‘ऑनलाईन’ सत्संगात सहभागी झालेले केरळ राज्यातील वाचक, जिज्ञासू आणि हितचिंतक यांना आलेल्या अनुभूती
१. कोरोना काळात आईचा ताप उतरत नसतांना प्रार्थना आणि श्लोक म्हणून आईजवळ सात्त्विक उदबत्ती लावल्यावर ताप न्यून होऊन आईला बरे वाटणे
‘मी ४ मासांपासून नामजप करत आहे. एकदा माझ्या आईला ताप आला. आईला आधुनिक वैद्यांकडे नेल्यावर ते म्हणाले, ‘‘मी औषध देतो; पण दोन दिवसांत ताप उतरला नाही, तर कोरोनाची चाचणी करावी लागेल.’’ आईचा ताप उतरत नव्हता. तेव्हा ‘वयस्कर आईला कोरोना झाला असेल, तर काय होईल ?’, अशी मला भीती वाटू लागली. मी प्रार्थना आणि श्लोक म्हणत आईच्या शेजारी सात्त्विक उदबत्ती लावली अन् आईच्या कपाळावर विभूती लावली. नंतर अर्धा घंट्याने लक्षात आले, ‘आईला घाम येऊन तिचा ताप उतरला आहे.’ दुसर्या दिवशी आई पूर्ण बरी झाली. त्या वेळी मला देवाप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.’ – सौ. नीना उदयकुमार, केरळ
२. नामजपामुळे कौटुंबिक प्रश्न सुटणे
२ अ. पुष्कळ शांत आणि समाधानी वाटणे : ‘मी २ मासांपासून नामजप करत आहे. मी माझ्या आईलाही नामजप करायला सांगते. आम्हाला अनेक वर्षांपासून असलेले कौटुंबिक प्रश्न आता सुटले आहेत. मला आता पुष्कळ शांत आणि समाधानी वाटते.’ – सौ. मधुमती
२ आ. सत्संगात सांगितलेली सर्व सूत्रे आचरणात आणणे : ‘मी ४ मासांपासून नामजप करत असून ‘ऑनलाईन’ सत्संग ऐकते. सत्संगात सांगितलेली सर्व सूत्रे मी आचरणात आणण्याचा प्रयत्न करते. मी नामजप चालू केल्यापासून आमच्या घरातील प्रश्न सुटत आहेत. आम्ही काहीही प्रयत्न न करता माझ्या उपवर मुलीसाठी चांगले स्थळ आले.’ – श्रीमती राधा
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |