सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने घेतल्या जाणार्या ‘ऑनलाईन’ सत्संगांची सेवा करतांना साधनेसाठी झालेले लाभ !
सनातन संस्थेच्या ‘ऑनलाईन’ सत्संगांच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने …
‘कोरोनाच्या संकटामुळे निर्माण झालेल्या दळणवळण बंदीमुळे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या माध्यमातून प्रतिदिन ‘ऑनलाईन’ ‘नामजप सत्संग’, ‘धर्मसत्संग’, ‘भाववृद्धी सत्संग’, तसेच ‘बालसंस्कारवर्ग’ घेतले जातात. या सत्संगांना समाजातील व्यक्तींकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ‘सोशल मिडिया’च्या माध्यमांतून विविध चर्चासत्रांचेही आयोजन करण्यात येते. या ‘ऑनलाईन’ सत्संगांची सेवा करतांना मला शिकायला मिळालेली सूत्रे, सेवेच्या माध्यमातून साधनेविषयी झालेले चिंतन आणि आलेल्या अनुभूती यांविषयी येथे दिले आहे.
१. सत्संगाच्या वेळी येणार्या प्रत्येक अभिप्रायातून (कमेंटस्मधून) शिकता येणे
या सेवेच्या आरंभीच्या काळात ‘कार्यक्रमाच्या वेळी पुष्कळ अभिप्राय (कमेंटस्) यावेत’, अशी माझी अपेक्षा असायची. नंतर प्रार्थना केल्यावर या अभिप्रायांचा मला निरपेक्ष राहून अभ्यास करता आला, तसेच प्रत्येक अभिप्रायातून निराळे काहीतरी शिकता आले. त्यानंतर ‘ही सेवा करणार्या आम्हा सर्व साधकांची प.पू. गुरुदेवांना अपेक्षित अशी साधना होऊ दे’, अशी माझ्याकडून प्रार्थना होऊ लागली.
२. स्वतःत विविध गुण आणण्यासाठी प्रयत्न होणे
या सेवेच्या माध्यमातून माझ्यातील ‘स्वभावदोष’ आणि ‘अहं’ यांच्या पैलूंवर कृतीच्या स्तरावर मात करण्यासाठी माझे प्रयत्न झाले. ‘वक्तशीरपणा’, ‘तत्परता’ आणि ‘विचारून करणे’, हे गुण स्वतःत आणण्यासाठी प्रयत्न झाले. या सेवेच्या माध्यमातून देवाच्या कृपेमुळे माझ्यात अमूलाग्र पालट झाले.
३. अंकगणिताविषयी मनात असलेला न्यूनगंड आणि नकारात्मकता सेवेच्या माध्यमातून दूर होणे
प्रतिदिन ‘ऑनलाईन’ सत्संगांचा आढावा एकत्रित करतांना त्या संदर्भात येणारे अभिप्राय (कमेंटस्), प्रश्न इत्यादींची संख्या पुष्कळ असायची. माझ्या मनात अंकगणिताच्या संदर्भात न्यूनगंड आणि नकारात्मकता होती. मला ‘ही सेवा जमणार नाही’, असे वाटायचे; परंतु उत्तरदायी साधकांनी मला या सेवेतील बारकावे शिकवून साहाय्य केले. त्यामुळे मी आत्मविश्वासाने सेवा करू शकले. देवानेच माझ्या मनात अंकगणिताविषयी असलेला न्यूनगंड दूर करून माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला.
४. विशेष परिसंवादाच्या कार्यक्रमाच्या वेळी जलद गतीने सहस्रो अभिप्राय येणे आणि त्यातून वैशिष्ट्यपूर्ण प्रतिसाद, प्रश्न इत्यादींचे वर्गीकरण करता येणे
विशेष परिसंवादाच्या साधारण दीड घंट्याच्या कालावधीत जलद गतीने सहस्रो अभिप्राय (कमेंटस्) यायचे. त्यामधून वैशिष्ट्यपूर्ण प्रतिसाद, प्रश्न, संपर्क क्रमांक, सत्संगांची मागणी इत्यादींचे वर्गीकरण करतांना ‘आम्ही सर्व साधक प.पू. गुरुदेवांचे तत्पर आणि अष्टावधानी सैनिक आहोत’, असा भाव ठेवून सर्व अभिप्राय अभ्यासपूर्वक वाचले जायचे. ही सेवा करतांना मला सहसाधकांकडून अनेक तांत्रिक गोष्टी शिकायला मिळाल्या, तसेच कृतज्ञताभावात राहून या सेवेतील आनंद अनुभवता आला.
५. गुरुपौर्णिमा सोहळ्याच्या दिवशी ‘कमेंटस् मॉनिटरिंग’ची सेवा करतांना पुष्कळ आनंद मिळणे
गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा सोहळ्याचे ११ भाषांमधून प्रक्षेपण होणार होते. त्या दिवशी माझ्याकडे ‘कमेंटस् मॉनिटरिंग’ची (कार्यक्रमाच्या वेळी येणार्या अभिप्रायांकडे लक्ष ठेवणे) सेवा होती. ही सेवा करतांना मला पुष्कळ आनंद मिळाला. या सेवेच्या माध्यमातून आम्हा साधकांमध्ये ‘व्यापकता’ आणि ‘शरणागतभाव’ वाढला. मला सर्व साधकांचा प.पू. गुरुदेवांप्रती असलेला भाव आणि श्रद्धा शिकायला मिळाली अन् ‘प्रत्येक ठिकाणी ‘गुरुतत्त्व’ कसे कार्य करते’, हे शिकायला मिळाले.
६. ‘ऑनलाईन’ सत्संगांत संत आणि सद्गुरु यांच्या चैतन्यमय वाणीतून सोप्या शब्दांत हिंदूंचे धर्मशास्त्र सांगितले जाणे
‘ऑनलाईन’ सत्संगात दैनंदिन जीवनातील लहान लहान कृतींमागील शास्त्र, त्यामागील धार्मिक आणि आध्यात्मिक कारणे, प्रत्येक कृतीमागील कार्यकारणभाव अन् त्या कृती योग्य रितीने करण्याची पद्धत सांगितली जाते. ‘या सत्संगाच्या माध्यमातून प.पू. गुरुदेव ज्ञानशक्ती देत आहेत’, असे मला वाटते. आजपर्यंत इतक्या सोप्या शब्दांत हिंदूंचे धर्मशास्त्र कुणी समजावले नव्हते. हे शास्त्र संत आणि सद्गुरु यांच्या चैतन्यमय वाणीतून शिकण्यातील आनंद निराळाच आहे.
७. कृतज्ञता
‘ऑनलाईन’ सत्संगाच्या सेवेमुळे मला दैवी सत्संग ऐकण्याची आणि त्यातून शिकण्याची संधी मिळाली. त्याविषयी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.
सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरुदेव, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणी मी माझ्याकडून झालेल्या चुकांसाठी क्षमायाचना करते. ‘आम्हा सर्वांकडून तुम्हाला अपेक्षित अशी भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा अन् साधना करवून घ्या. आम्हाला तुमच्या चरणी शीघ्रातीशीघ्र येता येऊ द्या’, अशी संपूर्ण शरणागतीने कोटीशः प्रार्थना आहे.’
एक गुरुचरणसेविका,
– कु. मोनिका कल्याणकर, बारामती, पुणे. (१४.७.२०२०)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |