला पत्र दिले होते, तसेच ४ मासांपूर्वीही एक पत्र दिले होते. यावर ‘कार्यवाही करतो’, असे आश्वासन देऊनही आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही. (४ मास होऊनही लाकप्रतिनिधींच्या पत्राची नोंद घेतली जात नसेल, तर असे प्रशासन सामान्य जनतेची कसे वागत असेल, हे लक्षात येते ! प्रशासनाच्या अशा कारभारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला उत्तरदायी कुणाला समजावे ? – संपादक) त्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला उपोषणाला बसावे लागले. नगरसेवकांना आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी जर उपोषणाला बसावे लागत असेल, तर जनतेला न्याय काय मिळणार ?’’