अग्निहोत्राचे ‘पेटंट’ !
एखाद्या गोष्टीचे ‘पेटंट’ (स्वामित्व) जी संस्था किंवा देश यांच्याकडे आहे, त्यांच्या अनुमतीशिवाय अन्य कुणी त्याविषयीचे संशोधन करू शकत नाही. सोप्या भाषेत ‘पेटंट’ म्हणजे त्या वस्तूविषयीचा किंवा त्याविषयीच्या संशोधनाविषयी अधिकार मिळणे, असे आपण म्हणू शकतो. पेटंट खरेतर नव्या गोष्टींसाठी देण्यात येते; जेणेकरून त्याची नक्कल इतरांनी करू नये. एखाद्या वस्तूचे पेटंट मिळाल्यास त्या वस्तूचा उपयोग, नवनिर्माण, विक्री आणि संशोधन हे कुणी स्वतःच्या अधिकारात करू शकत नाही. असे केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. प्राचीन भारतीय संस्कृतीतील विविध गोष्टी आणि त्यांची उपयुक्तता विदेशींना मोठ्या प्रमाणात लक्षात येते आणि ते त्यांच्या नावावर त्या वस्तूचे ‘पेटंट’ घेतात; जसे हळदीचे पेटंट अमेरिकेने घेतले होते. असे आतापर्यंत विविध उपयुक्त गोष्टींच्या संदर्भात होत आले आहे.
नुकतेच रशियाने म्हटले आहे, ‘तिसर्या महायुद्धाला ४ आठवडे शिल्लक आहेत.’ दुसर्या महायुद्धापेक्षा तिसर्या महायुद्धात मोठा किरणोत्सर्ग होण्याची शक्यता आहे. रोगजंतूनिवारण आणि वातावरणशुद्धी यांसह किरणोत्सर्गापासून रक्षण होणे हा अग्निहोत्राचा मोठा लाभ आहे. आज सामान्य व्यक्तीसाठी अग्निहोत्र हे अणूबॉम्बच्या किरणोत्सर्गाच्या लहरींपासून संरक्षण करणारे एकमेव माध्यम आहे. अग्निहोत्र केल्याने त्यापासून निर्माण होणार्या लहरी वातावरणात संरक्षककवच निर्माण करतात. विज्ञानाकडे डोळसपणे पहाणार्या विदेशींनी त्याचे महत्त्व जाणले आहे. कित्येक विदेशी अग्निहोत्र करतात. त्यामुळे अन्य गोष्टींप्रमाणे याचेही पेटंट विदेशींनी घेतले असते, तर नवल नव्हते; परंतु बेळगावचे डॉ. प्रमोद मोघे आणि त्यांचे २ सहकारी यांनी भारताची लाज राखली आहे. त्या तिघांनी अभ्यास करून अग्निहोत्राच्या धुराचा वातावरणावर होणारा परिणाम, राखेची उपयुक्तता आणि जलशुद्धीकरणासाठी त्या राखेचा वापर यांसंदर्भात संशोधन केले अन् प्रयोगाअंती अग्निहोत्राची राख जंतूनाशक असल्याचे प्रयोगशाळेत सिद्ध करून त्याचे ‘पेटंट’ मिळवले.
अग्निहोत्रातील गायीच्या शेणाच्या गोवर्या, गायीचे तूप, अख्खे तांदुळ (म्हणजे अक्षता), अग्निहोत्राचे ताम्रपत्र, त्याचा विशिष्ट आकार, अग्निहोत्र करण्याची वेळ आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मंत्र अन् मंत्र म्हणणार्याचा भाव या सार्याच गोष्टी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण तसेच पूर्णतः वैज्ञानिक आहेत. अग्निहोत्राला अवैज्ञानिक म्हणणार्यांना याचे महत्त्व कधी कळूच शकत नाही. त्याचा लाभ न घेण्याचीच त्यांची पात्रता आहे. विदेशींनी अग्निहोत्राचे पेटंट घेतले असते, तर भारतात अग्निहोत्राला नावे ठेवणार्यांना त्याचे महत्त्व कदाचित् लक्षात आले असते. शक्तीचा मूळ स्रोत असलेल्या अग्नि आणि सूर्य यांनाच हे आवाहन आहे. या दोघांचे तेज अग्निहोत्र करणार्यांना सध्याच्या अण्वस्त्र युद्धाच्या काळात तरून नेण्याची क्षमता निर्माण करते. अग्निहोत्र हा आज भारतियांसाठी केवळ विधी नाही, तर उद्याची महासत्ता असणार्या, विज्ञानावर अधिराज्य गाजवणार्या भारतीय संस्कृतीच्या आध्यात्मिक शक्तीचे द्योतक आहे ! विज्ञानाने त्याच्या सर्वोच्च शक्तीने जगाचा विनाश करणारा अणूबॉम्ब सिद्ध केला; पण त्याच्या परिणामांपासून रक्षण करणारे अग्निहोत्र प्राचीन काळीच भारतात सिद्ध झाले होते !
