पश्चिम महाराष्ट्रातील मंदिरे ३० एप्रिलपर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद !
|
कोल्हापूर – राज्यशासनाच्या आदेशानुसार श्री महालक्ष्मी मंदिर, जोतिबा देवस्थान यांसह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अंतर्गत येणारी सर्व मंदिरे ५ ते ३० एप्रिल या कालावधीत भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. श्री महालक्ष्मीदेवीचा रथोत्सवही रहित करण्यात आला असून केवळ नैमित्तिक पूजा-अर्चा चालू असणार आहे. याचसमवेत अखंड महाराष्ट्रातून ज्यासाठी भाविक येतात, ती जोतिबा देवाची यात्राही रहित करण्यात आल्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी ५ ते ३० एप्रिल या कालावधीत बंद असणार आहे. याविषयीचा निर्णय मंदिर समितीच्या वतीने घेण्यात आला असल्याचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले. बंदच्या काळातही श्री विठ्ठलाचे सर्व नित्योपचार परंपरेनुसार चालू रहाणार आहेत. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने अध्यक्ष ह.भ.प. औसेकर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे मंदिर समितीच्या सदस्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
श्री तुळजाभवानी देवीच्या ‘ऑनलाईन’ दर्शनाचा लाभ घेण्याचे मंदिर प्रशासक सिद्धेश्वर इंतुले यांचे आवाहन
तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासनाने दिलेल्या आदेशानुसार येथील श्री तुळजाभवानी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असणार आहे. त्यामुळे भाविकांनी तुळजापूर येथे न येता मंदिर संस्थानच्या संकेतस्थळाला भेट देऊन ‘ऑनलाईन’ दर्शन घेण्याचे आवाहन मंदिर प्रशासक श्री. सिद्धेश्वर इंतुले यांनी केले आहे.