नियोजन, समन्वयाचा अभाव आणि इच्छाशक्तीचा अभाव यांमुळे कोल्हापूर शहरातील वाहतुकीची समस्या जटील, तर वाहनतळाचा प्रश्‍न गंभीर !

  •  पश्‍चिम महाराष्ट्रातील सधन शहरांपैकी असलेले एक शहर म्हणजे कोल्हापूर !

  • कोल्हापूर म्हणजे दक्षिण काशीच !

श्री महालक्ष्मीदेवीचे कृपाछत्र असल्याने शहरात आर्थिक सुबत्ता कायमच राहिली आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून पर्यटक अल्प येत आहेत; अन्यथा जोतिबा, पन्हाळा यांसह अनेक ठिकाणे पहाण्यासाठी इथे पर्यटकांचा राबता कायमच असतो. असे असूनही कोल्हापूर शहरातील वाहतूक समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची डोळेझाकच दिसते. शहरातील वाहतुकीची समस्या नियोजन, समन्वय आणि इच्छाशक्ती यांचा अभाव यांमुळे जटील होत आहे.

कोल्हापूर शहरात एका रस्त्यावर झालेली वाहतूककोंडी

१. प्रशासकीय पातळीवर सुसंवाद-समन्वय यांचा अभाव !

शहरातील अनेक नाक्यांवर वाहतूक कोंडी होत आहे. कावळा नाका, मध्यवर्ती बसस्थानक, व्हिनस कॉर्नर, बागल चौक, लक्ष्मीपुरी, बिंदू चौक यांसह शहरातील अनेक उपनगरांत सध्या वाहतुकीची कोंडी होत आहे. यावर उपाय म्हणून शहरातील वाहतुकीचे नियोजन होत असतांना वाहतूक शाखा, महापालिका आणि पोलीस या तिन्ही घटकांमध्ये सुसंवाद-समन्वय यांचा अभाव दिसून येतो. या तिन्ही विभागांच्या सातत्याने एकत्रित बैठका आवश्यक असतांना त्या क्वचित्च झालेल्या आढळतात ! अनेक ठिकाणी रस्त्यावरच बाजार भरलेले आढळून येतात. यामुळे तितकी जागा भाजीविक्रेत्यांनी व्यापल्याने वाहनधारकांची मात्र कोंडी होते. विशेष करून सणांचे दिवस असतील, तर गाड्या चालवतांना वाहनचालकांची दमछाक होते. अगदी शाहुपुरीतील चौथ्या गल्लीच्या ठिकाणीही होणारी वाहनकोंडी आता नियमित होत आहे.

श्री. अजय केळकर

२. शहरात अत्यल्प वाहनतळ असणे ही गंभीर समस्या !

संपूर्ण महापालिका क्षेत्रात चारचाकी आणि दुचाकी वाहने लावण्यासाठी अगोदरच जागा अपुरी आहे. त्यात कोरोनाच्या काळात लोकांचा चारचाकी वाहने घेण्याकडे कल वाढला; मात्र शहरातील जागा मर्यादीत असल्याने गाड्या लावायच्या कुठे ? असा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिक, वाहतूकदार आणि बाहेरून येणारे वाहतूकदार यांना शहरात वाहनतळाच्या समस्येस मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागते. शहरात अनेक ठिकाणी रिकाम्या आणि मोकळ्या जागा आहेत; मात्र या जागा वाहतळासाठी वापरात आणण्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यायला हवा. मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरांप्रमाणे दुमजली, तीनमजली वाहनतळ अशांचीही संख्या यापुढील काळात वाढवावी लागेल. नवीन होणार्‍या इमारतींसाठी वाहनतळ अत्यावश्यक आहे, असे असले तरी जुन्या झालेल्या अनेक इमारतींसाठी वाहनतळांची सोय नाही. यामुळे या गाड्या कुठे लावायच्या, ही एक कठीण समस्या बनली आहे.

३. ‘नो व्हेईकल डे’ सारख्या संकल्पना आणि सायकलींसाठी प्रोत्साहन आवश्यक !

काही वर्षांपूर्वी महापालिकेने ‘नो व्हेईकल डे’ चालू केला. काही काळ तो चालला. यानंतर तत्कालीन आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी सोडून कुणीही त्याची विशेष कार्यवाही केली नाही. प्रत्येक १५ दिवसांतून एकदा ‘नो व्हेईकल डे’ चालू करून जर सार्वजनिक वाहन वापरण्यास नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेतला, तर ही समस्या सोडवण्यासाठी टाकलेले ते एक सकारात्मक पाऊलच असेल. पुण्याप्रमाणे कोल्हापुरातही  ठिकठिकाणी भाड्याने सायकली उपलब्ध करून देण्यास काय हरकत आहे. अनेक मोठ्या शहरांमध्ये सध्या विविध स्वयंसेवी आस्थापने सायकलचा प्रकल्प राबवण्यास पुढाकार घेत आहेत. या प्रयोगातून वाहतूक कोंडी तर अल्प होईलच, तसेच प्रदूषण अल्प होण्यासही हातभार लाभेल.

४. कठोर उपाययोजना आवश्यक !

या सर्वांवर उपाययोजना करण्यासाठी कठोर प्रयत्न करावे लागतील. यात रिक्शा थांब्यांचे पुन:सर्वेक्षण करून त्याचे फेरनियोजन करणे, महापालिका क्षेत्रातील पादचार्‍यांसाठी असलेल्या पदपथावरील अतिक्रमण काढून ते नागरिकांसाठी खुले करणे यांसह शहरात वाहनतळासाठी अधिकाधिक जागा विकसित करणे, नागरिकांना विश्‍वासात घेऊन त्यांच्या संकल्पना समजून घेऊन त्याही कृतीत आणणे या गोष्टींचा विचार करावा लागेल. वाहतूक पोलीस, महापालिका, लोकप्रतिनिधी यांनी त्यांचे दायित्व एकमेकांवर न ढकलता ही समस्या सोडवण्यासाठी मनापासून प्रयत्न करावे लागतील. अर्थात् यात नागरिकांनीही स्वयंशिस्त पाळणे अत्यावश्यक आहे.

गोव्यातही अनेक ठिकाणी उड्डाणपूल उभारल्यावर वाहतूक कोंडीची समस्या अल्प झाली. त्याच प्रकारे कोल्हापूर शहरात काही ठिकाणी उड्डाणपूल उभारल्यास काही प्रमाणात वाहतूक कोंडी सुटण्यास साहाय्य होईल. अशा प्रकारे सामूहिक प्रयत्न झाल्यास कोल्हापूर शहरातील वाहतूक कोंडी आणि वाहनतळ यांची समस्या सुटण्यास वेळ लागणार नाही !

– श्री. अजय केळकर, कोल्हापूर