राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचार सभेला गर्दी केल्याप्रकरणी आयोजकांविरुद्ध गुन्हा नोंद !
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचार शुभारंभाच्या सभेला (रांझणी, तालुका पंढरपूर) येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या प्रकरणी या सभेसाठी अनुमती घेणारे विजयसिंह देशमुख यांच्या विरुद्ध तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (कोरोनाची इतकी गंभीर स्थिती राज्यात असतांना दायित्वशून्यपणे केलेली कृती नागरिकांना किती महागात पडेल, हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे केवळ गुन्हा नोंद करून वरवर कारवाई केल्यास अशा गोष्टींना आळा बसेल का ? त्यासाठी कठोर कारवाई होणे आवश्यक ! – संपादक)
या सभेमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्याविषयी निर्गमित केलेल्या आदेशाचे सभेच्या आयोजकांनी उल्लंघन केल्याचे व्ही.एस्.टी. पथकाच्या निदर्शनास आले. यामुळे विस्तार अधिकारी आणि व्ही.एस्.टी. पथक प्रमुख अशोक नलवडे यांनी विजयसिंह देशमुख यांच्या विरुद्ध तालुका पोलीस ठाणे येथे तक्रार दिली होती.