‘पेटंट’ तरीही ‘इदं न मम’ !
अग्निहोत्रात सूर्य, अग्नि आणि प्रजापति यांना आहुती अर्पण करून ‘इदं न मम’ (‘हे माझे नाही’) असे म्हणतात. हेच भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. ज्या ऋषिमुनींनी भाजीपाल्यापासून औषधी वनस्पतींपर्यंत, शल्यचिकित्सेपासून स्थापत्यशास्त्रापर्यंत आणि गणितापासून खगोलशास्त्रापर्यंतच्या विविधांगी संशोधनांत काही अपवादात्मक ठिकाणीच स्वतःची नावे लिहिली, त्यांचा आदर्श आपल्याकडे आहे. ‘ज्ञान देवाकडून येते’, असा त्यांचा भाव होता; पण आज दुर्दैवाने विदेशी आपल्या गोष्टी चोरून त्यावर त्यांचा हक्क सांगत असल्यामुळे त्यांच्याचकडून आपल्याला त्याविषयीची अनुमती मागण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संपूर्ण विश्वाला आर्य (सुसंस्कृत) बनण्याची मनीषा असणार्या भारतियांचा ‘इदं न मम’ असाच मूळ भाव असला, तरी सध्या स्थुलातून का होईना त्यांच्यावर ‘अग्निहोत्रा’सारख्या गोष्टींचे ‘पेटंट’ घेण्याची वेळ आहे. असे असले, तरी भारतियांची मूळ सहिष्णु आणि व्यापक वृत्ती यांमुळे भारतीय विदेशींना अग्निहोत्राचा लाभ घेण्यापासून थांबवणार नाहीत, तर उलट त्याचा अधिकाधिक प्रसारच करतील. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयानेही अग्निहोत्र या विषयावर संशोधन करून त्याची सात्त्विकता वैज्ञानिक उपकरणांद्वारे सिद्ध केली. अनेक विदेशींना या संशोधनाने प्रभावित केले असून ते स्वतः प्रतिदिन अग्निहोत्र करू लागले आहेत.
बेळगावचे डॉ. मोघे आणि त्यांचे सहकारी यांनी घेतलेल्या कष्टामुळे आता अग्निहोत्राच्या संदर्भातील अधिकार विदेशात जाण्याचा धोका टळला आहे. येणार्या आपत्काळात अग्निहोत्र हे तिसर्या महायुद्धातील संभाव्य घातक किरणोत्सर्गापासून आपले रक्षण करणारे ठरणार असतांना जर विदेशात याचा मालकी हक्क गेला असता, तर कदाचित् येथील विविध स्वरूपाच्या वापरावर काही निर्बंधही येऊही शकले असते. जसे हळदीच्या संदर्भात झाले. बहुतांश भारतीय जखमेवर हळद लावायची कृती लहानपणापासून करत आला आहे. भारतीय स्त्रियांसाठी तर ‘हळद-कुंकू’ हे परवलीचे शब्द आहेत. थोडक्यात हळदीचे सर्व गुणधर्म भारतियांना ठाऊक असल्यामुळे भारतियांचा स्वयंपाक हळदीशिवाय पूर्ण होत नाही. असे असतांना अमेरिकेने वर्ष १९९५ मध्ये हळदीचे ‘पेटंट’ घेऊन भारतियांची एकप्रकारे फसवणूकच केली होती. भारतीय वंशाच्या तेथील शास्त्रज्ञांच्या साहाय्यानेच ती करण्यात आली होती. डॉ. रघुनाथ माशेलकर यांना जेव्हा हे लक्षात आले, तेव्हा त्यांनाही धक्का बसला. एक वर्षाहून अधिक काळ याविषयी लढा देऊन त्यांनी अमेरिकेकडून हे ‘पेटंट’ परत मिळवले. डॉ. मोघे आणि त्यांचे सहकारी यांनी अग्निहोत्राच्या संदर्भात असे काही केले नसते, तर कदाचित् अग्निहोत्राच्या संदर्भात असेच काही झाले असते. तूर्तास तरी हा धोका टळला आहे !