‘परात्पर गुरु डॉक्टर अखिल ब्रह्मांडाचे स्वामी असून त्यांचे चराचरात अस्तित्व आहे’, याविषयी साधकाला आलेली अनुभूती
गुरुदेवांचे विश्वरूप दर्शन !
१. युवा साधकाने परात्पर गुरुदेवांनी त्याला साधना चांगली चालली असल्याचे सांगून त्याचे कौतुक केल्याचे सांगितल्यावर गुरुदेवांना ‘तुमच्या कौतुकाला पात्र होण्यासाठी मी काय करू ?’, अशी प्रार्थना करणे
‘१.११.२०२० या दिवशी व्यष्टी साधनेचा आढावा दिल्यानंतर मला आतून पुष्कळ आनंदी आणि शांत वाटत होते. त्यानंतर मी परात्पर गुरु डॉ. आठवले पूर्वी निवासाला रहात असलेल्या खोलीत नामजप करण्यासाठी बसलो. मी देवाला माझ्याकडून स्वयंसूचना सत्र आणि नामजप करून घेण्याविषयी प्रार्थना केली. मी स्वयंसूचना सत्र करत असतांना मला माझ्या अंतरंगात परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व जाणवू लागले. आदल्या दिवशी माझी माझ्याच वयाच्या एका युवा साधकाशी भेट झाली होती. त्या वेळी त्याने मला सांगितले होते की, परात्पर गुरुदेवांनी त्याची साधना चांगली चालली असल्याचा निरोप देऊन त्याचे कौतुक केले होते. ते ऐकून मला ‘गुरुदेवांनी या साधकाच्या माध्यमातून माझ्या वयाच्या सर्व युवा साधकांचे कौतुक केले आहे’, असे वाटले; मात्र ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी लहानपणापासून माझे कधीच कौतुक केले नाही’, असा विचार माझ्या मनात आला. त्यामुळे मी त्यांना प्रार्थना केली, ‘गुरुदेव, तुमच्या कौतुकाला पात्र होण्यासाठी मी काय करू ? मी कुठे न्यून पडतो की, ‘ज्यामुळे आपल्या दिव्य वाणीतून कौतुकाचे दोन शब्द ऐकण्याचे भाग्य मला लाभत नाही ?’
२. प्रार्थना करतांना भाव जागृत होणे आणि ‘विश्वातील प्रत्येक वस्तूत गुरुदेवांचे अस्तित्व आहे’, असे जाणवणे
मी प्रार्थना करत असतांना माझा भाव जागृत होऊन माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. अकस्मात् ‘विश्वातील प्रत्येक वस्तूत गुरुदेवांचे अस्तित्व आहे’, असे मला जाणवू लागले. खोलीतील आसंदी, माझी पिशवी, वही, मी ग्रहण करत असलेले अन्न आणि पाणी, मी ज्या वाहनातून प्रवास करतो, ते वाहन, माझी लेखणी, तसेच छतावरील पंखा, या सर्वांमध्ये असलेल्या गुरुदेवांच्या अस्तित्वाची मला जाणीव झाली.
३. पूर्वी गुरुदेवांशी झालेली भेट आठवून पुष्कळ भावजागृती होणे
त्या वेळी मला पूर्वी गुरुदेवांशी झालेली भेट आठवली. या भेटीत मी त्यांना ‘श्रीकृष्णाने अर्जुनाला जसे विश्वरूप दर्शन दिले होते, तसेच आपणही मला विश्वरूप दर्शन द्यावे’, अशी प्रार्थना केली होती. या प्रसंगाचे स्मरण करत असतांनाच माझ्या अंतरंगातील गुरुदेवांनी मला विचारले, ‘माझे विश्वरूप दर्शन झाले का ? मी सर्वत्र आहे. ‘माझे अस्तित्व नाही’, असे या ब्रह्मांडात काहीही नाही.’ गुरुदेवांनी करून दिलेली ही जाणीव माझ्या अंतर्मनात खोलवर जात होती आणि माझी पुष्कळ भावजागृती होत होती. मला मोठ्याने रडावेसे वाटत होते आणि या भावस्थितीत रहाणे मला अशक्य झाले होते. मी गुरुदेवांना ‘मला ही भावावस्था सहन होत नाही. मला पूर्वीच्या सामान्य स्थितीला घेऊन जा’, अशी प्रार्थना केली. त्यानंतर मी हळूहळू सामान्य स्थितीत आलो.
४. ‘परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व सर्वत्र आहे’, हे अनुभवणे’, हे खरे विश्वरूपदर्शन आहे’, असे वाटणे
मी लहानपणापासून गुरुदेवांना पहात आलो आहे, तरीही इतक्या वर्षांत ‘ते साक्षात् भगवान विष्णुच आहेत’, हे मला कधीही जाणवले नाही’, याची तीव्र खंत मला वाटत होती. हे सत्य कळण्यास मला २७ वर्षे लागली. ‘परात्पर गुरुदेवच भगवान विष्णु आहेत’, या विचारानेच माझी पुष्कळ भावजागृती झाली. श्रीकृष्णाच्या विश्वरूप दर्शनाची जी चित्रे आपण पहातो, ती सर्व चित्रे प्रातिनिधिक आहेत. प्रत्यक्षात ‘परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व सर्वत्र आहे’, हे अनुभवणे’, हे खरे विश्वरूप दर्शन आहे. प्रार्थना करून हळूहळू डोळे उघडतांना मला गुरुदेवांचे सूक्ष्मातून दर्शन झाले. त्यांच्याकडे लक्षपूर्वक पहात असतांना मला त्यांच्या जागी स्वतःचे अस्तित्व जाणवले. अकस्मात् मला प.पू. भक्तराज महाराज यांचा आवाज ऐकू आला. ते म्हणाले, ‘तू काय पहात आहेस ? तू जे पहात आहेस, ते तू नाहीस. तुझे अस्तित्व हे तुझे नसून मीच तुझ्या माध्यमातून कार्य करत आहे. या विश्वात तुझे वेगळे असे काही अस्तित्वच नाही.’ मला हे ऐकून गुरुदेवांच्या प्रती अपार कृतज्ञता वाटली. माझी कोणतीही पात्रता नसतांना त्यांनी मला त्यांच्या चराचरातील अस्तित्वाची (विश्वरूप दर्शनाची) जाणीव करून दिली, तसेच माझ्याकडून स्वतःचे वेगळे अस्तित्व नष्ट करण्याचे प्रयत्न होत नसूनही ते नष्ट केले.
परात्पर गुरुदेव, तुमच्याच कृपेने मला ही अनुभूती घेता आली. मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो. या लिखाणात एखादी चूक असल्यास ती ‘स्वतःचे वेगळे अस्तित्व जपणे’ या माझ्यातील अहंमुळे झाली आहे. गुरुदेव, आपणच माझ्याकडून तन-मन-धन यांचा त्याग करून घ्या. मला केवळ आपल्या श्री चरणांशी एकरूप व्हायचे आहे.’
– श्री. गणेश शेट्टी, बेळगाव (२.१२.२०२०)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |