कोरोनावरील लस उपलब्ध न झाल्यास महाराष्ट्रातील लसीकरण बंद पडेल ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री
मुंबई – केंद्रशासनाकडे प्रती आठवड्याला कोरोनावरील ४० लाख लसीचे डोस मागण्यात आले आहेत. सद्यःस्थितीत महाराष्ट्रात कोरोनावरील लसीचे १४ लाख डोस शिल्लक आहेत. हा साठा ३ दिवस पुरेल इतका आहे. केंद्रशासनाकडून वेळेत डोस पुरवले गेले नाहीत, तर महाराष्ट्रातील लसीकरण बंद पडू शकते, असे वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. ६ एप्रिल या दिवशी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ११ राज्यांतील आरोग्यमंत्र्यांशी ‘ऑनलाईन’ संवाद साधला. यामध्ये टोपे यांनी महाराष्ट्रासाठी डोसची मागणी केली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत टोपे यांनी वरील माहिती दिली.
या वेळी राजेश टोपे म्हणाले, ‘‘सद्यःस्थितीत आम्ही नियमित साडेचार ते ५ लाख डोस देत आहोत. येत्या २ दिवसांत आम्ही ही संख्या ६ लाखांपर्यंत नेणार आहोत. लस न्यून पडत असल्यामुळे लसीकरणाची केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत. लोक लसीकरणासाठी येत असून ‘लस उपलब्ध नाही’, असे सांगण्याची वेळ कर्मचार्यांवर येत आहे. लसीकरण विनामूल्य आणि सुरक्षित आहे; मात्र लस मिळत नाही, हा मोठा प्रश्न आहे. सर्वांत अधिक फिरणार्यांमध्ये २० ते ४० वयोगटांतील नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. संसर्ग रोखायचा असेल, तर लवकर १८ वर्षांपासून पुढील वयाच्या नागरिकांना लस देणे, ही काळाची आवश्यकता आहे. त्यासाठी केंद्रशासनाकडून अनुमती मिळावी, अशी मागणी मी केली आहे. केंद्रशासनाकडून ज्या पद्धतीने आव्हानात्मक बोलले जाते, त्या पद्धतीने केले जात नाही.’’