बेंगळुरू येथे हिंदु जनजागृती समितीकडून देवतांच्या बेवारस पडलेल्या चित्रांचे विसर्जन करण्याचे अभियान !
समाजातून उत्तम प्रतिसाद !
बेंगळुरू (कर्नाटक) – शहरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ४ एप्रिल या दिवशी रस्त्याच्या कडेला, झाडाच्या खाली बेवारस पडलेली हिंदूंच्या देवतांची चित्रे, देवतांच्या मूर्ती गोळा करून त्या स्थळाची स्वच्छता करण्याचे अभियान राबवण्यात आले. शहराच्या केंगेरी, राजाजीनगर, लोटगनहळ्ळी, मारुतिनगर आदी भागांमध्ये हे अभियान राबवण्यात आले. या अभियानात हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, धर्मप्रेमी आणि धर्मशिक्षणवर्गाला येणारे धर्मप्रेमी सहभागी झाले होते. यात प्रामुख्याने देवतांची खराब झालेली चित्रे गोळा करणे, ती लाकडी चौकटीतून काढून विसर्जित करणे, त्यानंतर त्या स्थानाची स्वच्छता करून ‘येथे पुन्हा चित्रे टाकू नयेत’, असे प्रबोधन करणारा फलक लावणे आदी कृती करण्यात आल्या.
या अभियानातील काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे
१. मारुतिनगर येथे या अभियानात सहभागी झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना उत्साह वाटून दुसर्या दिवशीही त्यांनी देवतांची चित्रे गोळा करून त्या स्थानाची स्वच्छता करण्याचे अभियान पुढे चालवले.
२. यलहंका केंद्रात हिंदु युवक संघातील युवकांनी पुढील आठवड्यात विद्यारण्यपूर या संपूर्ण भागात असे अभियान राबवून तिथे पडलेली देवतांची चित्रे गोळा करण्याचा निश्चय केला.
३. संजयनगर येथे काही धर्मप्रेमी पुढील सप्ताहात त्यांच्या विभागात हे अभियान स्वतः घेण्यासाठी सिद्ध झाले आहेत.
४. सामाजिक माध्यमांतून धर्मप्रेमींनी या अभियानाच्या छायाचित्रांचे प्रसारण केल्यावर, ‘पुढील आठवड्यात आम्ही या अभियानात सहभागी होऊ, आम्हाला अवश्य बोलवा’, असे अनेकांनी सांगितले.
५. समितीची पोस्ट पाहून त्यातून स्वयंप्रेरित होऊन महिलांच्या एका गटाने केंगेरी येथे उघड्यावरील देवतांचे चित्र काढून विसर्जित करण्याचे अभियान राबवले.
६. काहींनी दूरभाष करून ‘आम्हीदेखील हे करतो; परंतु विसर्जन कसे करायचे याची माहिती नव्हती ती समजून घेतली. यापुढे आमच्या विभागात आम्ही हे करू’, असे सांगितले.
प्रसारमाध्यमांनीही नोंद घेतली !अभियानाच्या आदल्या दिवशी देवतांची चित्रे गोळा करून विसर्जन करण्याच्या अभियानाविषयी सामाजिक माध्यमांवर प्रसार केल्यावर ‘सुद्दी किरण टीव्ही’च्या संपादकांनी समितीच्या कार्यकर्त्याला दूरभाष करून ‘तुम्ही उत्तम कार्य करत आहात. अभिनंदन. कृपया याविषयीची छायाचित्रे, व्हिडिओ पाठवा. तुम्हाला उत्तम प्रसिद्धी देऊ’, असे सांगून प्रत्यक्षातही उत्तम प्रसिद्धी दिली. या अभियानाला राज्य स्तरावरील ६ नियतकालिकांनी छायाचित्रांसह उत्तम प्रसिद्धी दिली. |