दळणवळण बंदी, रात्रीची संचारबंदी आणि सीमांवर निर्बंध लादणार नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
पणजी, ७ एप्रिल (वार्ता.) – कोरोनाचा संसर्ग वाढत असला, तरी राज्यात दळणवळण बंदी, रात्रीची संचारबंदी आणि सीमांवर निर्बंध लादले जाणार नाहीत. असे केल्याने राज्याच्या अर्थव्यवस्थेवर पुन्हा विपरीत परिणाम होणार, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ७ एप्रिल या दिवशी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले, ‘‘राज्याच्या सीमांवरही निर्बंध घातले जाणार नाहीत, तसेच मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी दंडातही वाढ केली जाणार नाही. कोरोनाची लस घेणे आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे, यांमुळेच कोरोनाच्या संसर्गाला आळा बसणार आहे. राज्यातील ४५ वर्षांहून अधिक वय असलेल्या लोकांनी कोरोनाची लस घेतल्यास राज्यातील निम्म्या जनतेचे लसीकरण होणार आहे.’’
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितलेली अन्य काही महत्त्वाची सूत्रे
१. मार्गदर्शक तत्त्वांचे पालन कठोरतेने करण्यावर आता भर दिला जाणार आहे. एखादी व्यक्ती पुन्हा पुन्हा मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करत असल्याचे आढळल्यास संबंधित व्यक्तीला एकाच दिवशी अनेक वेळा दंड आकारण्यात येईल.
२. राज्यशासनाच्या एखाद्या चुकीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढलेला नाही. कोरोनाचा संसर्ग गोव्यात नव्हे, तर राष्ट्रीय स्तरावर वाढत जात आहे. गोव्यात आलेल्या प्रवाशांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची संख्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांच्या तुलनेत अल्प आहे. गोमंतकियांनी कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी आवश्यक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
गोव्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचा नवीन उच्चांक : ५२७ नवीन रुग्ण
पणजी, ७ एप्रिल (वार्ता.) – राज्यात कोरोनाबाधित नवीन रुग्णांच्या संख्येत ७ एप्रिल या दिवशी मोठ्या प्रमाणात वाढ झाली. राज्यात ७ एप्रिल या दिवशी कोरोनाच्या २ सहस्र ६३९ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये ५२७ रुग्ण कोरोनाबाधित आढळले. रुग्ण आढळण्याची ही टक्केवारी १९.९ आहे. राज्यात मार्च २०२० पासून कोरोना महामारीला प्रारंभ झाल्यानंतर आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६० सहस्र २२९ झाली आहे. राज्यात एकूण २०० हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण असलेली केंद्रे पुढीलप्रमाणे आहे. पणजी २४४, कांदोळी २३८, पर्वरी २७३, मडगाव २९५ आणि फोंडा २१७. राज्यात उपचार चालू असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २ सहस्र ८५८ झाली आहे.